जागतिक संकटकाळातही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत!- ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’चे शिक्कामोर्तब- जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याचा धोका व्यक्त
29-May-2026
Total Views |
नवी दिल्ली : (Indian economy) जागतिक अनिश्चिततेच्या काळात जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता असतानाच, भारताची आर्थिक वाढ मात्र सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’च्या एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, जागतिक पातळीवर अमेरिका आणि इराण संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने, अन्नधान्याच्या किमती वाढणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
जागतिक अनिश्चिततेच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सातत्याने सुरु असून, अनेक वैश्विक संघटना भविष्यातही भारताचा हा आर्थिक विकासाचा वेग कायम राहील, यावर अहवालामधून शिक्कामोर्तब करत आहेत. अलीकडेच ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’च्या एका सर्वेक्षणातूनही जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्थाच सर्वात मजबूत असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’मधील अर्थतज्ज्ञांच्या समूहाने जगभरातील विविध देशांच्या अर्थव्यवस्थांचा आढावा घेत, या अहवालामध्ये त्यांची निरीक्षणे मांडली आहेत.(Indian economy)
यामध्ये भारताबाबत निरीक्षण नोंदवताना, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास लक्षवेधी असल्याचे या समूहाने म्हटले आहे. या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या अर्थतज्ज्ञांपैकी बहुतांशी जणांचे येत्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबुतीने वाढणार असल्याच्या निष्कर्षावर एकमत झाले आहे. या अहवालामध्ये धोरणातील लवचिकता आणि सुरुवातीपासून सातत्याने पायाभूत सुविधा विकास, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि देशांतर्गत मागणी वाढण्यासाठी केलेल्या सरकारी प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले आहे.
तसेच या अहवालामध्ये भारताने सातत्याने बाजारपेठांच्या विस्ताराच्या केलेल्या प्रयत्नाचेही कौतुक करण्यात आले असून, भारताने त्याची धोरणात्मक भूमिका कायम ठेवताना लवचिकता दाखवत बाजरपेठा खुल्या करण्यास प्रोत्साहन दिल्याचेही म्हटले आहे. विविध देशांबरोबर केलेल्या मुक्त व्यापार करारांचा उल्लेखही या अहवालामध्ये करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरीही अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणामही भारतीय अर्थव्यवस्थेवरचा दबाव वाढत ़असल्याचेही या अहवालामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरचा दबाव वाढवत असून, दीर्घकाळ हा मार्ग बंद राहिल्याने अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे, तर सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या काही अर्थतज्ज्ञांनी जागतिक मंदीची भीतीही व्यक्त केली. त्याचप्रमाणे हा संघर्ष दीर्घकाळ सुरु राहिल्यास, जागतिक अर्थव्यवस्था ‘कोविड’ महामारीसारख्या संकटापर्यंत घसरण्याचा धोकाही या सर्वेक्षणामध्ये करण्यात आला आहे.(Indian economy)