संस्कार विरुद्ध संशय

    27-May-2026   
Total Views |
Indian Values Global Recognition
 
ब्रिटनमध्ये एकाच वेळी महापौरपद भूषवणार्‍या, हरियाणाच्या आई-मुलाची यशोगाथा ही जागतिक स्तरावर भारतीयांच्या कर्तृत्वाची आणि सुसंस्कृततेची साक्ष देते. परंतु, दुसरीकडे अमेरिकेतील टेसासमध्ये, याच भारतीय समुदायाला पूर्वग्रहातून लक्ष्य केले जात आहे. आज वैश्विक पटलावर भारतीय आणि विशेषतः हिंदू समुदाय आपल्या कठोर परिश्रम, शांतताप्रिय स्वभाव आणि उच्चशिक्षणामुळे यशाची शिखरे पादाक्रांत करतो आहे. ब्रिटनच्या भूमीवर हरियाणातील रोहतकच्या कुटुंबाने रचलेला इतिहास, याचे उत्तम उदाहरण आहे. अवघ्या २३ वर्षांचे तुषार कुमार हे ‘एल्स्ट्री आणि बोरहॅमवुड टाऊन कौन्सिल’चे सर्वांत तरुण महापौर झाले, तर त्यांच्या आई परवीन राणी यांनी ‘हर्ट्समेअर बरो कौन्सिल’च्या पहिल्या भारतीय वंशाच्या महापौर म्हणून शपथ घेतली. ही घटना सिद्ध करते की, भारतीय संस्कृती कोणत्याही देशात जाऊन तेथील लोकशाहीशी आणि समाजाशी समरस होऊ शकते.
 
परंतु, दुसरीकडे अमेरिकेतील टेसास प्रांतातून, एक द्वेषपूर्ण विचार समोर आला आहे. टेसासच्या फ्रिस्को शहराच्या कौन्सिल बैठकीत, अमेरिकेतील कट्टर उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आणि दि. ६ जानेवारी रोजीच्या कॅपिटल हिल दंगलीतील आरोपी एडवर्ड जेकब लँग याने, हिंदू आणि अल्पसंख्याक समुदायांविरोधात गरळ ओकली. "हिंदू आणि मुसलमान टेसास ताब्यात घेण्यासाठी एकत्र येत आहेत. येथे हा मुसलमान विरुद्ध हिंदू असा प्रश्न नाही, तर ते ख्रिश्चनांना संपवण्यासाठी आले आहेत; ते आम्हाला आमच्या मातृभूमीतून हाकलून लावण्यासाठी आले आहेत,” असे त्याने म्हटले होते. त्याने पुढे जाऊन भारताला आणि दक्षिण आशियाई देशांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीकाही केली. तसेच, भारतीय संस्कृतीला ‘तिसर्‍या दर्जाची’ म्हणत, हे लोक येथे अमेरिकन बनण्यासाठी आलेले नाहीत, तर आपली संस्कृती लादण्यासाठी आले असल्याचा बिनबुडाचा आरोपही केला.
 
लँगचे हे विधान पाश्चात्त्य देशांमधील ‘ग्रेट रिप्लेसमेंट थिअरी’ या मानसिकतेतूनच आले आहे. वास्तविक, हिंदू धर्म कधीही कोणावरही सक्तीने धर्मप्रसार किंवा कोणाचा विनाश करण्याच्या विचारधारेवर चालत नाही. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा हिंदू संस्कृतीचा गाभाच आहे. अमेरिकेत राहणारा हिंदू आणि भारतीय समुदाय, हा तिथला सर्वांत शांतताप्रिय आणि कायद्याचे पालन करणारा समुदाय मानला जातो. ‘नासा’, ‘गुगल’पासून ते अमेरिकेच्या प्रशासनापर्यंत हिंदूंचे योगदान हे विध्वंसक नसून, विकासात्मकच आहे.
 
जेकब लँगने आरोप केला की, हे लोक अमेरिकन संस्कृतीत मिसळत नाहीत. परंतु, ब्रिटनमधील तुषार कुमार आणि त्यांच्या आईचे उदाहरण याला छेद देते. ते तिथल्या लोकशाही प्रक्रियेत भाग घेऊनच सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत. तसेच, ते तिथल्या मुलांना विनाशुल्क हिंदीही शिकवत, ‘हिंदी शिक्षा परिषद’ चालवतात. आपली मूळ संस्कृती टिकवून ठेवणे याचा अर्थ असा नाही की, आपण ज्या देशात राहतो, त्या देशाशी गद्दारी करत आहोत. उलट, हिंदू संस्कृती ही प्रत्येक देशाच्या प्रगतीत भरच घालते.
 
जेकब लँग हा स्वतः वॉशिंग्टन डी.सी.मधील, लोकशाहीवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी असून, त्याने या बैठकीत मशिदी आणि मंदिरे पेटवून देण्याची हिंसक धमकीही दिली आहे. अशा हिंसक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीने, शांतताप्रिय हिंदू समाजाला ‘तिसर्‍या दर्जाचा’ म्हणणे अत्यंत हास्यास्पद असेच. ब्रिटनमध्ये आई-मुलाने मिळवलेले यश आणि टेसासमध्ये जेकब लँगने व्यक्त केलेला द्वेष या दोन घटनांमधून स्पष्ट होते की, जगाला आता संकुचित विचारसरणीची नव्हे; तर भारतीय मूल्यांची गरज आहे. ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या आई-मुलाने लोकशाही व्यवस्थेत सर्वोच्च स्थान मिळवणे, हे भारतीय समाजाच्या गुणवत्तेचे प्रतीक आहे; तर टेसासमध्ये व्यक्त झालेला द्वेष हा काही व्यक्तींच्या असुरक्षित मानसिकतेचा परिणाम.
 
भारतीय आणि विशेषतः हिंदू समाजाने जगभरात आपली ओळख हिंसा, कट्टरता किंवा वर्चस्ववादातून नव्हे; तर शिक्षण, परिश्रम, शिस्त आणि संस्कारांतून निर्माण केली आहे. त्यामुळे अशा द्वेषपूर्ण वक्तव्यांनी भारतीय समाजाची प्रतिमा मलिन तर होणार नाहीच उलट, जग अधिक स्पष्टपणे ओळखेल की, विकास, समरसता आणि लोकशाही मूल्यांना बळ देणारी शक्ती कोणती आहे.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक