शीर्षकातील ‘अतिराग’ याचा अर्थ ‘अतिद्वेष’ असा नसून, भौतिक संपत्तीमध्ये गुरफटणे असा होतो. भौतिक सुख हे प्रत्येकालाच अगदी हवेहवेसे वाटते. तसे वाटण्यात काही गैरही नाही. परंतु, संपूर्ण आयुष्यच अशा भौतिक सुखासाठी जगणे, त्यासाठीच स्वत:ला झोकून देणे, नातेसंबंध, आध्यातिक प्रगतीकडे त्यासाठी दुर्लक्ष करणे, ही ‘अतिरागा’ची लक्षणे. तेव्हा, या ‘अतिरागा’चे स्वरुप, त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख....
धारणीय वेगांच्या श्रृंखलेतील पुढील वेग म्हणजे ‘अतिराग.’ इथे ‘राग’ या शब्दाचा अर्थ ’ANGER' असा नसून, ’ATTACHMENT' असा आहे. मनाची ती स्थिती ज्यामुळे ती व्यक्ती भौतिक संपत्ती, वस्तू यामध्ये गुंतते, गुरफटून जाते. ऐहिक मालमत्ता मिळवण्यासाठी, अधिक एकत्रित करण्यासाठी धडपडते, त्यात अडकते. ऐहिक, भौतिक वस्तूंमध्ये आनंद मिळवत राहते. त्या मिळविण्याच्या, जिंकण्याच्या शर्यतीमध्ये संपूर्ण झोकून देते. त्याचाच ध्यास आणि ध्येय मनाशी बाळगून आयुष्य जगत असते.
इच्छा-आकांक्षा-भावना या सर्व ऐहिक सुखाच्या भोवतीच अस्तित्वात असतात. पैसा-कपडे-विविध यंत्र सामग्री-गाडी-बंगला-गाड्या इ. हे आहे. त्यापेक्षा अधिक (उत्तम प्रतीचे, दर्जाचे मोलाचे) मिळविण्याची इच्छा (तीव्र स्वरूपाची) बाळगणे म्हणजे ‘अतिराग’ होय. राग म्हणजे प्रीती (AFFINITY, EXCESSING ATTRACTION) प्रमाणाबाहेर प्रीती (Unlawfully Excessive) असल्यास त्याला ‘अतिराग’ असे म्हटले जाते.
अन्न-वस्त्र-निवारा या तीन माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण, त्या गरजा केवळ पूर्ण झाल्या की पुरेसे आहे. त्यातच वाहात जाणे, अडकणे, त्यांची Possessions गोळा करण्यासाठी घोडदौड लावणे, जीवाचा आटापिटा करणे, हे सगळे ‘अतिराग’ या प्रकारात मोडते. मनुष्य शरीर हे पंचकाषात्मक शरीर आहे आणि अन्नमय कोषापासून आनंदमय कोषापर्यंत पोहोचणे, हा प्रवास अपेक्षित आहे. पण, कुठल्याही ऐहिक वस्तू/नात्याला जर चिकटून राहिलो, अडकलो, तर ही प्रगती होत नाही. ‘राग’ ATTACHMENT बाधा म्हणून कार्य करते, एखाद्या व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतिपथासाठी.
अतिरागाचे आयुर्वेदात याप्रमाणे विवेचन आहे, ‘उचित एव विषये पुनःपुनः प्रवर्तन इच्छा|’ (म्हणजेच त्याच इच्छांतर पुनःपुनः इच्छा होणे (उदा. एक बीएचके असल्यास दोन बीएचकेमध्ये जाण्याची इच्छा आहे, त्यापेक्षा सतत ‘अपग्रेड’ करण्याची इच्छा.)
या इच्छा मिळविण्यासाठी ‘अचिव्ह’ करताना आहे, त्या क्षणाचा आनंद घेणे, हे कुठेतरी राहून जाते. त्यात समाधानी होणे जमत नाही. ‘ये दिल मांगे मोर’ अशी अवस्था सतत राहणे, हे चुकीचे आहे. कुठून सुरू केले आणि काय मिळविले, याबद्दल वेळोवेळी विचार, मंथन करणे गरजेचे आहे. ‘जरा तिसाऊ या वळणावर’ अशी स्थिती येणे, अनुभवाने महत्त्वाचे आहे.
राग (प्रीती, ATTACHMENT) हे रजोगुणाशी जोडलेले आहे. सतत गतिशीलता हे रजोगुणाचे वैशिष्ट्य आहे. रजोगुण अतिसक्रीय असल्यास, रागही अधिक प्रमाणात निर्माण होतो. अतिराग ही स्थिती खूप काळ राहिल्यास, ध्येय गाठल्यावर ही समाधान मिळत नाही, रितेपणा जाणवतो. हव्यास अजून मिळविण्यामागे राहते (पोट कधीच भरत नाही. समाधानाची पोचपावती मिळत नाही.) याने मानसिकदृष्ट्या अस्थिरता जाणवू लागते. तगमग वाटू लागत आहे. त्यात समाधान कधीच मिळत नाही. मनःशांती लाभत नाही आणि मग त्याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसतो.
गावातून शहरात येणे, उपनगरांतून मुख्य ठिकाणी राहणे, छोट्या घरातून मोठ्या घरात जाणे, चांदी ते सोने ते हिरे ते मोती, दुचाकीपासून चारचाकीपर्यंत पोहोचणे, पगार, मिळकत दुप्पट होणे, तरी ते कमी वाटणे इ. सगळ्या गोष्टी ‘अतिराग’ या सदराखाली येतात. माणसाने सतत प्रगतिशील असावे. पण, प्रगती केवळ ऐहिक वस्तू मिळविणे यात दडलेली नाही. सतत ‘रॅटरेस’मध्ये राहणे, शरीराला-मनाला-भावनांना त्रासदायक आहे.
कुठल्यातरी टप्प्यावर पोहोचून स्थिरावणे गरजेचे आहे. आपण काय मिळविले, एवढेच फक्त न बघता, त्या प्रवासाचाही आनंद घ्यावा. चढ-उतारांना तोंड देता-देता किती नाती आपण जपली आणि किती नाती सुटली, याचाही ऊहापोह होणे महत्त्वाचे आहे. महत्त्वाकांक्षा असणे महत्त्वाचे आहे. ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम करणे, कामात झोकून देणे गरजेचे आहे. पण, प्रगती किंवा ध्येय केवळ ऐहिक मूल्यांमध्ये मोजू नये. भौतिक वस्तू किती आणि त्याचा दर्जा, हेच मापदंड डोळ्यांसमोर धरून आपण यशस्वी की अयशस्वी हे ठरवू नये.
मनुष्याची वाढ ही शारीरिक, आर्थिक तर हवीच, पण त्याचबरोबर बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिकही असायला पाहिजे. यशाचे मापदंड या सगळ्या स्तरांवर मोजवेत. केवळ ऐहिक प्रगतीच्या पथावर चालता-चालता इतर स्तरांवर अधोगती होऊ शकते-होते. शारीरिक व्याधी मानसिक संतुलन, भावनिक शून्यता बधिरता या गोष्टी उत्पन्न होतात. बरेचदा ‘अतिराग’ या धारणीय वेगात वाहात गेलेली व्यक्ती एकाकी असते. त्याते यश साजरे करण्यासाठी इतर कोणी बरोबर उरलेलेच नसते आणि यशाची परिसीमा जरी गाठली, तरी ती गाठल्यावर रिकामेपणा, एकाकीपणा, असमाधानी अवस्था उत्पन्न होऊ शकते. बरेचदा पहिला क्रमांक पटकावतानाच्या शर्यतीत इतरांना मागे सोडतात, त्यांना दुखावले जाते, फसवले जाते, हिणवले जाते, नातेसंबंध कायमस्वरूपी बिघडू शकतात. ‘अतिराग’ या शब्दातच ‘अति’ म्हणजे ’Over' हा अर्थ समजतो.
'Over ambitious over achievers' या वर्गातील व्यक्ती बरेचदा हवे ते मिळविण्यासाठी येन-केन-प्रकारेण (जसे होईल तसे, नैतिक मूल्य सांभाळून अथवा धुडकावून) ध्येयपूर्ती, प्राप्ती करतात. पण, त्याची बोच कालांतराने त्या व्यक्तीला होतच राहते. ते यश शिखर मिळाले, तरी ते साजरे करतेवेळी स्वतःचेच मन स्वतःला खात असते. रजोगुण वाढला की चंचलता अस्थिरता, चिडचिड वाढते. याचा परिणाम आरोग्यावर होतो. रक्तदाब अकाली वाढणे, मधुमेह जडणे, मायग्रेन तक्रारी उत्पन्न होणे, झोपेचे खोबरे होणे, एकाग्रता कमी होणे, कशातच मन न लागणे, सतत गतिशील, कार्यशील राहणे आणि अकाली थकून वार्धक्य लवकर येणे इ. गोष्टी घडतात.
हल्ली जगात याचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. अशा व्याधींची, लक्षणांची चिकित्सा केवळ औषधोपचार नव्हेत. शरीर आणि मनाचा जो परस्पर संबंध आहे, तो पुनःप्रस्थापित करणे, हे महत्त्वाचे आहे. आपला प्रवास, आपली प्रगती यांबद्दल चिंतन, मनन न करणे (वेळोवेळी) गरजेचे आहे. मानसिक स्थिरतेसाठी जीवनशैलीत बदल करणे खूप गरजेचे आहे. Contentment (समाधानी) वृत्ती अंगीकारणे हे अतिरागावर मात करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.(क्रमशः)
वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429