मुंबई : (Mumbai Infrastructure Development) मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत महारेलने भायखळा केबल-स्टेड रोड ओव्हर ब्रिज प्रकल्पात मोठे अभियांत्रिकी यश संपादन केले आहे. या प्रकल्पातील सर्व 40 स्टे केबल्सची यशस्वी उभारणी आणि स्थापना पूर्ण झाली असून, मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला भविष्यात नवे बळ देणारा हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
दि. 21 मे 2026 रोजी अंतिम स्टे केबलची उभारणी पूर्ण झाल्यानंतर 173 मीटर लांबीचा मुख्य स्पॅन आता पूर्णपणे केबल प्रणालीवर आधारित संरचनात्मक आधाराने सक्षम झाला आहे. जवळपास 5,000 मेट्रिक टन वजनाच्या या केबल-स्टेड संरचनेमुळे मुंबईच्या शहरी पायाभूत विकासात एक नवीन मानदंड निर्माण झाला आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या शंभर वर्षांहून अधिक जुन्या भायखळा पुलालगत हा अत्याधुनिक पूल उभारला जात आहे. विशेष म्हणजे, नवीन पूल आधी उभारून पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. नवीन पूल सुरू झाल्यानंतर जुन्या पुलाचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
या पुलाची आणखी एक विशेष बाब म्हणजे महारेलचे पेटंट असलेले त्रिस्तरीय युटिलिटी डक्ट सिस्टम. याशिवाय आकर्षक रिमोट नियंत्रित एलईडी फसाड लाइटिंग, नागरिकांसाठी खास सेल्फी पॉइंट आणि राष्ट्रीय सणांवर तिरंगी रोषणाई अशी वैशिष्ट्ये या प्रकल्पाला केवळ वाहतूक सुविधा न ठेवता एक शहरी ओळख देणार आहेत.
भायखळा भाजी मार्केट आणि कार्यरत रेल्वेमार्गांवर अत्याधुनिक डेक इरेक्शन क्रेन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरू असलेले काम हे या प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक टप्प्यांपैकी एक मानले जात आहे.(Mumbai Infrastructure Development)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.