आज असलेल्या बकरी ईद निमित्ताने होणारी कुर्बानी ही कायमच टिकेचा विषय होते. या कुर्बानी नंतरचे कित्येक दिवस या विषयावर राजकारणही रंगते. मात्र, सणही साजारा करता यावा आणि नियमही पाळले जावेत, यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला कठोर आदेश दिले आहेत.
'बकरी ईद’ सणाच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांच्या हत्या करण्याचे जे प्रकार घडतात, त्यावर उत्तर प्रदेश सरकारने कठोरपणे बंदी घातली आहे. तसेच ईदनिमित्त रस्त्यांवर ‘नमाज’ पठनाचे जे कार्यक्रम होतात, त्यावरही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली. रस्त्यांवर ‘नमाज’ पढून जी वाहतुककोंडी होते, ती लक्षात घेऊनच रस्त्यांवर नमाजास अनुमती न देण्याचे आदेशही योगी आदित्यनाथ यांनी दिले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कायदा-सुव्यवस्था स्थितीचा आणि प्रशासकीय व्यवस्थेचा आढावा एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला. ‘बकरी ईद’ सणाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक सलोखा, शांतता राखली जावी, यासंदर्भात अनेक कडक सूचनाही प्रशासकीय अधिकार्यांना देण्यात आल्या.
कायदा-सुव्यवस्था राखणे, धार्मिक सलोखा राखणे यास आपले सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांचे बळी देण्यास अनुमती दिली जाणार नाही, तसेच प्रशासनाने पूर्वअनुमती दिलेल्या ठिकाणीच प्राण्यांच्या हत्या केल्या जातील. तसेच ज्या प्राण्यांची हत्या करण्यावर राज्यामध्ये बंदी आहे, त्याचे राज्यात अत्यंत काटेकोर पालन केले जाईल, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. तसेच अशा सणांच्या निमित्ताने कोणत्याही नव्या प्रथांना अनुमती दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करून, जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असे आदेशही त्यांनी दिले.
"बकरी ईद सणानिमित्त रस्त्यांवर ‘नमाज’ पढता कामा नयेत, याच्या काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश अधिकार्यांना देण्यात आले आहेत. परंपरागत आणि निर्धारित अशा धार्मिक जागीच नमाजास अनुमती दिली जावी आणि कोणत्याही परिस्थितीत नमाजासाठी रस्ते अडविले जाता कामा नयेत, याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याकाळात कोणत्याही प्रकारची वाहतुककोंडी होता कामा नये आणि सार्वजनिक वाहतूक नेहमीप्रमाणेच सुरळीत सुरू राहिली पाहिजे,” असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. धार्मिक एकत्रीकरणाचा जनतेला त्रास होता कामा नये आणि कायदा-सुव्यवस्थेलाही बाधा येता कामा नये, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
तसेच कत्तलखान्यांवर लक्ष ठेवण्याचे आणि त्यांच्याकडून सर्व पर्यावरणीय आणि कायदेशीर नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याकडेही लक्ष देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई केली जावी जे परवानाधारक कत्तलखाने आहेत, ते जी क्षमता निश्चित केली आहे त्यापेक्षा अधिक प्राणिहत्या करीत नाहीत ना, याकडे लक्ष देण्याचे; तसेच शहरे आणि ग्रामीण भागात स्वच्छतेची काळजी घेण्याचेही आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. संवेदनशील भागांमध्ये ध्वजसंचलन, धार्मिक स्थानांच्या परिसरात गस्त घालण्याचे आदेशही दिले आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अलिगढ, बिजनौर, सहारनपूर, रामपूर आणि संभल या संवेदनशील जिल्ह्यांतील अधिकार्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून, परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जे आदेश आणि सूचना केल्या आहेत, तसे आदेश देशातील अन्य राज्यांतील सरकारांनी द्यावेत, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. कोणकोणत्या राज्यांमध्ये अशी दक्षता घेण्यात आली, ते जनतेला दिसून येईलच.
आसाम : सांस्कृतिक विविधतेचे दर्शन
नव्याने स्थापन झालेल्या १६व्या आसाम विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, आसाम आणि भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन सर्वांना झाले. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, गेल्या २१ मे रोजी नवनिर्वाचित १२४ सदस्यांनी शपथ घेतली. या सदस्यांनी नऊ वेगवेगळ्या भाषांमध्ये शपथ घेतली. यातील काही भाषा तर विधानसभा सभागृहात, यापूर्वी उच्चारल्याही गेल्या नव्हत्या. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव आसाम विधानसभेने घेतला.
भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या १७ आमदारांनी ‘संस्कृत’ भाषेत शपथ घेतली. एवढ्या मोठ्या संख्येत संस्कृत भाषेत शपथ घेण्याची घटना, आसाम विधानसभेत प्रथमच घडली होती. माजी सभापती विश्वजित दायमरी, ज्येष्ठ भाजप नेते बिमल बोरा, जयंत मल्ला बरुआ, भावेश कलिता आणि डॉ. मृदुल कुमार दत्त, ‘आसाम गण परिषदे’चे पृथ्वीराज राव, भाजप आमदार संजय किसान, ‘अहोम’ समाजाचे भाजप नेते मयूर बर्गोहाई आदींनी, संस्कृत भाषेत शपथ घेतली. भाजपच्या पाच आमदारांनी ‘कार्बी’ भाषेत शपथ घेतली, तर, तीन आमदारांनी ‘राजबोन्गशी’ भाषेत आणि एका आमदाराने ‘राभा’ भाषेत शपथ घेतली. या भाषांमध्ये आसाम विधानसभेत प्रथमच शपथ घेण्यात आली. या तीन भाषांचा घटनेच्या आठव्या परिशिष्टात अंतर्भाव नाही, पण, आसाममधील हजारो लोक या भाषा बोलतात. विधानसभेच्या ७५ आमदारांनी ‘आसामी’ भाषेत, १७ आमदारांनी ‘संस्कृत’मध्ये, नऊ आमदारांनी ‘बंगाली’मध्ये, आठ आमदारांनी ‘बोडो’ भाषेत शपथ घेतली. चार आमदारांनी ‘इंग्रजी’त, तर एका आमदाराने ‘हिंदी’ भाषेत शपथ घेतली. शपथविधीप्रसंगी विविध भाषांमध्ये शपथ घेऊन, आसाम विधानसभेने एक इतिहासच घडविला आहे.
पाकला आव्हान देणारी शायनाज बलोच!
‘धुरंधर’ चित्रपटामुळे रहमान बलोच हे नाव सर्वांना माहिती झाले आहे. हे चित्रपटातील नाव झाले. पण, प्रत्यक्षात पाकिस्तानी लष्कराला एका बलुच महिलेने आव्हान दिले असून, या महिलेचे नाव आहे शायनाज बलोच. ही महिला ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ची पहिली महिला कमांडर आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी, ही महिला शेकडो बलुच महिलांचे नेतृत्व करत, पाकिस्तानी लष्कराविरुद्ध सशस्त्र संघर्ष करते आहे. ‘बलुच लिबरेशन आर्मी’च्या ‘हक्कल’ या माध्यम यंत्रणेने, प्रथमच या महिला कमांडरची ओळख करून दिली. आपल्या संदेशात कमांडर शायनाजने, बलुच महिलांना बलुच इतिहास, राजकारण आणि सशस्त्र संघर्ष यांची माहिती दिली. तसेच, बलुचिस्तानमधील संघर्ष निर्णयाक टप्प्यास आला असल्याचेही संघटनेच्या सदस्यांना सांगितले. या लढ्यामध्ये बलुच महिला आघाडीवर आहेत.
‘बलुच लिबरेशन आर्मी’शी संबंधित असलेल्या शारी बलोच या महिलेने, एप्रिल २०२२ मध्ये कराची शहरात पहिला आत्मघातकी हल्ला केला होता. कराची विद्यापीठानजीक एका वाहनावर या महिलेने हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये तीन चिनी शिक्षणतज्ज्ञ आणि एक पाकिस्तानी वाहनचालकाचा मृत्यू झाला. ‘बलुच लिबरेशन आर्मी’च्या शिक्षित अशा आत्मघातकी महिला ‘बॉम्बर’ने तो पहिला हल्ला केला होता. त्या आत्मघातकी हल्ल्याची पाकिस्तानमध्ये खूपच चर्चा झाली होती. त्या घटनेनंतर अनेक बलुच महिलांची नावे यानिमित्ताने पुढे आली. विविध सामाजिक गट आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या या बलुच बंडखोर महिला, सशस्त्र संघर्षात सहभागी झाल्या आहेत. कमांडर शायनाज बलोच हिने अनेक बलुच महिलांना ‘एके ४७’सारखी शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले असून, या संघर्षासाठी अनेक बलुच महिलांना प्रवृत्त केले आहे. कमांडर शायनाज बलोच ही केच जिल्ह्यातील तुम्प भागातील असून, आत्मघातकी हल्ला केलेली शारी ही ‘बॉम्बर’ही पण त्याच जिल्ह्यातील होती. शायनाज ही विद्यार्थीदशेत ‘बलुच विद्यार्थी संघटने’च्या संपर्कात आली. बलुच राजकारणात या विद्यार्थी संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता शायनाज बलोचने, आपल्या संघटनेच्या माध्यमातून पाकिस्तानी लष्कराला उघड आव्हान दिले आहे. अलीकडेपर्यंत बलुच महिला घराबाहेर पडत असल्याचे दिसत नसे. पण, आता आपल्या स्वातंत्र्यासाठी बलुच महिला सशस्त्र संघर्ष करण्याच्या पवित्र्यात असून, त्या महिलांचे नेतृत्व कमांडर शायनाज बलोच ही बेडर महिलाच करीत आहे. आपल्या स्वत:च्या रक्षणासाठी नव्हे; तर बलुच राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आणि संरक्षणासाठी आपण शस्त्र हाती घेतल्याचे कमांडर शायनाजने बलुच जनतेपुढे बोलताना सांगितले. ‘गप्प बसू नका,’ असे आवाहन तिने बलुच जनतेला केले आहे. या बलुच महिला कमांडरने, पाकिस्तानी लष्करापुढे आव्हान उभे केले आहे.
९८६९०२०७३२