एल्फिन्स्टन उड्डाणपूल बंद झाल्याने दादरमध्ये मोठे वाहतूक बदल

    29-May-2026
Total Views |
Dadar Traffic Changes
 
मुंबई : (Dadar Traffic Changes) दादर पश्चिम आणि पूर्व भागाला जोडणारा एल्फिन्स्टन उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे दादर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. उड्डाणपूल बंद झाल्याने वाहनांचा संपूर्ण भार टिळक ब्रिज आणि करी रोड ब्रिजकडे वळला आहे. परिणामी, दादरमधील भवानी शंकर मार्ग आणि एस. के. बोले मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाहतूक पोलिसांनी २७ मे पासून या दोन्ही मार्गांवर तात्पुरत्या स्वरूपात 'एक दिशा मार्ग' (वन-वे) लागू केला आहे. हे आदेश २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत अंमलात राहतील.
 
 
​वाहतूक पोलीस उप आयुक्त (मुख्यालय व मध्य विभाग) दिपाली थाटे यांनी सांगितले, जनतेला होणारा त्रास आणि कोंडी टाळण्यासाठी मोटार वाहन अधिनियमांतर्गत हे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.
 
​वाहतूक बदल (Dadar Traffic Changes) आणि पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
 
​१. भवानी शंकर रोड: हा मार्ग आता केवळ हनुमान मंदिराकडून गोपीनाथ चव्हाण चौकाकडे (गोपीटँक) जाण्यासाठीच खुला राहील. गोपीनाथ चव्हाण चौकाकडून भवानी शंकर रोडने हनुमान मंदिराकडे येण्यास वाहनांना पूर्ण बंदी असेल. या दिशेने येणाऱ्या वाहनांनी गोपीनाथ चव्हाण चौकातून गोखले रोडने झाकादेवी जंक्शन, पोर्तुगीज चर्च जंक्शनवरून उजवे वळण घेऊन पुढे पानेरी जंक्शन आणि कोतवाल गार्डन मार्गानी कबूतरखान्याकडे जावे.
 
​२. एस. के. बोले मार्ग: हा रस्ता पोर्तुगीज चर्चकडून हनुमान मंदिराकडे येण्यासाठी 'वन-वे' करण्यात आला आहे. हनुमान मंदिराकडून वाहनांना पोर्तुगीज चर्चकडे जाता येणार नाही. पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालकांनी हनुमान मंदिर, भवानी शंकर रोडने कबूतरखाना, आगाशे पथ आणि बाबूराव परुळेकर मार्ग ओलांडून गोपीनाथ चव्हाण चौकातून गोखले रोडचा वापर करावा.
 
 
​बेस्ट बसेसच्या मार्गात बदल:
 
या वाहतूक बदलांमुळे दादरमधील 'बेस्ट' बस सेवांवरही मोठा परिणाम झाला आहे. ५६, ८८, ११०, १५१, १६४, १७१, २०१, ३०५, ३५७ आणि ५२ या बस मार्गांसह अनेक बसेस गोपीनाथ चव्हाण चौकातून भवानी शंकर रोडऐवजी गोपाळ कृष्ण गोखले मार्ग, पोर्तुगीज चर्च आणि एस. के. बोले रोडने हनुमान मंदिराकडे वळवण्यात आल्या आहेत. तसेच, एस. के. बोले रोड बंद असल्याने ६३, १६५, १६९, १७२ आणि ३८५ क्रमांकाच्या बसेस हनुमान मंदिरावरून भवानी शंकर रोडने पुढे गोपीनाथ चव्हाण चौकाकडे मार्गस्थ केल्या आहेत.
 
​दादर स्टेशनकडून कबूतरखान्याकडे येणारा मो. ची. जावळे मार्गही वाहतूक पोलिसांनी बंद केल्यामुळे बस क्रमांक ११८ आणि ८१४ चे मार्ग डिसिल्व्हा रोड आणि एन. सी. केळकर रोडमार्गे परावर्तित करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.(Dadar Traffic Changes)