मुंबई : (Hindutva Organization) मध्य प्रदेशातील रतलाम येथे गुरुवार, २८ मे रोजी गोवंशाचे कापलेले शीर आढळून आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली असून कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चक्काजाम करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनादरम्यान हनुमान चालीसाचे पठणही करण्यात आले.
आंदोलकांनी नगर निगमवर निष्काळजीपणाचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. आंदोलक गनी शक्तावत यांनी सांगितले की, हे केवळ अवशेष नव्हते तर गायीच्या शरीराचा अर्धा भागच होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल तसेच परिसरातील अवैध झोपड्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, हा परिसर नगर निगम आणि खासगी जमिनींच्या मिश्र भागात येतो आणि यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना येथे घडल्या आहेत. प्रशासनाने अवैध बांधकामे हटवून जबाबदारांवर कारवाईची प्रक्रिया लवकर पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिसरात तणाव कायम आहे. पोलिस आणि प्रशासन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत असून संपूर्ण प्रकरणाची विविध अंगांनी चौकशी सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.(Hindutva Organization)
उज्जैनमध्ये देखील घराबाहेर सापडले मांसाचे तुकडे
उज्जैन येथे एका हिंदू कुटुंबाच्या घराबाहेर मांसाचा तुकडा आढळल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरुवार, २८ मे रोजी बकरी ईदच्या दिवशी सकाळी घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी हा प्रकार ईदच्या निमित्ताने हिंदूंना त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. अशी माहिती आहे की, गांधीनगर परिसरातील स्नेहलता गुप्ता यांना घराबाहेर साफसफाई करते वेळी गेटजवळ प्लास्टिकच्या पिशवीत मांसाचे तुकडे पडलेले दिसले. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदवले असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, काही समाजकंटक परिसरातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.(Hindutva Organization)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक