नशामुक्तीचा संदेश घराघरात पोहोचवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

    27-May-2026   
Total Views |
Mumbai Anti Drug Drive
 
मुंबई : (Mumbai Anti Drug Drive) नेस्को येथे ड्रग्सच्या सेवनामुळे घडलेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी नशामुक्तीचा संदेश घराघरात पोहोचवण्याचे निर्देश दिले.
 
यावेळी मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई पालिका क्षेत्रात संपूर्ण वर्षभर नशा मुक्ती अभियान राबवण्यात येईल, अशी घोषणा केली होती.
 
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने गृह विभागाने शासन निर्णय जारी करून या संदर्भात उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून मंत्री लोढा हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. या उच्चस्तरीय समितीची ही पहिली बैठक पार पडली.
 
यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात नशा मुक्ती अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. २६ जून हा केवळ एक दिवस नसून, समाजाला योग्य दिशेने नेण्याच्या जबाबदारीची आठवण करून देणारा महत्त्वाचा क्षण आहे. विशेषतः युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर, शासन आणि समाजाने एकत्र येत नशामुक्तीचा संदेश घराघरात पोहोचवणे अत्यावश्यक आहे.”
 
या बैठकीत नशा मुक्ती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दि. २६ जून या जागतिक अमली पदार्थविरोधी दिनाचे औचित्य साधून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, व्यायामशाळा, स्पोर्ट्स क्लब तसेच मनपाच्या प्रभाग कार्यालय यासारख्या महत्वाच्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने एकाच वेळी कार्यक्रम आयोजित करण्याचा समावेश आहे.नया मोहिमेअंतर्गत वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्याचे मासिक वेळापत्रकदेखील तयार करण्यात आले आहे.(Mumbai Anti Drug Drive)
  
जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
 
या मोहिमेत महानगरपालिका, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग तसेच पोलीस प्रशासन यांच्यासह इतर सर्व विभागांचाही सहभाग राहणार आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृतीसाठी पोस्टर्स, शॉर्ट फिल्म्स, पथनाट्य, जिंगल्स, गाणी तसेच विविध स्पर्धांचा वापर करण्यात येणार आहे.(Mumbai Anti Drug Drive)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....