सिनेमातला एक प्रसिद्ध डायलॉग आहे, ‘एक मच्छर आदमी को **डा बना देता हैं’ पण, इथे तर एका ‘झुरळ’ संज्ञेनेच अख्ख्या विरोधी पक्षाच्या सत्तापिपासू नेत्यांना कायचे काय (शब्दही सुचत नाही असे) बनवले आहे. अनेक विरोधी पक्षनेत्यांना त्यात, ‘आदुराजें’नाही ‘झुरळ’बद्दल सार्थ अभिमान आहे. ते तर थेट म्हणाले, "हम भी सारे कॉकरोच हैं कॉकरोच आसानी से मरता नही” वाटते एकेकाला झुरळ व्हावे, लोकांनी आपला तिरस्कार करावा किंवा आपल्याला चिरडून टाकावे. तरीही, प्रश्न उरतोच की, चिरडून किंवा क्षणात तडफडूनच मरायचेच आहे, तेही कुणाचेही भले न करता? त्यात इतके सुख कसले आणि अभिमान कसला? पण, नाही! वैज्ञानिकाला जेव्हा शोध लागला, तेव्हा तो जितक्या आनंदाने ‘युरेका युरेका’ म्हणाला असेल, त्याच्या करोडपटीने राज्य आणि देशातल्या विरोधी पक्षाच्या अंगी ‘झुरळ’ संज्ञा मिळाल्यावर उत्साह संचारला आहे.
चार दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगावे, असे म्हणणारे आणि कृती करणारे अनेक विचारवंत या महाराष्ट्रात जन्माला आले. ‘सेनेचा ढाण्या वाघ...’ वगैरे वगैरे शब्द या महाराष्ट्राने कितीवेळा एकले असतील, याची गणतीच नाही. पण, त्याच महाराष्ट्रात आज आदित्य ठाकरे ‘हम भी सारे कॉकरोच?’ असल्याचे म्हणत आहेत, अरेरे... विरोधी पक्षाची मानसिकता अत्यंत नैराश्यात गेली आहे. सत्ता नाही, सत्तेतून मिळणारे उपभोग नाहीत, सत्तेची शक्ती नाही, मग आता उअरले काय? बरे, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकार असल्याने, काहीही केले तरी पुन्हा लवकर सत्ता मिळणे नाही. मग करायचे काय? तर, ‘मैं भी झुरळ, तू भी झुरळ’ म्हणत, लोकांचे नसलेले लक्ष वेधून घ्यायचे. अर्थात, त्या ‘झुरळ पार्टी’बद्दल काही म्हणायचेच नाही कारण, यथावच्च महाराष्ट्रात झुरळाला पाहून कुणीही ‘या... या! बसा... बसा!’ म्हणून स्वागत करत नाही की, झुरळाला आवडूनही घेत नाही. पण, तरीही झुरळ होऊन घाणीत बरबटणे आणि चिरडून मरून जाणे यातच काहींना स्वारस्य असेल, तर काय करावे? पण, या सगळ्या गदारोळात साहेबांच्या निष्ठावानांना प्रश्न पडला आहे की, पूर्वी ‘कोण आला रे कोण आला?’ या प्रश्नाला उत्तर ‘वाघ आला...’ असे द्यायचो. पण, आता ‘कोण आला रे कोण आला?’ प्रश्नाला उत्तर काय द्यायचे?
मुंबईला मोकळा श्वास हवा!
चोरी, दगडफेक याची भीती बाळगत प्रवास करणारा मुंबईकर, याच परिसरातून प्रवास करायचा. इथे काही अघटित घडले, तर दाद मागणार कुठे? कारण, ‘मिया भाय’ म्हणून या झोपडपट्टीमध्ये प्रचंड एकी होती. दुसरे असे की, ही झोपडपट्टी रेल्वेच्या कोट्यवधी रुपयांच्या जागेवर अनधिकृतरीत्या वसलेली होती. त्यामुळे या मार्गाचा विकास करणे रेल्वेला केवळ एका गरीबनगरमुळेच शक्य नव्हते. मात्र, न्यायालयाच्या आदेशाने सरकार आणि प्रशासनाने, गरीबनगर झोपडपट्टीतील अनधिकृत झोपड्या-दुकाने तोडली (न्यायालयाच्या आदेशानुसार वैध असलेली १०० घरे तोडली नाहीत.) मात्र, आता वांद्रे, गरीबनगरमधील ‘अतिक्रमण हटाव’ मोहिमेनंतर ‘वांद्रे टर्मिनस’ विस्ताराला गती मिळणार असून, वांद्रे टर्मिनस पुनर्विकासात थेट पश्चिम द्रुतगती मार्गाच्या जोडणीचे नियोजन आहे. भुयारी मेट्रोमुळे वांद्रे टर्मिनस भविष्यात, ‘मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’ म्हणून विकसित होणार आहे. तसेच वांद्रे टर्मिनसहून भुयारी मेट्रोने, थेट गेटवेला आणि पूर्व उपनगरात पोहोचणेही शक्य होणार आहे.
असो या नगरावर कारवाई झाल्यानंतर एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर आला. या व्हिडिओत तो म्हणतो, "सुनील दत्त असते, तर आमच्या झोपड्या तुटल्या नसत्या.’ त्याचा विश्वास खोटा अजिबातच नाही. मुंबईमध्ये ६० ते ८०च्या दशकात, सर्वसाधारणपणे झोपडपट्ट्यांचे पेव फुटले. त्यावेळी देशात आणि राज्यातही ‘हाताचा पंजा’च सत्तेत होता. सत्ता मिळवण्यासाठी जास्त मतदान हवे आणि जास्त मतदानासाठी आपल्यालाच खात्रीने मतदान करतील, ते लोक शहरात वसवायला हवेत. त्यांच्यातल्या काहींना विशेष सहकार्य करत दादा, भाई, अण्णा म्हणत नेता बनवायचे आणि सत्तेची मलई खायची, हे उद्योगधंदे तेव्हा जोमात सुरू झाले. पण, आता सरकार बदलले आहे. त्यामुळे देश आणि समाजाचा विकास होणारच. कारवाई झाल्यावर तिथले लोक कुठे जातील, असा प्रश्न काही लोक विचारत आहेत. पण, अनधिकृत वस्तीसाठी अख्ख्या मुंबईला वेठीस धरायचे का? कुठे तरी अनधिकृत वस्ती वसवणार्यांनाही वचक बसलाच पाहिजे. मुंबईने देशभरातल्या गरजूंना आसरा दिला. आता मुंबईला परतफेड करण्याची वेळ आली आहे, मुंबईलाही मोकळा श्वास घेऊ द्या!
९५९४९६९६३८