कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ एवढे महत्वाचे का वाटते ?
29-May-2026
Total Views |
मुंबई : (Gokul Milk Association) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ. हे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात एवढे महत्त्वाचे का वाटते याचे कारण दडले आहे कोल्हापूर जिल्ह्यावर असलेल्या सहकार क्षेत्राच्या प्रचंड पकडीत. १६ मार्च १९६३ साली अवघ्या ५०० लिटर दूध संकलनाने गोकुळचा श्री गणेशा कै.आनंदराव पाटील चुयेकर यांनी केला.
आज घडीला ६२ वर्षापेक्षा जास्त काळ पूर्ण केलेल्या गोकुळचे रोजचे दूध संकलन १५ लाख लिटर पेक्षा जास्त आहे. यातूनच गोकुळची कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिक पकड लक्षात येते. जिल्ह्यातील प्रत्येक गावात असलेला दूध उत्पादक शेतकरी, त्याच्याकडून दूध संकलन करणारी दूध डेअरी , आणि दूध वितरक यांचे खूप मोठे जाळे आज उभे आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण सहकारावर चालते. त्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय म्हणून जनावरे पाळणे येतेच.(Gokul Milk Association)
ग्रामीण भागात दूध संकलित करत असताना ग्रामीण जमिनी क्षेत्रात काम करणारा शेतकरी यांच्याशी संवाद साधण्याचे आणि आपले राजकारण मजबूत करण्याचे ठिकाण म्हणजे दूध डेअरी. या दुध संस्थांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील नेतृत्व उभे राहत असते आणि मग ते सरपंच , पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पुढे आमदार या वेगवेगळ्या पदांपर्यंत पोहोचत असते. याची जाण जिल्ह्यात काम करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याला आहे.
जिल्ह्यातील नेते आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी एन पाटील ,अरुण नरके यांनी तब्बल वीस वर्षाहून अधिक काळ गोकुळचे नेतृत्व केले होते.वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे गोकुळची सध्याची सत्ता आहे. तर विरोधी बाजूस संचालिका शौमिका अमल महाडिक या खंबीरपणे विरोधकांची बाजू मांडत असतात.
तसेच माजी मंत्री प्रकाश आवाडे ,विद्यमान पालकमंत्री प्रकाश आबिटकर ,खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक,यांसह कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते गोकुळमध्ये सहभागी आहेत.
गोकुळमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक दृष्ट्या अत्यंत परिणामकारक बदल झाला आहे. तो इतका मोठा आहे की काही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या घराला गोकुळ हेच नाव दिले आहे.(Gokul Milk Association)