डेक्कन एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड;मध्य रेल्वेची पुण्याकडे जाणारी वाहतूक दीड तास खोळंबली

Total Views |
Mumbai Pune Railway Route
 
मुंबई : (Mumbai Pune Railway Route) मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवार , दि.२९ मे रोजी मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. वांगणी-नेरळ स्थानकांदरम्यान सकाळी 8.41 वाजता गाडी क्रमांक 11007 सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस अचानक थांबली. डिझेल इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे रेल्वेगाडी सुमारे दीड तास जागीच उभी राहिली.
 
डेक्कन एक्स्प्रेस सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून पुण्यासाठी रवाना झाली होती. कल्याण स्थानकावर ती आधीच 16 मिनिटे उशिराने पोहोचली होती. त्यानंतर पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू असताना वांगणी–नेरळदरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाला. रेल्वेगाडी अचानक थांबल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवासी डब्यांमधून बाहेर पडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते.
 
या घटनेचा परिणाम केवळ डेक्कन एक्स्प्रेसपुरता मर्यादित राहिला नाही. कल्याण–कर्जत–खोपोली मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्या. सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या उशिराने धावल्या, तर काही धीम्या लोकलना अर्धजलद किंवा जलद मार्गावर वळविण्यात आले.
 
 
त्यामुळे वांगणी, भिवपुरी आणि कर्जत परिसरातील स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. तसेच कसारा आणि कर्जतहून मुंबईकडे येणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला. (Mumbai Pune Railway Route)
 
घटनेनंतर ट्रेन व्यवस्थापकाने सकाळी 8.55 वाजता सहाय्यक इंजिनाची मागणी केली. कर्जतहून सकाळी 9.25 वाजता सहाय्यक इंजिन रवाना करण्यात आले आणि ते 10.05 वाजता घटनास्थळी पोहोचले. बिघाडग्रस्त रेल्वेला हे इंजिन जोडून सकाळी 10.17 वाजता पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या घटनेमुळे अनेक प्रवाशांना दोन तासांहून अधिक विलंबाचा सामना करावा लागला. मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.(Mumbai Pune Railway Route)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.