मुंबई : (NCPA) साहित्यसृष्टी आणि रंगभूमीच्या सर्जनशील अविष्कारातून साकार झालेला .'शब्द कल्पिताचे: न पाठवलेली पत्रे’ हा विशेष कार्यक्रम दि. २८ मे रोजी एनसीपीएच्या गोदरेज थिएटर येथे सायंकाळी संपन्न झाला. शब्द कल्पिताचे म्हणजे आपल्यात नसलेल्या; पण ज्यांच्याशी संवाद साधायला आपल्याला मनापासून आवडलं असतं अशा व्यक्तींना लिहिलेली पत्रं. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि सांगीतिक विश्व समृद्ध करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना आजच्या अभ्यासकांनी लिहिलेल्या पत्रांचा अनोखा ग्रंथ शब्द मल्हार प्रकाशनाचे संपादक स्वानंद बेदरकर यांनी संपादित केला आहे. या ग्रंथातील निवडक पत्रांचे वाचन ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, ज्येष्ठ कथालेखिका मोनिका गजेंद्रगडकर आणि शब्द मल्हार प्रकाशाचे संपादक स्वानंद बेदरकर यांनी केले.
कवी कुलगुरू कालिदासांपासून ते नामदेव ढसाळंपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांना या ग्रंथामध्ये अनेक दिग्गजानी पत्र लिहिले आहेत. स्वानंद बेदरकर म्हणतात की या ग्रंथाच्या माध्यमातून मोठी माणसं लिहीती झाली आणि त्यांच्या लिहिण्यातून प्रत्येक पत्रा मागे असलेली त्यांची उत्कटता मनाला स्पर्शून गेली त्यांच्या लेखणीतले लालीत्य प्रकट झाले. सदर कार्यक्रमात डॉ. अरुणा ढेरे यांनी समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांना लिहिलेल्या पत्राचे वाचन केले. स्वानंद बेदरकर यांनी ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी बा. सी. मर्ढेकरांना लिहिलेल्या पत्राचे वाचन केले. मोनिका गजेंद्रगडकर यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या सुरबहार वादक अन्नपूर्णा देवींना लिहिलेल्या पत्राचे वाचन केले. आपल्या सर्जनशील अभिव्यक्तीच्या माध्यमातून उलगडणार्या शब्दरत्नांनी सबंध परिसर मंत्रमुग्ध झाला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पेज टू स्टेज उपक्रमाच्या समन्वयक सुजाता जाधव यांनी केले. त्याच बरोबर सर्व पत्रांना एका धाग्यात गुंफण्याचे काम पियू आरोळे यांनी केले.