सर अहमद (वय ५४) आणि तिची मुलगी झैनब अहमद (वय ३१), तर जनाई सफार (वय ३२) या महिला ऑस्ट्रेलियाच्या नागरिक होत्या. काही वर्षांपूर्वी त्या सीरियाला गेल्या आणि पुन्हा काही दिवसांपूर्वी त्या ऑस्ट्रेलियामध्ये परतल्या. मात्र, ऑस्ट्रेलियन पोलिसांनी त्या तिघींना सिडनीच्या विमानतळावरच अटक केली. सरकारने त्यांच्यावर दहशतवादाचे आणि मानवतेविरुद्धचे गुन्हे दाखल केले आहेत.
सीरियाला जाण्यापूर्वी त्या तिघी ऑस्ट्रेलियाच्या नागरिक होत्या. ऑस्ट्रेलियामध्ये राहणे, खाणे आणि सगळ्या सुखसोयीही उपभोगत होत्या. मात्र, त्यांचा जीव तुटत होता, तो ‘इस्लामिक स्टेट’साठी. जगात इस्लामचे राज्य यावे, अशी इच्छा त्या ऑस्ट्रेलियात बसून करू लागल्या. ‘इसिस’ ही दहशतवादी संघटना जगभरात इस्लामचे राज्य आणू शकते, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे त्या थेट सीरियाला पोहोचल्या. तिथे ‘इसिस’च्या दहशतवाद्यांशी ‘निकाह’ केला. त्यांनी तिथे एका महिलेला गुलामही बनवले. तिचे शारीरिक-मानसिक शोषण केले. ‘इसिस’चे दहशतवादी निरपराध नागरिकांचे बळी घेत होते, निष्पाप मुली-महिलांवर सामुदायिक बलात्कार करत होते, त्यांचा लैंगिक छळ-शोषण करत होते. या महिलांना त्यात काही वावगे वाटले नाही. उलट, त्या ‘इसिस’च्या दहशतवाद्यांच्या ‘बेगम’ म्हणून तिथे राहिल्या. त्यांच्या गरजा भागवत राहिल्या. थोडक्यात, दहशतवाद्यांना मदत करत राहिल्या. ‘इसिस’चे दहशतवादी एक दिवस पूर्ण जगावर सत्ता गाजवतील आणि त्यामुळे आपणही दिमाखात राहू, असे त्यांना वाटायचे. पण, ‘इसिस’वर कारवाई झाली. ‘इसिस’चे म्होरके एकामागोमाग कारवाईत मारले गेले. त्यातच इस्लामिक देशामधूनच नाही, तर युरोपीय आणि आशिया खंडातूनही अनेक नव्या-नव्या मुस्लीम दहशतवादी संघटना निर्माण झाल्या. त्यांनी ‘इसिस’ला शह द्यायला सुरुवात केली. ‘इसिस’वर हल्ले केले. यामुळे तर ‘इसिस’ची वाताहत झाली. जगात इस्लामिक सत्ता आणण्याऐवजी ‘इसिस’चाच विनाश होत आहे, असे दृश्य दिसू लागले. दहशतवाद्यांच्या ‘बेगम’ म्हणून या महिलांनाही कारवाईअंतर्गत सीरियाच्या छावण्यांमध्ये ठेवण्यात आले. दहशतवादी मानसिकतेतूनच त्या दहशतवाद्यांच्या बायका झाल्या होत्या. त्या ऑस्ट्रेलियाला परतल्या. मात्र, त्या एकट्या आल्या नाहीत; तर दहशतवाद्यांशी संबंध ठेवून जन्मलेली पोरेबाळे घेऊन त्या परतल्या. जगात ‘शरियाराज’ यावे, म्हणून ‘इसिस’च्या दहशतवाद्यांची साथ देणार्या या महिला, ऑस्ट्रेलियात परतल्यावर त्यांना उपरती झाली असेल का की, ‘इसिस’चा दहशतवाद मानवतेला कलंक आहे? नक्कीच नाही.
त्यामुळेच ऑस्टे्रलिया सरकारने त्यांना अटक केली. ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री टोनी बर्क यांनी तर स्पष्टच केले की, या महिलांनी स्वतःहून एका धोकादायक दहशतवादी संघटनेत सामील होण्याचा भयानक निर्णय घेतला होता. ज्यांनी गुन्हे केले आहेत, त्यांना २५ वर्षांपर्यंतच्या कडक कारावासाची शिक्षा होऊ शकते, तर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅन्थोनी अल्बानीज म्हणाले की, "इसिस’बद्दल सहानुभूती बाळगणार्यांबद्दल माझ्या मनात केवळ तिरस्कार आहे.”
असो. ऑस्ट्रेलियामध्ये तीन-चार टक्के मुस्लीम आहेत. त्यातल्या बहुसंख्याकांच्या निष्ठा मुस्लीम देशांच्या चरणीच. ऑस्ट्रेलियामध्ये अनेकदा दहशतवादी हल्लेही झाले. इतकेच नाही, तर २०१४ ते २०१९ दरम्यान ऑस्ट्रेलियातील जवळपास २३०हून अधिक नागरिक सीरिया आणि इराकमध्ये युद्ध लढण्यासाठी गेले होते. या सगळ्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने दहशतवाद्यांविरोधात कडक पाऊल उचलले. जर दुहेरी नागरिकत्व असलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकाने परदेशात जाऊन दहशतवादी कृत्यांमध्ये भाग घेतला, तर ऑस्ट्रेलिया त्याचे नागरिकत्व रद्द करतो. त्या देशामध्ये संशयितांवर कडक नजर ठेवली जाते. दहशतवादी संघटनांमध्ये सामील होणे किंवा त्यांचा प्रचार करणे, हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांना आसरा देणार्या ऑस्ट्रेलियाला इस्लामिक दहशतवादाची झळ चांगलीच जाणवत आहे. शेवटी काय, कर्म आपल्याकडे परत येते. जसे पाकिस्तानचे दहशतवादी कर्म त्याच्याकडे परतले, तसेच ऑस्ट्रेलियाचे झाले म्हणायचे! त्यामुळेच तर ‘इसिस’च्या दहशतवाद्यांच्या ‘बेगम’ त्यांच्या मुलाबाळांसकट ऑस्ट्रेलियात परतल्या. त्या तिघींची अटक हेच सांगते!
९५९४९६९६३८