मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तेलंगणातील हैदराबादमधून एक अत्यंत धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मुशीराबाद परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येते आहे. या व्हिडीओमध्ये बकरीदच्या निमित्ताने जनावरांची कुर्बानी दिल्यानंतर परिसरातील रस्ते रक्तरंजीत झाल्याचे दिसते आहे. हे भयावह आणि अस्वच्छ दृश्य बांगलादेश मार्केटपासून आसपासच्या हिंदू वसाहतींच्या रस्त्यांपर्यंत पसरल्याचे व्हिडिओतून कळते आहे. हा प्रकार पाहून स्थानिक हिंदू समाजात, विशेषतः महिलांमध्ये, प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
व्हिडिओ पाहिल्यास, महिलांचा संतप्त आवाज स्पष्ट ऐकू येत असून या प्रकारावर त्या तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियावरही तीव्र वाद निर्माण झालेत. हा व्हिडीओ सर्वप्रथम हैदराबाद भाजप लीगल सेलच्या अॅडव्होकेट नीलम भार्गव राम यांनी सोशल मिडियावर शेअर केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांचा संताप आणखी वाढला. अनेक युजर्सनी ‘पेटा इंडिया’ सारख्या संस्थांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. हिंदू सणांवर वारंवार भाष्य करणाऱ्या संस्था आता या कथित क्रूरता आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावर शांत का आहेत, असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या धार्मिक भावना आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमांचा पूर्णपणे अवमान झाल्याचा आरोप केला जातोय. धार्मिक प्रथांच्या नावाखाली बहुसंख्य समाजाला अशा प्रकारे त्रास देण्यास मोकळीक देता कामा नये, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गर्दीच्या शहरी भागांमध्ये अशा घटना सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक घडवल्या जात असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणावर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याची टीका होत आहे.