हरितऊर्जा आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने भारताने ऐतिहासिक झेप घेत, देशातील पहिल्या स्वदेशी हायड्रोजन ट्रेनचे उत्पादन पूर्ण केले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘नेट झिरो उत्सर्जन’ या ध्येयांना गती देणारी ही रेल्वे, केवळ भारतासाठीच नव्हे, तर जागतिक हरित वाहतूक क्षेत्रासाठीही तितकाच महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. जगातील सर्वांत शक्तिशाली आणि सर्वाधिक क्षमतेची ‘ब्रॉडगेज’ हायड्रोजन ट्रेन विकसित करून भारताने तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात आपली दमदार उपस्थिती नोंदवली आहे. त्यानिमित्ताने हायड्रोजन रेल्वेचे विविधांगी पैलू उलगडणारा हा लेख...
भारताने शाश्वत वाहतुकीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत, देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या हायड्रोजनचलित ट्रेन-सेटचे उत्पादन नुकतेच पूर्ण केले आहे. संशोधन, डिझाईन आणि मानक संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेली ही ट्रेन ‘आत्मनिर्भर भारत’ आणि हरितऊर्जेच्या दिशेने भारताच्या वाढत्या वाटचालीचे प्रतीक ठरत आहे. विशेष म्हणजे, ‘ब्रॉडगेज’वरील ही जगातील सर्वांत लांब आणि सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन मानली जात आहे.
जिंद-सोनीपत मार्गावर दहा डब्यांची ‘हायड्रोजन फ्युएल सेल ट्रेन’ चालविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. १ हजार, २०० किलोवॅट इंजिनसह ताशी ७५ किमी वेगाने धावणार्या अत्याधुनिक ट्रेनसाठी हरियाणातील जिंद येथे विशेष हरित हायड्रोजन उत्पादन प्रकल्प उभारण्यात आला आहे. जिंद येथे हायड्रोजन साठवण आणि रिफ्युएलिंगसाठी स्वदेशी सुविधा उभारण्यात आली असून, ‘पेट्रोलियम अॅण्ड एस्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन’कडून आवश्यक परवानगीही देण्यात आली आहे.
‘इलेट्रोलिसिस’ प्रक्रियेद्वारे हायड्रोजननिर्मिती केली जाणार असून, ही पद्धत पर्यावरणपूरक आणि स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी ओळखली जाते. त्यामुळे हा प्रकल्प केवळ रेल्वे क्षेत्रापुरता मर्यादित न राहता, भारताच्या स्वच्छ ऊर्जा धोरणालाही नवे बळ देणारा ठरत आहे. या प्रकल्पामध्ये सुरुवातीच्या डिझाईनपासून ‘प्रोटोटाईप’निर्मितीपर्यंत, तसेच भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच ‘हायड्रोजन ट्रॅशन तंत्रज्ञान’ विकसित करण्याचे काम करण्यात आले आहे. सध्या हा प्रकल्प प्रायोगिक स्तरावर विकसित करण्यात आला आहे.
ट्रेनची वैशिष्ट्ये ठरली जगासाठी आकर्षण
भारतात विकसित करण्यात आलेल्या या हायड्रोजन ट्रेन-सेटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असलेली ही रेल्वे भारतीय अभियांत्रिकी क्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण मानली जात आहे. हायड्रोजन ट्रेन विकसित करण्यासाठी भारतीय रेल्वेने डिझाईन, ‘प्रोटोटाईप’निर्मिती आणि पूर्णपणे नवीन ‘ट्रॅशन प्रणाली’ विकसित करण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया देशांतर्गत पार पाडली.
सध्या ही तंत्रज्ञान प्रणाली चाचणीच्या टप्प्यात असल्याने तिची पारंपरिक इंधन प्रणालींशी थेट तुलना शय नसली, तरी मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाल्यानंतर खर्चात लक्षणीय घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय रेल्वेच्या या उपक्रमामुळे स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरणपूरक वाहतूकव्यवस्थेकडे भारताची वाटचाल अधिक वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरात हायड्रोजन तंत्रज्ञान हे भविष्यातील वाहतुकीचे प्रमुख माध्यम मानले जात असताना, भारताने त्यात घेतलेली आघाडी विशेष महत्त्वाची ठरत आहे.
राष्ट्रीय हरितऊर्जा मोहिमांशी सुसंगत पाऊल
ही संकल्पना भारताच्या विविध हरितऊर्जा आणि पर्यावरणीय उद्दिष्टांशी सुसंगत आहे. त्यामध्ये ‘अॅडव्हान्स केमिस्ट्री सेल (अउउ) बॅटरी’ उपक्रम ‘पॅरिस हवामान करार २०१५’मधील उत्सर्जन कमी करण्याची उद्दिष्टे यांचा समावेश आहे. दीर्घ पल्ल्याच्या वाहतुकीत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हायड्रोजन तंत्रज्ञान भविष्यात निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
‘नेट झिरो’च्या दिशेने भारतीय रेल्वेची गती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय रेल्वेला २०३० पर्यंत ‘नेट झिरो उत्सर्जन’ साध्य करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, रेल्वेचे झपाट्याने होणारे विद्युतीकरण, अक्षय ऊर्जेचा वाढता वापर आणि मालवाहतुकीत रस्त्यांऐवजी रेल्वेचा वाढता सहभाग यांमुळे भारतीय रेल्वे पहिल्या टप्प्यातील ‘नेट झिरो उत्सर्जना’चे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. याचबरोबर ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ या उपक्रमांतर्गत ‘भारतीय रेल्वे पर्यायी इंधन संघटने’मार्फत ३५ हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील वारसा रेल्वेमार्ग आधुनिक हरित तंत्रज्ञानाशी जोडले जाणार आहेत.
हरित वाहतूक व्यवस्थेकडे जगाची मोठी झेप
जागतिक स्तरावर वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक आणि शून्य-उत्सर्जन वाहतूक व्यवस्थेकडे जगभरातील देशांचा कल वाढत असून, हायड्रोजनवर चालणार्या इंजिनांच्या बाजारपेठेला मोठी चालना मिळत आहे. रेल्वे, विमानवाहतूक, रस्ते वाहतूक आणि सागरी वाहतूक क्षेत्रात ‘हायड्रोजन फ्युएल सेल’ तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून आगामी काळात ही बाजारपेठ वेगाने विस्तारण्याची शयता व्यक्त केली जात आहे.
हायड्रोजन इंजिन बाजारपेठेचे वर्गीकरण स्थापना, तंत्रज्ञान, वापर, प्रोपल्शन आणि भौगोलिक क्षेत्रानुसार करण्यात आले आहे. रेल्वे, हवाई मार्ग, रस्ते मार्ग आणि जलमार्ग या क्षेत्रांमध्ये ‘हायड्रोजन फ्युएल सेल’चा वापर वाढताना दिसत आहे. विशेषतः इलेट्रिक आणि ‘हायब्रिड प्रोपल्शन’ प्रणालींमध्ये या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
या क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये ‘सीमेन्स’, ‘टोयोटा मोटर कॉर्पोरेशन’, ‘अल्स्टोम’, ‘हिताची लि.’, ‘कमिन्स’ आणि ‘बॅलार्ड पॉवर सिस्टम्स’ यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या हायड्रोजनवर आधारित इंजिन आणि फ्युएल सेल तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत.
जागतिक स्तरावर सरकारी प्रोत्साहनात वाढ
सरकारांकडून मिळणारे प्रोत्साहन हे या बाजारपेठेच्या वाढीमागील प्रमुख कारण मानले जात आहे. अनेक देशांनी २०३० ते २०४० दरम्यान पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर बंदी घालण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. जपान सरकारने २०३० पर्यंत आठ लाख फ्युएल सेल वाहने आणि ९०० ‘हायड्रोजन रिफ्युएलिंग स्टेशन’ उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जर्मनीतही हायड्रोजनवर चालणार्या रेल्वे तंत्रज्ञानासाठी संशोधन आणि विकास प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जात आहे. वाहतूक क्षेत्रात ‘हायड्रोजन फ्युएल सेल’ वाहनांची मागणी वाढण्यामागे त्यांची लांब पल्ल्याची क्षमता, जलद रिफ्युएलिंग, कमी आवाज आणि शून्य हरितगृह वायू उत्सर्जन ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक, व्यावसायिक वाहतूक आणि औद्योगिक वापरासाठी हे तंत्रज्ञान अधिक उपयुक्त ठरत आहे.
हायड्रोजननिर्मिती समोरील आव्हाने
तथापि, हायड्रोजननिर्मिती आणि साठवणुकीचा खर्च अजूनही मोठे आव्हान आहे. ‘इलेट्रोलिसिस’ प्रक्रियेद्वारे हायड्रोजन तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागते. तसेच हायड्रोजन कमी घनतेचा असल्यामुळे त्याचे उच्च दाबाखाली किंवा अति शीत तापमानात साठवण आणि वाहतूक करावी लागते. त्यामुळे या तंत्रज्ञानासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक ठरते. दरम्यान, युरोप आणि उत्तर अमेरिकेत कठोर उत्सर्जन नियम लागू होत असल्याने वाहन उत्पादक कंपन्या पर्यायी स्वच्छ तंत्रज्ञानाकडे वळत आहेत.
भारताची दमदार एन्ट्री
भारताची पहिली ‘हायड्रोजन ट्रेन’ ही केवळ रेल्वे क्षेत्रातील प्रगती नसून स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण संरक्षण आणि ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊल आहे. जगातील सर्वांत शक्तिशाली आणि लांब ‘ब्रॉडगेज’ हायड्रोजन ट्रेन विकसित करून भारताने हरित वाहतुकीच्या जागतिक शर्यतीत आपली दमदार उपस्थिती नोंदवली आहे. आगामी काळात ही तंत्रज्ञानक्रांती भारतीय रेल्वेच्या नव्या हरित युगाची सुरुवात ठरणार आहे.
हायड्रोजन रेल्वेची ठळक वैशिष्ट्ये
- पूर्णपणे भारतीय बनावटीची
- दहा डब्यांची रेल्वे
- दोन १,२०० किलोवॅट ड्रायव्हिंग पॉवर कार
- एकूण २,४०० किलोवॅट ट्रॅशन पॉवर
- २,६०० हून अधिक प्रवासी क्षमता
- ‘ब्रॉडगेज’वरील जगातील सर्वाधिक क्षमतेची हायड्रोजन ट्रेन
- शून्य-कार्बन उत्सर्जन
- फक्त पाण्याच्या वाफेचे उत्सर्जन
- स्वच्छ आणि हरित रेल्वे वाहतुकीतील महत्त्वपूर्ण तांत्रिक क्रांती