पुण्यात विषारी दारूने घेतले १५ बळी; एक जण ताब्यात, मुख्यमंत्र्यांचे दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश
29-May-2026
Total Views |
पुणे : (Pimpri-Chinchwad Illegal Liquor Sales) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मृत्यूंची मालिका सुरू झाल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. आतापर्यंत 15 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक नागरिक विविध रुग्णालयांत गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ या भागांत हे मृत्यू झाले आहेत. हातभट्टीची स्पिरिटयुक्त दारू प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या गंभीर प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
या प्रकरणी योगेश वानखेडे नावाच्या सराईत दारू विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात गावठी दारूसाठी स्पिरिट पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहेे. सध्या पोलिसांकडून योगेश वानखेडे याची सखोल चौकशी सुरू आहे.
परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. विषारी दारुमळेच हे मृत्यू झाले असा नागरिकांनी केला. मात्र याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दावा आहे की 8 पैकी 5 नागरिकांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाला. त्यामुळे मृत नागरिक आणि सध्या उपचार सुरू असलेल्या व्यक्तींची प्रकृती दारू प्यायल्याने बिघडली होती का? हे स्पष्ट झालेले नाही. या मृत्यूमागचे नेमके कारण वैद्यकीय अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.(Pimpri-Chinchwad — Illegal Liquor Sales)
"या घटनेतील पीडीत रूग्णांना योग्य उपचार देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेच्या पाठीमागे कोण आहेत याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. आठ जणांना अटक झाली आहे. सगळी साखळी शोधून आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारे हत्याच आहे. त्यामुळे कठोर कलमे त्यांच्यावर लावण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत"
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देणार
"मृत पावलेले सगळे कष्टकरी होते, हातावरची पोट होती. सर्व पीडीत कुटूंबाच्या दुखात आम्ही सहभागी आहोत. देवाभाऊंच्या राज्यात या प्रकरणातील गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होईल. पीडित कुटूंबांना न्याय मिळवून दिला जाईल."
- उमा खापरे, आमदार
"घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृतांची कुटूंबीयांना योग्य ती मदत मिळायलाच हवी. अवैध दारू विक्रीवर तात्काळ कारवाई व्हावी आणि यापाठी असलेल्या गुन्हेगाराला कठोर सजा व्हायला हवी. कुणीही असा गुन्हा करण्याची हिंमत करणार नाही अशा रितीने गुन्हेगाराचा बंदोबस्त व्हावा."
राजू बनसोडे, नगरसेवक, पिंपरी चिंचवड
"व्यसनी व्यक्तीच्या कुटूंबाचे जे हाल होतात त्याचे शब्दांत वर्णन करू शकत नाही. आजच्या घटनेत तर लोक मृत्यूमुखी पडले आहेत. घटनेतील दोषींवर कारवाई व्हावी. शहरातील असे अवैध दारूचे अड्डे आणि त्याच्या विक्रीत गुंतलेल्या सर्वांवर तात्काळ कारवाई करायला हवी."