तुष्टीकरणाला अखेर चाप बसलाच; ‘रेड रोड’वर यंदा नमाज नाही!

    29-May-2026   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सत्ताकाळात कोलकातातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘रेड रोड’ रस्त्याचे चित्र काही वेगळेच असायचे. मुस्लिम मतपेढीला आकर्षित करण्यासाठी आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाअंतर्गत या प्रमुख व्हीआयपी मार्गाला ईदच्या नमाजासाठी तासन्तास पूर्णपणे बंद ठेवले जात असे. मात्र शुभेंदू अधिकारी यांचे सरकार आल्यानंतर या रस्त्याची कहाणी पूर्णपणे बदलल्याचे दिसतेय. १९७८ नंतर तब्बल १०७ वर्षांनी रेड रोडवर नमाज अदा करण्यात आली नाही.
 
ईदच्या दिवशी ममता बॅनर्जी स्वतः मंचावर उपस्थित राहत, ज्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन सेवा तसेच कार्यालयात जाणारे सामान्य नागरिक प्रचंड वाहतूक कोंडीत अडकायचे. ब्रिटिशकालीन हा ऐतिहासिक रस्ता, जो कधीकाळी दुसऱ्या महायुद्धात लढाऊ विमानांच्या लँडिंगसाठी वापरला जात होता; तो प्रशासकीय निमय धाब्यावर बसवून जणू काही बंदिस्त केला जात होता.

 
२०२६ मध्ये राज्यातील सत्तांतरानंतर एक नवे चित्र समोर आले. शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कायदा आणि नागरिक सुविधांना प्राधान्य दिले. सरकारने मोठा आणि व्यावहारिक निर्णय घेत ईदची मुख्य नमाज रेड रोडवरून हटवून जवळील ब्रिगेड परेड ग्राउंडवर हलवली. त्यामुळे अनेक वर्षांनंतर ईदच्या दिवशी रेड रोड पूर्णपणे मोकळा आणि वाहतुकीसाठी सुरू राहिला.

 
प्रशासनाच्या या निर्णयाचे काही धार्मिक नेत्यांनीही स्वागत केले, कारण नमाज अदा करणाऱ्यांना अधिक मोकळी जागा मिळाली आणि शहराची जीवनवाहिनी कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहिली. हा बदल स्पष्टपणे दाखवतो की एका बाजूला वर्षानुवर्षे धर्म आणि राजकारणाला कायद्यापेक्षा वरचे स्थान देण्यात आले, तर दुसऱ्या बाजूला सुजाण प्रशासनाने धार्मिक श्रद्धेचाही सन्मान राखला आणि कोलकात्यातील सामान्य नागरिकांना तासन्तास चालणाऱ्या वाहतूक कोंडीतून कायमची मुक्ती मिळवून दिली.
 
दोन्ही सरकारमधील मोठा फरक!
 
ममता बॅनर्जी सरकार शुभेंदू अधिकारी सरकार
१) धर्म आणि मतपेढीला कायद्यापेक्षा वरचे स्थान १) प्रशासनिक सुधारणांना प्राधान्य
२) कायदा आणि शहरी व्यवस्थेला डावलून मुस्लिम मतदारांना खूश करण्याचे राजकारण २) कायदा आणि नागरिक सुविधा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमापेक्षा श्रेष्ठ
३) अत्यंत संवेदनशील, लष्करी दृष्ट्या महत्त्वाच्या आणि मुख्य वाहतूक मार्गावर तासन्तास नमाज ३) सरकारकडून परंपरेवर पूर्ण बंदी न आणता जवळील 'ब्रिगेड परेड ग्राउंडवर' नमाज पठणाची व्यवस्था





ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक