‘वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे’ निमित्त धारावीत विशेष शिबिर - सुमारे 2000 महिला आणि किशोरवयीन मुलींचे समुपदेशन; एनएमडीपीएलच्या ‘स्वास्थ्य साथी’ मोहिमेत 10 हजार महिलांचा सहभाग
मुंबई : (Dharavi Health Camp) ‘वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे’निमित्त धारावीत आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेत 2000 हून अधिक स्थानिक महिला आणि किशोरवयीन मुलींनी सहभाग नोंदवला. ‘नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या वतीने धारावी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स क्लब येथे गुरुवार, दि.२८ मे रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या जनजागृती शिबिरात मासिक पाळीतील स्वच्छता, महिला आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि तंदुरुस्तीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अशा विषयांबाबत जनजागृती करून स्थानिक महिला आणि किशोरवयीन मुलींसोबत मुक्त संवाद साधण्यात आला.
या शिबिरामध्ये, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (एफपीएआय) आणि टाटा मेमोरियल रुग्णालयातील समुपदेशक आणि कर्करोगतज्ज्ञांच्या वतीने विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. मासिक पाळी विषयीचे गैरसमज, कर्करोगासह विविध आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, योग्य वेळेत केलेल्या उपचारांचे महत्त्व अशा विविध विषयांबाबत जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले. (Dharavi Health Camp)
“धारावी स्वास्थ्य साथी’ उपक्रमाद्वारे आम्ही आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवण्याचे काम करत आहोत. महिलांना योग्य मार्गदर्शन, जागरूकता आणि आवश्यक आरोग्य संसाधने उपलब्ध व्हावीत, संकोच कमी व्हावा आणि त्यांचा अशा शिबिरांमध्ये सहभाग वाढावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत,” अशी प्रतिक्रिया एनएमडीपीएलच्या प्रवक्त्याने दिली.
“आपण केवळ स्वच्छतेबद्दल माहिती ऐकतो. मात्र, धारावीसारख्या ठिकाणी स्वच्छतेचा प्रत्यक्ष अवलंब करणे जिकिरीचे आहे. अशा प्रकाराच्या शिबिरांमुळे इथल्या महिला आणि मुलींना स्वतःची काळजी घेण्याचे धडे मिळतात".
- सलमा शेख, धारावीकर
“सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कोणताही संकोच न बाळगता आम्ही या शिबिरांमध्ये बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो.”
- रेखा यादव, धारवीकर
“धारावीसारख्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी लोकांना चांगल्या सवयी अंगीकृत करण्यासाठी वारंवार कम्युनिटी एंगेजमेंट आवश्यक आहे. इथल्या महिलांना योग्य तज्ज्ञांकडून, सुरक्षित वातावरणात उचित माहिती मिळाल्यास त्यांना चांगल्या आरोग्यदायी सवयी अंगवळणी पडतात. आणि अशा शिबिरांधून इथल्या महिलांच्या आरोग्याविषयी माहिती मिळते.”
- निशा शेट्टी, एफपीएआय, मुंबई (Dharavi Health Camp)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.