एकात्मिक सैनिक संकुल उभारणीसाठी राज्यपाल यांची मान्यता - अभिमन्यू पवार
29-May-2026
Total Views |
मुंबई : (Pandharpur Soldier Complex) पंढरपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी एकात्मिक सैनिक संकुल उभारणीसाठी राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची मान्यता मिळाली आहे अशी माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी शुक्रवार दि.२९ रोजी आपल्या एक्स हँडलवरून दिली आहे.
" पंढरपूर येथे एकात्मिक सैनिक संकुल उभारणीच्या प्रस्तावास राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याकडून सुमारे ५४.६१ कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आलेली आहे. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
प्रस्तावित एकात्मिक सैनिक संकुलामध्ये माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना निवास, भोजन, वैद्यकीय सुविधा, माहिती केंद्र तसेच इतर आवश्यक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. यामुळे पंढरपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या हजारो माजी सैनिकांना मोठा दिलासा मिळणार आहे."असे प्रतिपादन यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.
"पंढरपूर येथे आषाढी, कार्तिकी आणि माघी एकादशी तसेच महिना वारीच्या काळात लाखो भाविकांप्रमाणेच मोठ्या संख्येने माजी सैनिकही पंढरपूरला भेट देतात.मात्र, या काळात माजी सैनिकांसाठी स्वतंत्र, सन्मानजनक आणि सुरक्षित निवास व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत होते.
देशसेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या या सैनिकांना दर्शनासाठी येताना निवासाची चिंता भेडसावते ही बाब निश्चितच चिंताजनक होती.
ही समस्या लक्षात घेऊन मी माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पंढरपूर येथे माजी सैनिकांच्या निवासासाठी स्वतंत्र भक्तनिवास उभारण्याची निवेदनाद्वारे मागणी केली होती. या मागणीची सैनिक कल्याण विभागाने सकारात्मक दखल घेतली असून या कार्याला आता गती मिळणार आहे." असेही पवार म्हणाले आहेत.(Pandharpur Soldier Complex)