मुंबई : (Maharashtra School Education Department) राज्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत गणवेश योजनेत सुधारणा करण्यात आली आहे. यापुढे महिला बचत गटाकडे शिलाईचे काम देणे बंधनाकारक करण्यात आले असून कापडाच्या दर्जाबाबतही कडक निर्देश देण्यात आले आहेत. शुक्रवारी, शालेय शिक्षण विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
या शासन निर्णयानुसार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक यांच्या नियंत्रणाखाली शिक्षणाधिकारी किंवा प्रशासन अधिकारी यांनी जिल्ह्यातील गावागावांमध्ये सर्व गणवेश पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच मोफत गणवेश योजनेंतर्गत वाटप करण्यात येणारे गणवेश विद्यार्थी शाळेत नियमित परिधान करत असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी करताना गणवेशाचे कापड चांगल्या दर्जाचे, विद्यार्थ्यांच्या शरीराला किंवा त्वचेला इजा न करणारे १०० टक्के पॉलिस्टर नसलेले कापड म्हणजे किमान ७०:३० किंवा ८०:२० पॉलिस्टर व्हिस्कोस कॉटन मिश्रित असावे.
शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी पात्र विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश वाटप करण्यात यावे. विद्यार्थ्यांचे गणवेश स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिवून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर महिला बचत गट शिलाईसाठी उपलब्ध नसतील त्या ठिकाणी आजुबाजूच्या क्षेत्रातील बचत गटाकडून गणवेश शिलाई करुन घेण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.(Maharashtra School Education Department)
शाळा व्यवस्थापन समितीमार्फत पहिल्या दिवशी फोटो काढण्यासाठी काही विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप प्रारंभिक स्वरुपात करण्यात येते व शिल्लक गणवेशाचे वाटप विलंबाने करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास येते, असे होवू नये याबाबतची दक्षता घेण्यात यावी, असेही या शासन निर्णयात म्हटले आहे.
स्काऊट गाईडसाठी स्वतंत्र गणवेश
विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या गणवेशामध्ये एक गणवेश प्राधान्यक्रमाने स्काऊट गाईड विषयास अनुरुप असावा. स्काऊट गाईड करीता मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळा रंगाची हाफ पॅन्ट आणि मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असलेला पिनो फ्रॉक व ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाचा व कमीज आकाशी रंगाचा अशी गणवेशाची रचना असावी.
...तर कारवाई होणार
सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या गणवेशाची गुणवत्ता चांगली असल्याची खात्री करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील किमान १० शाळांची तपासणी करणे बंधनकारक राहील. ज्या शाळेमधील गणवेशाच्या कापडाची गुणवत्ता कमी असल्याचे निदर्शनास येईल तिथल्या कापडाचा नमूना घेऊन तात्काळ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा.
तपासणी दरम्यान कापडाचा दर्जा निकृष्ट आढळून आल्यास कापड पुरवठादार व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावर शिक्षणाधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करावी. विद्यार्थ्यांना आणखी चांगल्या दर्जाचा गणवेश पुरविण्यासाठी शासनाच्या अनुदानाव्यतिरीक्त शाळा व्यवस्थापन समितीस त्यात योगदान देता येईल. अथवा सीएसआर मधून वाढीव निधी उपलब्ध करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समित्यांनी प्रयत्न करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.(Maharashtra School Education Department)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....