...तर हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही;मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; विधानपरिषद जागावाटपासंदर्भात ९९ टक्के चर्चा पूर्ण

    27-May-2026   
Total Views |
Legislative Council Seat-sharing
 
नागपूर : (Legislative Council Seat-sharing) यापुढे हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्याबद्दल अश्लील भाषा वापरल्यास भाजपचे कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असे प्रत्युत्तर महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अश्लील टीका करून हर्षवर्धन सपकाळ यांनी काल त्यांची नीच प्रवृत्ती आणि मुर्खपणा दाखवून दिला. सपकाळ यांची उंची किती, त्यांचा आवाका काय आणि ते कुणावर बोलतात? यानंतर असे वक्तव्य करून महाराष्ट्रातील दोन पक्षांमध्ये वाद लावण्याचे काम करू नये. अन्यथा, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा जनआक्रोश होईल आणि सपकाळ यांना पळती भुई थोडी होईल."
 
विधानपरिषद जागावाटपासंदर्भात ९९ टक्के चर्चा पूर्ण
 
ते पुढे म्हणाले की, "विधानपरिषद जागावाटपासंदर्भात महायुतीची जवळपास ९९ टक्के चर्चा पूर्ण झाली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एकत्रित बसून उद्यापर्यंत महायुतीच्या सर्व जागांची अधिकृत घोषणा करतील."(Legislative Council Seat-sharing)
 
मराठा समाजाला न्याय मिळताना ओबीसींच्या हक्काचे जाऊ नये
 
"मागच्या आठवड्यात ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये सर्वच मंत्री होते आणि आम्ही काही अजेंडा ठरवला. ओबीसींच्या प्रश्नांसाठी मी स्वतः केंद्राकडे जाणार आहे. राज्यात ओबीसी समाजातील अठरापगड जाती, १२ बलुतेदार समाजाचे प्रश्न सोडवणे या समितीची जबाबदारी आहे.
 
राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे हे यासाठी पुढाकार घेत आहे. पण हे करत असताना मुख्यमंत्र्यांनी ओबीसीच्या कल्याणाकरिता दिलेल्या योजना पुढे नेणे आणि समाजापर्यंत पोहोचवणेही गरजेचे आहे. तसेच मराठा आणि ओबीसी समाज समोरासमोर येणार नाही, या ताटातले त्या ताटात आणि त्या ताटातले या ताटात जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपसमितींना दिल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि ओबीसींच्या हक्काचे काही जाऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी आमची आहे."
 
गोहत्या करणाऱ्यांवर मोक्का
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महाराष्ट्रात गोहत्या होणार नाही. गोहत्या करणाऱ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई होईल, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. गोमातेला कुणीही हात लावण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्रामध्ये सर्व पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. केवळ बकरी ईदलाच नाही तर यानंतरही गौमाता सुरक्षित राहील याची काळजी सरकार घेत आहे."(Legislative Council Seat-sharing)




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....