राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच स्वा. वि. दा. सावरकर यांचे सरसंघचालकांशी उत्तम ऋणानुबंध होते. प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याशी सावरकरांचा पत्रव्यवहार आणि त्या दोघांच्या भेटीगाठी याचा सविस्तर लेखाजोखा डॉ. श्रीरंग गोडबोले यांच्या प्रदीर्घ लेखात मांडलेला आहेच. या पृष्ठावर द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांनी स्वा. सावरकर यांच्या निधनानंतर, दि. ५ मार्च १९६६ रोजी मुंबईच्या परळमध्ये नरे पार्क येथे आयोजित श्रद्धांजली सभेत केलेले संपूर्ण भाषण देत आहोत. त्यासोबतच तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी सावरकरांविषयी व्यक्त केलेले विचार आणि वर्तमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी अंदमानमधील सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी, डिसेंबर २०२५ केलेल्या भाषणाचा संपादित अंश देत आहोत.
धर्म स्थापनेचे नर| तेचि ईश्वराचे अवतार| झाले, आहेत, पुढे होणार॥
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत राष्ट्रीय जीवन, हिंदू राष्ट्र चिंतन, सैनिकी सामर्थ्य, भाषाशुद्धी, राष्ट्रस्वाभिमान आणि अखंड कर्तव्यनिष्ठा या विषयांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. माधव सदाशिव गोळवलकर यांनी अत्यंत प्रभावी विचार मांडले. दि. ५ मार्च १९६६ रोजी मुंबईतील नरे पार्क, परळ येथे सायंकाळी ५.३० वाजता झालेल्या या प्रकट सभेत स्वा. सावरकरांचे राष्ट्रनिष्ठ, त्यागमय आणि तेजस्वी जीवन स्मरणात ठेवत, त्यांच्या विचारांना कृतीत उतरविण्याचे आवाहन करण्यात आले. महापुरुषांना खरी श्रद्धांजली ही अश्रूंनी नव्हे, तर राष्ट्रकार्यासाठी अखंड प्रयत्नांनीच वाहिली जाते, हा संदेश या भाषणातून ठळकपणे श्रीगुरुजींनी मांडलेला दिसतो. त्यांच्या या श्रद्धांजली सभेतील विचारांचा हा संपादित...
प्रांतसंघचालक, इतर अधिकारीगण, स्वयंसेवक बंधू, उपस्थित बांधव तथा मातृशक्ती...
काही वर्षांपूर्वी मुंबई नगरीत एका कार्यक्रमात उपस्थित राहून बोलण्याची संधी मला मिळाली होती. तो प्रसंग स्वा. सावरकरांच्या जन्मोत्सवाचा होता. जन्मोत्सवाचा प्रसंग हा प्रत्यक्षात उत्सवाचाच प्रसंग असतो, आनंदाचा प्रसंग असतो. एखाद्या व्यक्तीने या पृथ्वीवर व्यतीत केलेल्या जीवनाचे अभिनंदन करताना, पुढेही दीर्घ काळ त्या व्यक्तीचा सहवास लाभावा, अशी आशा मनात असल्यामुळे तो प्रसंग सुखदायक असतो. आजचा प्रसंग मात्र त्याच्या अगदी विपरीत आहे. ज्या जीवनाच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत जन्मोत्सवाच्या प्रसंगी उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले होते, त्याच जीवनाच्या समाप्तीच्या प्रसंगी आज आपल्या समोर उपस्थित राहण्याचा हा विचित्र योग मला प्राप्त झाला आहे.
आपला हा प्राचीन समाज जितका जागृत आणि चेतनाशील आहे, तितकीच त्यामध्ये श्रेष्ठताही भरलेली आहे. आपल्या पूर्व-इतिहासातील असा एकही कालखंड दाखवता येणार नाही, की ज्यामध्ये एखाद्या असामान्य आणि अलौकिक महापुरुषाने जन्म घेऊन आपल्या राष्ट्राचे नाव उज्ज्वल केले नाही. अतिप्राचीन काळापासून ही उज्ज्वल परंपरा चालत आलेली आहे आणि पुढेही चालू राहणार आहे. आपल्या हिंदू सिद्धांतानुसार कोणतीही व्यक्ती श्रेष्ठतेचा अंतिम अविष्कार म्हणून जन्माला येत नाही; कारण तसे मानणे म्हणजे समाजाची नवनवीन श्रेष्ठ नररत्ने निर्माण करण्याची शक्ती संपली आहे, असे म्हणावे लागेल. परंतु, सर्व जाणकारांनी असेच सांगितले आहे की, ज्या समाजात अखंडपणे महापुरुष जन्माला आले आहेत, येत आहेत आणि पुढेही येणार आहेत, तो समाज खर्या अर्थाने जिवंत आणि समर्थ असतो.
श्रीसमर्थ रामदासस्वामी म्हणतात,
धर्म स्थापनेचे नर| तेचि ईश्वराचे अवतार|
झाले, आहेत, पुढे होणार॥
म्हणजे धर्मस्थापनेसाठी कार्य करणारे पुरुष हेच ईश्वराचे अवतार होत. ते पूर्वी झाले, आता आहेत आणि पुढेही होत राहतील, ही परंपरा अखंड चालणारी आहे. परंतु, भविष्य आपल्याला दिसत नाही. भूतकाळाचा आधार घेऊन आणि वर्तमानाची माहिती जाणून प्रत्येकजण काही अनुमान करू शकतो; पण भविष्याच्या अंधाराचा पडदा दूर करून आपल्या भाग्यात काय लिहिले आहे, हे पाहण्याची शक्ती सामान्य मनुष्याजवळ नसते. म्हणून पुढे काय होईल, याविषयी तर्क-वितर्क न करता, आपल्यासमोर जी परंपरा आहे, तिच्याकडे पाहिले, तर असे दिसते की, एखादे विभूतिमत्त्व येथे प्रकट होते, ज्या चेतनेतून ते देहरूप धारण करून येते आणि शेवटी त्याच चेतनेत विलीन होते.
‘येणे’ आणि ‘जाणे’ हे सर्वांच्याच बाबतीत चालूच असते. परंतु, काही व्यक्तींचा जन्म हा सर्वांसाठी आनंदाचा आणि सन्मानाचा विषय ठरतो; तसेच त्यांचे चिरवियोगही अत्यंत दुःखद असले, तरी समाजासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट बनून जातात. अशाच एका असामान्य विभूतीच्या स्मरणार्थ आपण येथे उपस्थित झालो आहोत. आता आपल्या हातात केवळ त्यांचे स्मरण करणे आहे आणि त्या स्मरणाबरोबरच त्यांनी दाखविलेला कर्तव्याचा मार्ग स्वीकारणेही आपल्या हातात आहे. त्या श्रेष्ठ व्यक्तीच्या जीवनाचे संपूर्ण चित्र आज येथे उभे करणे आवश्यक नाही. बाल्यावस्थेपासूनच ते उग्र राष्ट्रभक्त होते; केवळ राष्ट्रभक्त नव्हे, तर प्रखर राष्ट्रभक्त!
चारही बाजूंनी जाणवणार्या पारतंत्र्याच्या विषारी वातावरणाविषयी त्यांच्या अंतःकरणात अत्यंत तीव्र चीड होती. ते पारतंत्र्य पूर्णतः नष्ट करण्याचा अतिशय प्रबळ निश्चय त्यांच्या जीवनातील प्रत्येक कृतीतून दिसून येतो; हे सर्वपरिचित आहे. जी व्यक्ती राष्ट्रावर अशी उत्कट भक्ती करते आणि जिला कोणत्याही प्रकारचे भय स्पर्श करू शकत नाही, ती व्यक्ती कठीण आणि भीषण मार्ग स्वीकारण्यास कधीही कचरत नाही. विशेषतः, आपल्या इतिहासात पारतंत्र्याविरुद्ध अखंड संघर्ष करून अखेरीस विजय मिळवणार्या आणि स्वातंत्र्यसूर्याचा उदय पाहणार्या महान पुरुषांचा, ज्यांच्या मुकुटमणीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आपल्या समोर येते, संघर्षमय, निर्भय आणि पराक्रमाने ओतप्रोत भरलेल्या जीवनाचा आदर्श डोळ्यांसमोर असल्यावर, निर्भय आणि उग्र राष्ट्रभक्त असा विचार करतो की, याच प्रकारे शस्त्रसज्ज क्रांती उभारून त्या क्रांतीमध्ये या परकीय सत्तेला पूर्णपणे बुडवून नष्ट करणे, हेच आपले कर्तव्य आहे.
या कर्तव्याची जाणीव ठेवून त्यांनी आपले संपूर्ण कार्य उभे केले. आपली वाणी, आपली लेखनकला सर्व काही त्यांनी त्याच कार्यासाठी अर्पण करणे, हेच आपले कर्तव्य मानले. त्यांचे स्वतःचेच वचन आहे की, "मी माझे वक्तृत्व, माझे वाग्वैभव हे सर्व मातृभूमीच्या चरणी समर्पित केले आहे.” जी गोष्ट त्यांनी आपल्या प्रारंभिक अवस्थेत सांगितली, तीच भावना जीवनाच्या अखेरपर्यंत, अंतिम श्वासापर्यंत कायम राहिली; हे आपण सर्व जाणतो. अशा उग्र मार्गाचा अवलंब करणार्या लोकांना, विशेषतः त्या काळातील येथे असलेल्या परकीय सत्तेच्या कुटिल नीतीने भरलेल्या आणि अत्यंत क्रूर शासनामुळे, सुख-शांतीचा अनुभव मिळणे शयच नव्हते. आणि तसेच दिसून येते की, त्यांना अगदी लहानपणापासूनच कष्ट सहन करावे लागले. पुढे तर ज्या अत्यंत कठोर शिक्षेला ‘काळे पाणी’ असे म्हटले जाते, त्या भीषण यातनांची परीक्षाही त्यांना द्यावी लागली.
या काळ्या पाण्याच्या शिक्षेमध्ये त्यांच्या असामान्य धैर्याचे दर्शन आपल्याला घडते. आश्चर्य याचे वाटते की, त्या काळ्या पाण्याच्या कारावासात कधी एकांतवास, कधी विविध प्रकारच्या यातना सहन करत असताना त्यांच्या काही सहकार्यांची जीवनयात्रा संपली; तर काही सहकारी उन्मादग्रस्त झाले; म्हणजेच सामान्य भाषेत सांगायचे तर वेडे झाले. ते स्वतःही आजारी पडले. अशा प्रकारची रुग्णावस्था, सर्व प्रकारचे कष्ट आणि पुन्हा आपल्या मातृभूमीचे दर्शन होईल की नाही, अशी मनात सतत असणारी शंका या सर्व परिस्थितीतही त्यांची काव्यप्रतिभा, त्यांचे वाग्वैभव, जे मातृभूमीला समर्पित होते, तेथे मुळीच मंदावले नाही. उलट, ते अधिक मुखर झाले, अधिक प्रभावीपणे अभिव्यक्त झाले. त्या सर्व प्रकारच्या यातनांनी कदाचित त्यांना खचवण्याचा प्रयत्न केला असेल; पण त्यांच्या तेजस्वी प्रतिभेसमोर ते सारे कष्ट फिके पडले. त्या अंधःकाराला चिरत त्यांची प्रतिभा बाहेर आली. कोणतीही साधने नसताना, केवळ स्मरणशक्तीच्या आधारावर त्यांनी जे साहित्य निर्माण केले, जे पुढे सरस्वतीच्या क्षेत्रात अमर झाले, असे प्रेरणादायी, तेजस्वी आणि काव्यमय साहित्य त्यांनी त्या कारावासात निर्माण केले.
ज्याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही, असे हे सर्व होते. जगात कधीतरी अशा उदाहरणांची नोंद आढळेलही; परंतु ज्या प्रकारच्या भीषण यातनांमध्ये अंतःकरणातील ही स्फूर्ती केवळ स्मरणशक्तीच्या आधारावर जिवंत ठेवणे, तिला अभिव्यक्त करणे आणि पुढे ती सर्व समाजासाठी अर्पण करणे; ही अत्यंत असामान्य गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे, त्या साहित्यामध्ये वैयक्तिक दुःखांचे रडगाणे किंवा हताशतेचा सूर कुठेही दिसत नाही. आपल्या राष्ट्राचे गौरवशाली चित्र सर्वांसमोर ठेवत, त्याच्या चेतनेला जागृत करून स्वातंत्र्यसूर्याचा उदय व्हावा, राष्ट्रामध्ये तेजस्वी राष्ट्रभावना निर्माण व्हावी; एवढाच एक विषय त्यात सातत्याने दिसून येतो. मृत्यू समीप असतानाही त्यांनी मृत्यूला भीतीने नव्हे, तर जणू एखाद्या प्रिय मित्राला किंवा सहकार्याला प्रेमाने आमंत्रण द्यावे, तसे आव्हान दिले आहे आणि त्या भावनेतही भव्यता, दिव्यता आणि अद्भुत तेज जाणवते.
एकांतवास म्हणजे स्थानबद्ध जीवन. आणि स्थानबद्ध जीवन म्हणजे आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे अपहरण झाल्यामुळे स्वतःच्या कर्तृत्वाला वाव मिळत नाही, ही जाणीव होणे. त्यामुळे दुःख होणे स्वाभाविकच आहे. परंतु, दुःख करत बसणे, हे कर्तृत्ववान मनुष्याचे लक्षण नसते. त्यामुळे दुःखात न बुडता, समाजजागरणासाठी त्यांनी लोकांना जागृत करण्याचा उद्योग सुरू केला. ते तीव्र धक्के समाजातील अनेकांना कदाचित आवडले नसतील. काहीजण संतप्तही झाले असतील, त्यांच्या मनात प्रतिक्रिया उमटल्या असतील. परंतु, जेव्हा एखादा समाज मृतवत् पडून राहतो, तेव्हा त्याला मधुर संगीताने जागे करता येत नाही; त्याला धक्केच द्यावे लागतात. ते असे धक्के देत असताना काही लोक म्हणत की, यांच्या मनात समाजाबद्दल प्रेम नाही काय? पण, जर समाजाबद्दल प्रेम आणि भक्तीच नसती, तर इतका प्रचंड उद्योग करण्याची त्यांना गरजच काय होती? समाजभक्तीने प्रेरित होऊनच त्यांनी समाजाला जागवण्याचा प्रयत्न केला आणि पुढे ते त्या स्थानबद्धतेतून मुक्त झाले.
स्थानबद्धतेतून मुक्त झाल्यानंतर संपूर्ण देशभर त्यांचे जे अभूतपूर्व स्वागत झाले आणि अगणित लोकांनी त्यांचे विचार ऐकले. त्याविषयीचे वर्णन मी अनेक ठिकाणी प्रवास करताना ऐकले आहे. लोक सांगत असत की, इतकी वर्षे अंदमानसारख्या काळ्या पाण्याच्या भीषण शिक्षेत कष्टमय जीवन व्यतीत करूनही त्यांच्या वाणीतील तेजस्विता, विचारांची सुस्पष्टता आणि सुबोधता यांमध्ये किंचितही फरक पडला नव्हता; उलट ती अधिकच तेजस्वी झाली होती! ज्यांनी हे सांगितले, त्यांनीही प्रत्यक्ष वास्तवाच्या मानाने फारच थोडे सांगितले आहे. जसे सुवर्ण अग्नीत टाकल्यानंतर मंदावत नाही, उलट त्याचे तेज अधिक खुलून दिसते; त्याचप्रमाणे या सर्व प्रकारच्या कष्टांच्या अग्नीतून त्यांचे तेज अधिक निखरून बाहेर आले, असाच अनुभव येतो. त्यांचे संपूर्ण वक्तृत्व, कर्मशीलता आणि वाग्वैभव हे राष्ट्रजीवनाच्या जागरणासाठीच समर्पित झालेले आपल्याला दिसते.
सावरकरांच्या जीवनाचे अनेक आश्चर्यकारक पैलू आपल्याला दिसून येतात. किती विविध विषयांचा त्यांनी विचार केला होता! केवळ राजकीय क्षेत्राचाच नव्हे, तर साहित्य, इतिहास आदी क्षेत्रांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. आपल्या तेजस्वी आणि ओजस्वी इतिहासाचा शोध घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये लोकांची चेतना जागृत करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. प्रत्येक अंगाने स्वाभिमानाचे पोषण व्हावे, या दृष्टीने त्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या प्रतिभेचा उपयोग केला.
त्यांचे एक कार्य सतत आपल्या लक्षात राहते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर एक प्रयोग हाती घेतला होता. तो म्हणजे, फारसी आणि अरबी शब्द सामान्य व्यवहारात घुसले होते, ते बाहेर काढणे. आपल्या येथे आजही ‘जिल्हा’, ‘तहसील’, ‘मामलेदार’, ‘तारीख’ असे जे शब्द वापरले जातात, ते फारसी भाषेतून आलेले आहेत. आपण ही गोष्ट विसरून गेलो, इतकेच नव्हे; तर ते शब्द आपल्याच भाषेचे आहेत, असे मानू लागलो. याच संदर्भातील एक उदाहरण त्यांनी दिले होते. एक सज्जन आपल्या पत्नीचा परिचय करून देताना म्हणाले, "ही माझी ‘वाईफ’ आहे.” तेव्हा त्यांनी विचारले, "आपण कोणत्या भाषेत बोलत आहात?” मग त्या गृहस्थांनी लगेच म्हटले, "ही माझी पत्नी आहे.” त्यावर ते म्हणाले, "हो, आता मला समजले.”
भाषाशुद्धीसंदर्भात त्यांनी हे उदाहरण दिले होते. लोकांच्या अशा अनेक विचित्र आणि विसंगत बोलण्याची उदाहरणे त्यांनी सांगितली आहेत. इतके सूक्ष्म निरीक्षण त्यांनी कुठे आणि कसे केले असेल, याचे आश्चर्य वाटते. मिश्रित आणि परकीय प्रभावाची प्रवृत्ती दूर होऊन आपली भाषा शुद्ध स्वरूपात यावी, असा एक प्रयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता; आणि त्याच दिशेने त्यांनीही प्रयत्न केले.
त्या काळातील ‘राज्यव्यवहार कोश’ प्रसिद्ध आहे. परंतु, त्यानंतर राज्याचा विस्तार झाला आणि पुढील काळात जी मराठी प्रचलित झाली, ती आज समजावून सांगणे अत्यंत कठीण आहे. त्यामध्ये फारसी शब्दांचे प्रयोग दैनंदिन व्यवहारात इतके खोलवर शिरले की, लोकांना त्याचाच अभिमान वाटू लागला. इतकेच नव्हे, तर त्या शब्दांचे समर्थनही केले जाऊ लागले. "या शब्दांमध्ये फार ताकद आहे,” असे म्हटले जाई. उदाहरणार्थ ‘कैफियत’, ‘फैसला’ अशा शब्दांविषयी एका मराठी नाटककाराने उपहासाने म्हटले आहे, "वा! काय जोर आहे हो या शब्दांत! उपहासाचा विषय ठरेल, इतया प्रमाणात आपल्या भाषेचे स्वरूप बिघडवणार्या अनिष्ट आणि अनावश्यक शब्दांची जी गर्दी झाली होती, ती दूर करून आपल्या भाषेला परिमार्जित स्वरूपात सर्वांसमोर उभे करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी मानले.
लोक म्हणत असत की, याची आवश्यकता काय? देशातील राजकीय संघर्षात आणि परकीय सत्तेविरुद्धच्या लढ्यात आपली शक्ती उपयोगी पडली, म्हणजे पुरे. परंतु, त्या काळात राष्ट्रजीवनाच्या शुद्ध स्वरूपाचा विचार फार थोड्यांनी केला. या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले, तर विशुद्ध राष्ट्राची कल्पनाच मनापासून दूर जाऊ लागते. म्हणून राष्ट्राच्या विशुद्ध स्वरूपाला समोर ठेवून, जीवनाच्या प्रत्येक अंगात स्वाभिमान व्यक्त होत आहे का, हे पाहणे आवश्यक आहे. आणि जेव्हा असा सर्वांगीण विचार होतो, तेव्हाच स्वातंत्र्याला खरे मूल्य प्राप्त होते.
छोट्या छोट्या विषयांकडे पाहण्यातील ही उपेक्षा किंवा उदासीनतेची वृत्ती अखेरीस राष्ट्राला आणि स्वतःलाही किती मोठ्या संकटात टाकू शकते, या विचारातून त्यांनी भाषाशुद्धीसारख्या दिसायला छोट्या विषयावर आग्रह धरणे आणि त्यासाठी आघात करणे आवश्यक मानले आणि ते योग्यही होते. याचसंदर्भात त्यांनी राष्ट्रजीवनाच्या विचारांचे शुद्धीकरण आपल्या समोर ठेवले. आपल्याला माहीत आहे की, आपल्या येथे असे मानणारे अनेक लोक आहेत की, येथे कोणतेही प्राचीन राष्ट्र नव्हते; येथे फक्त माणसांची गर्दी होती. आपला जो इतिहास आहे, तो स्वतःला ‘राजा’ म्हणवून घेणार्या लोकांच्या परस्परांतील संघर्ष आणि साहसांनी भरलेला आहे, असे ते म्हणतात.
येथे एक मातृभूमी आहे, एक समाज आहे, आपले स्वतंत्र राष्ट्रजीवन आहे, ही जाणीवच लोकांमध्ये नव्हती, असेही काहीजण सांगतात. गेल्या शतकात येथे जे राजकीय आंदोलन झाले, त्यातूनच ‘राष्ट्र’ ही भावना निर्माण झाली, असे त्यांचे मत आहे. जगातील प्रत्येक राष्ट्र आपले स्वतंत्र जीवन जगते, हे पाहून आपल्या येथे नव्या राष्ट्राची कल्पना पुढे आली आणि ज्यांच्याशी आपल्याला शत्रूसारखा सामना करायचा होता, त्या इंग्रजांच्या अधिपत्याखाली राहणार्या सर्व लोकांच्या एकत्र येण्यामुळे राष्ट्रभावना निर्माण झाली, असा निष्कर्ष काढण्यात आला. परंतु राष्ट्र कसे बनते, याचा विचारच झाला नाही. केवळ एकाच भूमीवर जन्म घेणे, एकाच परंपरेत वाढणे, यामुळे राष्ट्र निर्माण होते का, की समान संकट आणि समान शत्रुत्वामुळे एकत्र आलेल्या लोकांच्या समूहाला ‘राष्ट्र’ म्हणायचे, याचा सखोल विचार झाला नाही. आणि मग ‘राष्ट्र’ या शब्दाचा एक प्रकारे संभ्रमपूर्ण उपयोग होत राहिला. जेव्हा विशुद्ध राष्ट्राची कल्पनाच स्पष्ट नसते, तेव्हा अशा संभ्रममिश्रित राष्ट्रकल्पनेच्या आधारावर आपण जगात आपल्या सर्व वैशिष्ट्यांसह ठामपणे कसे उभे राहणार? जेव्हा आपल्या वैशिष्ट्यांचे ज्ञान नाही, स्वाभिमान नाही, तेव्हा निर्माण होणारे राष्ट्रस्वरूप हे मिश्रित आणि अपूर्णच राहणार.
चारही बाजूंना पसरलेल्या या संभ्रमपूर्ण वातावरणाला धक्का देऊन लोकांनी शुद्ध राष्ट्रचिंतन करावे आणि त्या शुद्ध राष्ट्राची सेवा करण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असा एक पूर्ण आणि मौलिक विचार सर्वांसमोर मांडण्याचे साहस त्यांनी केले. त्या काळात ते खरोखरच साहसाचे कार्य होते. त्यांच्या अत्यंत धाडसी स्वभावामुळे कदाचित त्यांना त्यात काही विशेष वाटले नसेल; ती सामान्यच गोष्ट आहे, असे त्यांना वाटले असेल. विशुद्ध राष्ट्रस्वरूप सर्वांसमोर उभे करण्याचा त्यांचा दृढ संकल्प स्पष्टपणे दिसून येतो. त्या दृढनिश्चयामुळे त्यांनी संपूर्ण भारतभर फिरून जो हिंदूराष्ट्राचा उद्घोष घडवून आणला, तो आज पूर्णपणे यशस्वी झालेला दिसत नसला, तरी अल्पावधीतच त्याची प्रबळ घोषणा सर्वत्र होताना दिसेल. फार काळ न जाता, ते जीवन येथे प्रस्थापित झालेले दिसून येईल.
आज कदाचित लोक हा विचार सत्य म्हणून स्वीकारत नसतील; कारण संभ्रमामध्ये सत्य असत्यासारखे दिसते आणि असत्यालाच सत्य मानले जाते. अशा वेळी सत्य स्वीकारण्यास अनुकूल असे विचार प्रभावी, तेजस्वी आणि प्रत्यक्ष जीवनानुभवाने परिपूर्ण अशा प्रखर शब्दांत मांडले गेले आहेत. आता तो प्रवाह थांबणार नाही. सत्याला कोणीही रोखू शकत नाही. त्यांनी जे सांगितले, ते सिद्ध होणारच; याबद्दल कुणीही शंका बाळगू नये. मनात दुर्बल विचार येऊ देऊ नयेत. आज चारही बाजूंनी विपरीत विचारांचा कोलाहल असताना, आपल्या शुद्ध विचारांना घेऊन चालणारा हा नेता जगातून निघून गेला असला, तरी त्याने दिलेली सत्यविचारांची परंपरा पुढे चालतच राहणार आहे.
ते केवळ ‘हिंदूराष्ट्र’ असे म्हणून थांबले नाहीत. अनेकदा माणूस सिद्धांत मांडतो; सिद्धांत सत्य असतो. पण, त्यानुसार काय करायचे आणि काय करायचे नाही, याचा विचार करून योग्य मार्गाने प्रयत्न केले जात नाहीत. त्यांनी विचार मांडला की राष्ट्र उभे राहते, सुख प्राप्त करते, सन्मान मिळवते आणि निर्भय राहते, ते केवळ तत्त्वज्ञानाच्या आधारावर नाही. प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, त्या काळात मोठमोठे ऋषी आणि तत्त्वज्ञ नव्हते काय? वसिष्ठांसारखे महान ब्रह्मर्षी होतेच. पण, हे सर्व असूनही राष्ट्राचे रक्षण झाले नाही. ते कशामुळे झाले? तर कोदंडधारी रामचंद्रांच्या कोदंडामुळे, हे स्पष्ट आहे.
इतिहासात प्रत्येक वेळी हेच दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी अनेक वर्षे संतांची परंपरा संपूर्ण देशात, विशेषतः महाराष्ट्रात होती. भजन-पूजन, पंढरपूरची वारी यात लोक रमले होते. परंतु, धर्मरक्षणासाठी शेवटी शिवाजी महाराजांना तलवारीचा आधार घ्यावाच लागला, हे सुस्पष्ट आहे. आजही काही लोक म्हणतात, मला आठवते, जेव्हा १९४७ मध्ये इंग्रजांचे राज्य जाऊन आपल्याला राज्यकारभार करण्याचा अधिकार मिळाला, तेव्हा काहींनी म्हणणे सुरू केले, "रणाविण स्वातंत्र्य आम्हां मिळाले,” असे सावरकरांच्या साहित्यामध्ये येते. म्हणजे स्वातंत्र्य कोणालाही सहज मिळत नाही; ते रणातूनच प्राप्त होते.
इतिहासात आपण पाहतो की, ज्यांनी क्रांतिकार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, ज्यांनी प्रत्यक्ष युद्धाची ललकार दिली, ज्यांनी प्राणांतिक यातना सहन करत तेजस्वीपणे कार्य चालू ठेवले, त्यांच्या प्रयत्नांमुळेच पुढे सैनिकी बंडाची मोठी शयता निर्माण झाली आणि काही वर्षांनी ज्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सशस्त्र सेना उभी करून भारतातून इंग्रजांना हटविण्यासाठी सज्ज होता आले, त्याचाही विचार करायला हवा. अनेकदा अंतिम प्रहार महत्त्वाचा असतो. इंग्रजांच्या स्वतःच्या कथनानुसार, येथे छोटे-छोटे सैनिकी विद्रोह निर्माण होण्याची मोठी शयता दिसू लागली होती. ज्यांच्या बळावर येथे त्यांचे राज्य टिकून होते, ती सेना आता पूर्णपणे त्यांच्या ताब्यात राहिलेली नाही; त्यांच्या हातातील बंदुका त्यांच्या विरोधात वळू शकतात, हे पाहून इंग्रजांना समजले की, आता येथे राहण्याची आपल्यासाठी जागा उरलेली नाही. म्हणून जितया सन्मानाने निघता येईल, तितया सन्मानाने निघून जावे, असा त्यांनी निश्चय केला, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. म्हणून ‘रणाविण स्वातंत्र्य आम्हां मिळाले,” असे म्हणणे सत्याशी सुसंगत ठरत नाही.
मला वाटते की, त्यांचा हा आग्रह किती योग्य होता, याची अनुभूती आपल्याला अगदी अलीकडेच आली. मधल्या काळात आपल्यावर चीनने आक्रमण केले आणि त्यानंतर ज्याला आपण पाकिस्तान म्हणतो, त्याच्याकडूनही आक्रमण झाले. त्यावेळी आपल्या देशात किती मोठी धावपळ उडाली! ‘भाईचारा’ वगैरे गोष्टींनी काम चालत नाही, हे लोकांच्या लक्षात आले. तो ‘भाईचारा’ हवेत विरून गेला आणि चारही बाजूंनी सैनिकीकरणाची धूम सुरू झाली. सैनिकसंख्या वाढवण्याची धडपड सुरू झाली. शस्त्रास्त्रे तयार करण्याची चळवळ सुरू झाली. मग प्रश्न असा आहे की, हे सर्व आधीच केले असते तर? आधीपासूनच त्या दिशेने लक्ष दिले असते तर? सर्वसामान्य समाजामध्ये तशी वृत्ती निर्माण केली असती तर? किती मोठे आणि प्रबळ राष्ट्रसामर्थ्य उभे राहिले असते!
मोठमोठे म्हणून ओळखले जाणारे लोकही हे समजू शकले, ही देवाची कृपा म्हणावी लागेल. पण, केवळ एवढ्याने भागणार नाही. मनुष्य फार विसरभोळा असतो आणि विशेषतः आपल्या येथे राज्यकारभार करणारे लोक संकटाच्या काळात कर्तव्यदृष्टीने किती विस्मरणशील होतात, याला जगात तोड नाही. एक उदाहरण सांगतो. नुकतेच युद्ध सुरू होते ना? मागच्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जसे ते युद्ध संपले आणि युद्धविराम घोषित झाला, तेव्हा लोकसभेतील काही लोकप्रतिनिधींनाही वाटू लागले की, मोठ्या झंझटातून मुक्तता झाली. मी वृत्तपत्रांत वाचले होते, 'These MPs feel relieved.' म्हणजे ते मोठ्या त्रासातून सुटल्यासारखे वाटत होते.
हे कसले आपले प्रतिनिधी? तीन आठवड्यांच्या युद्धानेच जे कंटाळून गेले! त्यांना कसेही करून हे युद्ध थांबावे, असे वाटत होते. असे वाटते की, त्यांची युद्धाविषयीची भाषा ही फक्त दिखावा होता. मला तर आश्चर्य वाटते, 'Why these MPs feel relieved?' युद्ध थांबले, ठीक आहे; पण हे संकट पुन्हा उद्भवू नये, यासाठी काय करायचे, सर्व प्रकारची सिद्धता करून पुढे कसे जायचे, हा विचार करणे वेगळे आणि 'These MPs feel relieved.' ही वृत्ती वेगळी. समाजाच्या या विस्मरणशीलतेचा विचार करून, निर्माण झालेली जागृती कायमस्वरूपी कशी टिकेल, आपले अंतःकरण एका ध्येयावर केंद्रित करून विस्मरण दूर करून पुढे कसे जाता येईल, हे सांगणारा एक अत्यंत प्रबळ आणि शक्तिसंपन्न आवाज आता आपल्याजवळ नाही. तो आवाज शारीरिकदृष्ट्या क्षीण झाला होता, तरी किती प्रबळ होता! आता तीच प्रखरता कदाचित एखाद्या एका व्यक्तीच्या आवाजात नसेल; पण आपण हजारो आवाज निर्माण करू शकतो. आता आपले दायित्व अधिक वाढले आहे. तो एक प्रखर आवाज आपल्या जवळ नाही, म्हणून असे अनेक आवाज निर्माण करणे, हेच आता आपले कर्तव्य आहे.
समाजाच्या विस्मरणशील वृत्तीमुळे मला अशा अनेक गोष्टींबद्दल चिंता वाटते. कारण, मी स्वतः पाहिले आहे की, युद्धविरामापूर्वी सैन्यभरती केंद्रांमध्ये जिथे दररोज १००-२०० युवक दिसत होते, तिथे युद्धविरामानंतर लोकांच्या बोलण्यातून विशेषतः मोठमोठ्या नेत्यांच्या वक्तव्यांतून असे वातावरण निर्माण झाले की, १०-२० माणसेही मोठ्या कठीणतेने भरतीसाठी येऊ लागली. हरी हरी म्हणत बसावे, नाहीतर सत्यनारायणाची पूजा करावी; पुन्हा मार खाल्ल्यावर पाहू, अशी जणू लोकांच्या मनामध्ये प्रवृत्ती निर्माण झाली आहे. आता सर्व काही ठीक झाले, अशी भावना अत्यंत घातक आहे. मी यापूर्वी एक उदाहरण दिले होते. ते आपल्या लक्षात आहे की नाही, माहीत नाही. १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध झाले, तेव्हा त्या सैनिकांनी अद्भुत शौर्य दाखवत ग्वाल्हेरचा किल्ला जिंकला. त्यांच्याकडे कौशल्य होते, शौर्य होते. तेथील सेना आणि शस्त्रसामग्रीही त्यांच्या हाती आली. यानंतर इंग्रजांची जी सेना त्यांना नष्ट करण्यासाठी इकडे-तिकडे फिरत होती, तिला आपल्या वाढलेल्या शक्तीने आघात करून संपवणे आवश्यक होते. परंतु, विजय मिळाल्यामुळे लोक इतके आनंदात बुडाले की ते खानपान, मौजमजा आणि रंगरेलीत रमून गेले.
परिणाम काय झाला? ते पराभूत झाले. अतिशय दूरदृष्टीने आखलेले आणि उभे केलेले ते संपूर्ण स्वातंत्र्ययुद्धाचे आयोजन त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि आत्मसंतुष्टतेमुळे नष्ट झाले. म्हणजेच, शिथिलतेची भावना कधीही लाभदायक नसते. ती राष्ट्रासाठी अत्यंत घातक असते. आज लोक म्हणतात की, आपण तयारी करत आहोत. पण, प्रश्न असा आहे की, किती आणि कशी तयारी होत आहे? त्या तयारीमध्ये जी दूरदृष्टी, कुशलता आणि सुरक्षिततेची जाणीव असायला हवी, ती आहे का? आपले जे कारखाने आहेत, ते सर्व सुरक्षित आहेत का? त्यामध्ये काही अवांछित व्यक्ती तर नाहीत ना? वेळोवेळी जे बॉम्बस्फोटासारखे प्रकार ऐकायला येतात, त्यावरून असे वाटते की, तेथे बरेच अवांछित लोक असावेत. त्यांच्यावर सूक्ष्म लक्ष ठेवले जाते का?
आधुनिक जगात ज्या प्रकारची शस्त्रसामग्री आवश्यक आहे, तिची निर्मिती करण्यासाठी शासनातील अधिकारी खरोखर उत्सुक आहेत का? असे ऐकण्यात आले की, तत्कालीन संरक्षणमंत्री म्हणत होते, "आधुनिक शस्त्रांची काही आवश्यकता नाही; पारंपरिक (Conventional) शस्त्रांनीच काम भागेल.” आणि त्यासाठी बरेच युक्तिवादही मांडले जात होते. उदाहरणार्थ, चीन आपले जड रणगाडे आणि तोफा घेऊन हिमालय पर्वत कसे ओलांडणार? ते तर मार्गातच अडकून पडतील. शेवटी त्यांना बंदुकांनीच लढावे लागेल आणि बंदुका आपल्याजवळही आहेत. त्यामुळे त्याच पुरेशा आहेत.
हा युक्तिवाद मला समजत नाही. मला आठवते, जेव्हा नेपोलियनने इटली जिंकण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्याच्या सेनाधिकार्याने म्हटले, "मधे आल्प्स पर्वत उभा आहे; तो कसा पार करणार?” त्यावर नेपोलियन म्हणाला, "There shall be no Alps." माझ्या सैन्याच्या गतीला कोणीही रोखू शकत नाही.” आणि आश्चर्य म्हणजे, ज्या दुर्गम मार्गाने नेपोलियन येऊ शकत नाही, असे शत्रूला वाटत होते, त्या मार्गाने नेपोलियनचे संपूर्ण सैन्य शस्त्रास्त्रांसह आल्प्स ओलांडून पोहोचले. शत्रूला विचार करण्याचीही संधी मिळाली नाही. त्याच्या हातात फक्त पराभव उरला. परिणामी, नेपोलियनला संपूर्ण विजय मिळाला आणि त्या प्रदेशाचा त्याने आपल्या साम्राज्यात समावेश केला.
जो आक्रमण करू इच्छितो, तो सर्व अडथळे पार करतो. चीनलाही जर इच्छा असेल, तर तो आपल्या तोफा आणि रणगाडेही आणेल आणि हे आपण अनुभवलेही आहे. चीनबरोबरच्या संघर्षात आपल्या जवळ असलेल्या पारंपरिक शस्त्रांसाठी योग्य काडतुसेही नव्हती. एका प्रकारच्या बंदुका आणि दुसर्या प्रकारची काडतुसे असल्यामुळे आपल्या शूर सैनिकांना शत्रूसमोर अक्षरशः केवळ मरायला उभे राहावे लागले. विज्ञानयुगात, प्रगत जगात पारंपरिक शस्त्र या संकल्पनेचाच अर्थ सतत बदलत असतो. प्राचीन काळात नखे-दात हीच पारंपरिक शस्त्रे होती; नंतर लाठी-काठी, धनुष्यबाण, तलवारी इत्यादी संहारक शस्त्रे रूढ झाली आणि आज विमानांतून वापरले जाणारे स्फोटक बॉम्ब, अग्निशस्त्रे इत्यादी रूढ होत आहेत.
आपल्या येथे अण्वस्त्रांची प्रवृत्ती नसावी. कदाचित आपण ती बनवलेली नसतील. पण, आज जी शस्त्रे रूढ नाहीत, ती उद्या रूढ होऊ शकतात. जी शस्त्रे आपण आज पारंपरिक मानत नाही, ती ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात साठवलेली आहेत, त्यांच्यासाठी तीच पारंपरिक आहेत. ते कोणत्याही क्षणी त्यांचा वापर करतील आणि ज्यांच्याकडे अशी आधुनिक शस्त्रे नाहीत, अशा राष्ट्रांना भयभीत करून त्यांना गुलाम बनवतील. या आधुनिक शस्त्रांची आवश्यकता मान्य न करणे, आपल्यावर कोणी हल्ला करणार नाही, असे समजून चालणे, म्हणजे आत्मसंतुष्टतेचा, शिथिलतेचा बळी होणे होय. असा विचार करणे, म्हणजे वास्तवापासून दूर जाणे होय. आता शस्त्रसंधी झाली, करार झाला, म्हणजे सर्व काही सुरक्षित झाले, असा विचार करणे, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अत्यंत भयावह आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे की, जगात कोणताही राजकीय करार चिरकाल टिकत नाही. कोणी आपल्यावर हल्ला करणार नाही, असे मानणे योग्य नाही.
आज आपल्या अंतःकरणात जे शैथिल्य शिरलेले आहे, ते अत्यंत भयावह आहे. अशा परिस्थितीत आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, संपूर्ण हिंदू समाज एक समर्थ सैनिकी शक्ती म्हणून उभा राहिला पाहिजे, असे सांगणारी ती उद्दीप्त वाणी आज आपल्यात नाही. मग आपण काय करायचे? रडत बसायचे? रडणे योग्य नाही. ते आपले कार्य नाही. आज शोकसभेचा प्रसंग असतानाही मी रडण्याचा एक शब्दही उच्चारलेला नाही. माझ्या अत्यंत निकटच्या व्यक्तींच्या निधनाच्या वेळीही माझ्या डोळ्यांतून अश्रूचा एकही थेंब पडू दिला नाही.
रडल्याने श्रद्धा व्यक्त होत नाही; कर्तव्य केल्याने होते. योग्य मार्गाने, निरलस भावनेने कर्तव्य पार पाडल्यानेच खरी श्रद्धा व्यक्त होते, असा विचार करून मी परमेश्वराला प्रार्थना करतो की, मला रडू देऊ नकोस; कर्तव्य करू दे. ईश्वराची ती कृपाही राहील. आज ती प्रखर वाणी आपल्या जवळ नाही, म्हणून रडत बसण्याऐवजी, त्या वाणीची प्रखरता एका-दोन व्यक्तींच्या नव्हे, तर लक्षावधी-कोट्यवधी वाण्यांमध्ये प्रकट करण्यासाठी आपण कटिबद्ध झालो पाहिजे. मग पुन्हा कधीही आपले महान राष्ट्र शत्रूसमोर निद्रिस्त अवस्थेत दिसणार नाही.
आपल्या समाजाला जागृत, नित्यसिद्ध, शक्तिसंपन्न आणि शस्त्रास्त्रसज्ज अशी मानसिकता देऊन उभे करायचे आहे, असा निश्चय करून त्यानुसार वातावरण निर्माण करणे, चारही बाजूंनी तेजस्वी राष्ट्रभावनेचे वातावरण उभे करणे, त्याचा विस्तार करणे आणि त्या तेजस्वितेला अधिक वृद्धिंगत करणे, हाच खरी श्रद्धा व्यक्त करण्याचा योग्य मार्ग आहे. राष्ट्राचा स्थायीभाव हा केवळ सौम्यतेच्या आधारावर उभा राहात नाही. राष्ट्रजीवनाच्या सर्व अंगांचा तेजस्वी अविष्कार करून ते सामर्थ्य अधिकाधिक वाढविण्याची आवश्यकता आहे. हाच आपला श्रद्धाभाव आहे; हीच खरी श्रद्धांजली आहे.
ही श्रद्धा हृदयात धारण करून कर्तव्यपथावर पुढे चालत राहावे आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपला मार्ग जरी सुकर वाटत असला, तरी त्या महापुरुषांचे जीवन जन्मापासून अखेरपर्यंत दुःखांनी भरलेले होते. जणू कष्ट आणि दुःख भोगण्यासाठीच ईश्वराने त्यांची निर्मिती केली होती, असे म्हणावे लागेल. तरीही खेद करण्याचे कारण नाही. भगवान रामचंद्रांचे जीवनही असेच होते. आपण त्यांना ईश्वराचा अवतार मानतो. बाल्यावस्थेतच त्यांना विश्वामित्रांच्या सेवेसाठी वनात जावे लागले. विवाहानंतर सावत्र आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी राज्याचा त्याग करून वनवास पत्करावा लागला.
वनवासात रावणाने त्यांच्या पत्नीचे अपहरण केले; त्या दुःखाचा आणि अपमानाचा त्यांना सामना करावा लागला. रावणवधानंतर आणि वनवास संपल्यानंतरही राज्यकर्तव्यावर कोणाचा आक्षेप येऊ नये, म्हणून गर्भवती पत्नीचाही त्याग करावा लागला. आणि शेवटी, कालपुरुषाशी संवाद करताना छोट्या नियमभंगामुळे अत्यंत प्रिय भाऊ लक्ष्मणाचाही त्याग करण्याचे भीषण दुःख सहन करावे लागले. जन्मापासून देहत्यागापर्यंत सुखाचा क्षणही लाभला नाही. महापुरुषांचे जीवन असेच असते.
मला आठवते, कधी अशा प्रसंगी विषाद निर्माण झाल्यावर एका साधूला विचारले असता, तो म्हणाला, "यात दुःख कसले? दुःख तर येणारच असते; मग त्याची चिंता कशाला? मोठमोठ्या रामचंद्रांसारख्या महापुरुषांचे जीवनही दुःखांनी भरलेले आहे, तर आपल्या दुःखांची चिंता कशाला करायची? आनंदाने, समाधानाने राहा.” ही गोष्ट मनाला पटणारी आहे. जसे त्या महापुरुषांचे जीवन दुःखमय होते, तसेच या महापुरुषांचेही प्रारंभापासून अखेरपर्यंतचे ८० वर्षांचे प्रदीर्घ जीवन (आजच्या मानाने ते प्रदीर्घच म्हणावे लागेल) सुखाचा एक क्षणही न लाभलेले होते.
त्यांच्या तुलनेत आपला मार्ग अधिक सुकर आहे. आपल्याला अनेक अनुकूलता प्राप्त आहेत. त्यांनी असंख्य दुःखे भोगून हा मार्ग आपल्यासाठी सुकर केला आहे. आता आपल्याला सुगमता लाभली म्हणून घरात स्वस्थ बसणे योग्य नाही. मार्ग सुकर झाला आहे, तर पुढे चालत राहणे, पुढील पिढ्यांसाठी तो आणखी सुकर करणे, त्यांना ध्येयापर्यंत सहजतेने पोहोचता येईल, असा मार्ग अधिक सुलभ बनवणे, हेच आपले कर्तव्य आहे. हे कर्तव्य श्रद्धेने पार पाडले पाहिजे.
ज्या महाविभूतीमुळे आपल्या राष्ट्राची सुस्पष्ट कल्पना आपल्यासमोर उभी राहिली, राष्ट्राच्या अधिष्ठानरूप सामर्थ्याची जाणीव झाली आणि जीवनाच्या प्रत्येक अंगातून विशुद्ध राष्ट्रजीवन प्रकट व्हावे, ही भावना आपल्या अंतःकरणात निर्माण झाली, त्या भावनेसाठी अखंड प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्या महापुरुषांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, राष्ट्रसामर्थ्याचे असामान्य आणि सर्वव्यापी स्वरूप प्रकट करण्यासाठी, संपूर्ण आयुष्यभर, मृत्यूपर्यंत प्रयत्नांत खंड पडू देणार नाही; आपल्या वैयक्तिक जीवनात सुख लाभो वा न लाभो, असा प्रखर निश्चय करून चालणे, हेच आपल्यासाठी योग्य आहे आणि हाच त्यांच्याप्रति आपला विनम्र श्रद्धाभाव ठरू शकतो.
श्रद्धांजली म्हणून मोठमोठी वाये लिहिणे, शब्दरचना करणे, कविता लिहिणे हेही चांगलेच आहे. पुढील पिढ्या ते वाचतील आणि समजून घेतील. परंतु, आज आपल्या दृष्टीने त्यांच्याप्रति खरी श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे त्यांनी सुरू केलेले कार्य पुढे नेणे होय. त्या राष्ट्राच्या शुद्ध स्वरूपासाठी जी प्रबळ, अजिंय शक्ती आवश्यक आहे, तिच्या निर्मितीसाठी जीवनाच्या अखेरपर्यंत अखंड प्रयत्नशील राहणे, हीच खरी श्रद्धांजली ठरू शकते. ज्या महान स्वप्नाकडे पाहात त्यांनी देहत्याग केला, ते स्वप्न पूर्णत्वास येण्याचा क्षण आता जवळ येताना दिसत आहे, अशी स्थिती आपण आपल्या प्रयत्नांनी निर्माण करावी. तो दिव्य आत्मा या पृथ्वीचा त्याग करून अनंतात विहार करत असला, तरी तो आपल्याला आशीर्वाद देत आहे, असे जाणवते आणि आपण त्याच्या कार्याला अधिक तेजस्वीपणे पुढे नेत आहोत, हे पाहून तो आनंदित आणि पुलकित होईल. हे दृश्य प्रत्यक्ष घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील आणि परिश्रमशील राहणे, हीच खरी श्रद्धांजली आहे. आणि हाच त्या महापुरुषांप्रति कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेला सर्वोच्च श्रद्धाभाव ठरू शकतो.
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर
सावरकरांनी स्वातंत्र्यप्राप्तीचे एक प्रभावी साधन म्हणून सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला होता. त्याचबरोबर स्वतंत्र, स्वयंपूर्ण व निर्दोष समाज कसा असावा, याविषयीही त्यांनी मौलिक चिंतन केले होते. स्वातंत्र्यपूर्व क्रांतिजीवनात वा स्थानबद्धतेच्या काळात, तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही विपुल लेखन करून त्यांनी समाजाचे उद्बोधन करण्याचा प्रयत्न केला होता, याची समाजाला विशेष माहिती झाली नाही. सावरकरांनी बोटीतून समुद्रात उडी मारल्याची चित्तथरारक घटना लोकांच्या पक्की आठवणीत आहे; परंतु अंदमानच्या भयानक कारावासातही त्यांनी तेथील भयंकर वाटणार्या कैद्यांना माणसात आणण्याचा प्रयत्न केला होता, हे लोक विसरले. स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांच्या तेजस्वी क्रांतिजीवनाच्या दीप्तीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे तितकेच श्रेष्ठ अन्य पैलू दृष्टीला आले नाहीत. देश स्वतंत्र झाल्याने ‘कारावास’, ‘बलिदान’, ‘क्रांती’ आदि शब्दांचे आशय बदलले, हे लोकांनी ध्यानात घेतले नाही. स्वातंत्र्योत्तर काळात बलिदान करण्याची आवश्यकता नाही. परंतु, बलिदानास आधारभूत असलेल्या सर्वस्व-अर्पण वृत्तीने राष्ट्रघडणीचे कार्य करावे लागते, ध्येयसिद्धीसाठी मृत्यूला आलिंगन देण्याची तयारी करण्याऐवजी हेतुप्रधान जीवन जगण्याची आवश्यकता आहे. केवळ स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच नव्हे, तर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी रक्त, अश्रू व घाम गाळावे लागतात इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींकडे सर्वसाधारण समाजाचे दुर्लक्ष झाले. समाजाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले राजकीय नेते, विचारवंत समाजधुरीण, शास्त्रज्ञ समाजाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात मौलिक चिंतन करीत नाहीत, हे खेदजनक दृश्य सर्वत्र दिसते. यासंदर्भात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मौलिक चिंतन व मार्गदर्शन केले आहे, याची माहिती फार कमी लोकांना आहे.
- बाळासाहेब देवरस, तृतीय सरसंघचालक
(डॉ. अरविंद गोडबोले लिखित आणि संपादित ‘सावरकर विचार दर्शन’
पुस्तकाची प्रस्तावना, पृष्ठ ६-७)
‘राष्ट्रधर्मो विवर्धति सावरकरकीर्तनेन’
स्वातंत्र्यवीर सावरकर हे जन्मतः प्रतिभावान होते. गायन, लेखन, नाटक, कविता सर्वकाही त्यांच्याजवळ होते. उत्तम वक्तृत्व कौशल्य होते. उच्चविद्याविभूषित होते. हे सर्वकाही त्यांनी देशासाठी समर्पित केले. स्वतंत्र भारताचे संरक्षण कसे करावे आणि त्यासाठी काय केले पाहिजे, हे त्यांनी पूर्वीच सांगून ठेवले. आपण सावरकरांचे स्मरण त्यांच्या देशभक्तीकडे पाहून करतो. त्यांच्या स्वप्नातील देश आपल्याला उभा करायचा आहे आणि ते स्वप्नं आपले स्वप्नं असायला हवे. ते स्वप्नं साकारण्यासाठी त्याच प्रकारची उत्कट देशभक्ती असायला हवी. प्रातःस्मरणाच्या श्लोकांमध्ये पांडवांना संबोधित एक श्लोक आहे. ’धर्मो विवर्धति युधिष्ठिरकीर्तनेन’ या उक्तीप्रमाणे ’राष्ट्रधर्मो विवर्धति सावरकरकीर्तनेन’ असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अंदमानहून आल्यानंतर देखील सावरकरांनी आपले राष्ट्रकार्य सुरूच ठेवले. देशातील प्रत्येकात देशभक्तीचा भाव आहे. मात्र, तो उत्कट स्वरूपात असणे आवश्यक आहे. सावरकरांनी ज्या गोष्टींचा विचार करून देशकार्य केले, त्याचे आचरण आपल्या जीवनात करण्यासाठीचे स्मरण राहावे यासाठी आपण त्यांची मूर्ती तयार करतो, त्यांनी रचलेल्या गीतांना स्वरबद्ध करून ते प्रसिद्ध करतो, याचे भान आपल्याला ठेवावे लागेल. सावरकरांना जी अपेक्षा होती, ती प्रत्येक भारतीयाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा. हे समर्पणाशिवाय संभव नाही. त्यांच्या कविता पाहिल्यास एक एक कवितेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एक एक पैलू आपल्याला मिळतील. स्वतंत्रता देवीच्या आरतीमधून उत्कट स्वातंत्र्यकांक्षा स्पष्ट होते. त्याच्याच शेवटच्या कडव्यातून वीरभाव प्रकट होतो. स्वतंत्र भारताचे संरक्षण कसे करावे, हे त्यांनी कायम सांगितले. आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीप्रती त्यांचे स्मरण करतो. ‘मी महाराष्ट्राचा आहे, मी अमुकतमुक जातीचा आहे’ असा विचार त्यांनी कधी केला नाही.
- डॉ. मोहनजी भागवत, सरसंघचालक (अंदमानमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी, डिसेंबर २०२५ केलेले भाषण)
(अनुवाद : ओंकार मुळ्ये)