स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान : बारामती बसस्थानकाला प्रथम क्रमांक ; १ कोटी रुपयांचे बक्षीस

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान; लाखणी आणि अकोलेही राज्यात अव्वल; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Total Views |
Baramati Bus Stand
 
मुंबई : (Baramati Bus Stand) स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वच्छता, शिस्त आणि टापटीपपणाच्या संकल्पनांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या पुणे विभागातील बारामती बसस्थानकाने राज्यातील ‘अ’ वर्ग बसस्थानकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत’ १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळविले आहे.
 
खऱ्या अर्थाने ही कामगिरी अजितदादांच्या कल्पक, दूरदर्शी आणि कार्यक्षम कार्यशैलीला वाहिलेली आदरांजली असल्याचे भावनिक उद्गार परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काढले.
 
ते या अभियानाचा वार्षिक निकाल जाहीर करताना बोलत होते. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील ५४ बसस्थानकांना एकूण ३ कोटी रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. एसटी महामंडळाच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त, दि.१ जून रोजी मुंबई येथे या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर राबविण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाला’ राज्यभरातील बसस्थानकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानामुळे स्वच्छता, सुशोभीकरण, प्रवासी सुविधा आणि व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.
 
 
प्रादेशिक विभागनिहाय निकालात छत्रपती संभाजीनगर विभागातील औरसा नवीन, मुंबई विभागातील रत्नागिरी, नागपूर विभागातील चंद्रपूर, पुणे विभागातील बारामती, नाशिक विभागातील सटाणा आणि अमरावती विभागातील उमरखेड या बसस्थानकांनी आपल्या-आपल्या विभागात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. (Baramati Bus Stand)
 
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक ही केवळ स्पर्धा नसून प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याची व्यापक चळवळ आहे. राज्यातील प्रत्येक बसस्थानक आदर्श, स्वच्छ आणि प्रवासीहितैषी व्हावे, या उद्देशाने हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बसस्थानकांचा आदर्श इतरांनीही घ्यावा.” (Baramati Bus Stand)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.