स्वा. सावरकर आणि डॉ. हेडगेवार यांचा परस्परसंबंध

    27-May-2026
Total Views |
  
Swa.Vinayak Damodar Savarkar
 
स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर (१८८३-१९६६) आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार (१८८९-१९४०) ही आपल्या इतिहासातील दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वे. विशेष करून ‘हिंदुत्व’ विचारधारेच्या आणि ‘हिंदू संघटन’ चळवळीबाबतीत ही आघाडीची नावे आहेत. प्रचलित विचारविश्व आणि समाजव्यवस्था अशा दोन्ही गोष्टींवर शाश्वत परिवर्तन घडविणारे, समान ध्येय असलेले हे दोन्ही नेते खर्‍या अर्थाने युगप्रवर्तक होते. त्यांचा प्रभाव त्यांच्या जीवनकाळापुरता मर्यादित नसून तो त्यानंतरच्या १२५ वर्षांत वाढताना दिसतो. प्रस्तुत लेख रा. स्व. संघाच्या अभिलेखागारातील मूळ कागदपत्रे, समकालीन वृत्तपत्रे, ब्रिटिशकालीन गुप्त कागदपत्रांमधील नोंदी आणि बाबाराव व तात्याराव सावरकर यांचे चरित्र-ग्रंथ यांवर आधारलेला आहे. विस्तारभयास्तव लेखात केवळ घटनांचा उल्लेख करण्यात आला असून, त्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. स्वा. सावरकर आणि डॉ. हेडगेवार या दोघांमधील संबंध कसा व कुठे आला आणि तो कशा प्रकारचा होता, याविषयीची माहिती देणारा हा प्रदीर्घ लेख...
 
स्वा. सावरकर १९३७ साली विना अट मुक्त झाले आणि १९४० साली डॉटरांचा मृत्यू झाला, हे लक्षात घेता, बंधमुक्त सावरकरांचा आणि डॉटरांचा एकत्रित काळ तीन वर्षांचा आहे. दोघांमध्ये पुष्कळ पत्रव्यवहार चाले. प्रत्यक्ष भेटींचा विचार केला, तर १९२५ सालच्या एका भेटीचा अपवाद वगळता, सर्व प्रत्यक्ष भेटी १९३७ ते १९४० या काळात झाल्या. शेवटची भेट दि. ११ मे १९४० या दिवशी पुण्यात संघाचा ‘ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्प’ चालू असताना प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रांतिक बैठकीत सावरकरांनी मार्गदर्शन केले तो प्रसंग! अनेक भेटी दीर्घ सहवासाच्या, एकत्रित दौर्‍याच्या स्वरूपाच्या, संघाच्या आणि पर्यायाने देशाच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणार्‍या होत्या.
 
स्वा. सावरकरांशी डॉटरांचा संबंध आला, त्याअगोदर त्यांचा बाबा (गणेश दामोदर; १८७९ ते १९४५) आणि बाळ (नारायण दामोदर; १८८८ ते १९४९) या तात्यारावांच्या दोन बंधूंशी संबंध आला. डॉटरांच्या चरित्राच्या आणि संघविकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा अन्य दोन सावरकर बंधूंशी संबंधित काही घटनांचाही या लेखात उल्लेख आहे.
 
पहिला अप्रत्यक्ष संबंध
 
सन १९०८ नंतर क्रांतिकार्यात अधिकाधिक सक्रिय झालेल्या केशवराव हेडगेवारांच्या वाचनात ‘काळ’, ‘केसरी’, ‘भाला’, ‘अमृत बाझार पत्रिका’ ही वर्तमानपत्रे होती. त्यांत १९०६ ते १९१० या चार वादळी वर्षांत क्रांतिकारक सावरकरांनी इंग्लंडमध्ये केलेला पराक्रम, त्यांच्यावरील अभियोग आणि अंदमानात झालेली रवानगी ही केशवरावांच्या वाचनात आलेली असणार, यात काही शंका नाही. जानेवारी १९१०ला केशवराव हेडगेवार यांनी डॉटरकीच्या शिक्षणापेक्षा ‘अनुशीलन समिती’ या गुप्त संघटनेचे पुलिन बिहारी दास यांच्या हाताखाली क्रांती व संघटन करण्यासाठी कोलकात्याच्या नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे राष्ट्रकार्य करत असताना त्यांना वैद्यकीय पदविकेचे प्रमाणपत्र दि. १२ सप्टेंबर १९१४ला मिळाले असले, तरी १९१६च्या सुरुवातीला ते नागपूरला परत आले. कोलकात्याला शिकणार्‍या पुण्या-नागपूरकडील विद्यार्थ्यांचा ‘मराठा लॉज’ होता; त्याचेच पुढे ‘महाराष्ट्र लॉज’ असे नाव पडले. याशिवाय वर्‍हाडमधील विद्यार्थ्यांनी ‘शांतिनिकेतन’ व कर्नाटकातून आलेल्या विद्यार्थ्यांनी ‘कर्नाटक लब’ स्थापन केले होते. या मधल्या काळात काही महिन्यांचा अपवाद वगळता, केशवराव हेडगेवार ‘शांतिनिकेतन लॉज’मध्ये राहात होते.
 
दंतचिकित्सेचे शिक्षण घेण्यासाठी केशवरावांचे समवयस्क असलेल्या नारायणराव सावरकर यांनी १९१२ साली कोलकात्याच्या नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यासंबंधी राष्ट्रीय अभिलेखागारात शिमल्याच्या ‘डायरेटर ऑफ क्रिमिनल इंटेलिजन्स’च्या साप्ताहिक अहवालात (१३ फेब्रुवारी १९१२), होम पोलिटिकल बी. प्रो., एप्रिल १९१२, पृ. १३६-१३९ मध्ये पुढील दोन उल्लेख सापडतात:
 
१) दि. २९ जानेवारी १९१२ला नाशिकच्या सावरकर घराण्यातील तिसरे बंधू नारायण दामोदर सावरकर उपाख्य बाळ यांनी पुण्याहून कोलकात्याला प्रस्थान केले. आपण नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये जात असल्याचे ते सांगत होते. तेथील अधिकार्‍यांनी त्यांच्या प्रवेशाला दिलेला नकार मागे घेतला.
 
२) दि. ३१ जानेवारी १९१२ला नारायण दामोदर सावरकर हे प्रेमचंद बोराल रस्त्यावरील मराठा लॉजवर आले आणि त्यांनी तेथे वास्तव्य सुरू केले. डॉ. एस. के. मलिक त्यांना विद्यार्थी म्हणून नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्यास तयार नसल्याचे सांगितले जात होते.
 
सावरकरांच्या आगमनानंतर लगेचच त्यांची हिडगेवार (अहवालात ‘हिडगेवार’ असे लिहिलेले आहे,) अणे (लोकनायक बापूजी अणे यांचे धाकटे भाऊ यादवराव; पुढे सप्टेंबर १९३१ मध्ये वणी, जि. यवतमाळचे संघचालक म्हणून डॉ. हेडगेवारांनी त्यांना नियुक्त केले) आणि (शंकरराव) नाईक या शांतिनिकेतन मराठा लॉजमधील तीन प्रसिद्ध जहाल विद्यार्थ्यांशी ओळख झाली.
या काळात स्वा. सावरकर अंदमानात होते आणि त्यांना वर्षातून एकदा घरी पत्र पाठविण्याची अनुमती होती. ही सर्व पत्रे नारायणराव सावरकरांना उद्देशून आहेत. पहिले पत्र १५ डिसेंबर
 
१९१२चे, दुसरे १५ फेब्रुवारी १९१४चे आणि तिसरे ९ मार्च १९१५चे आहे. या तीन पत्रांच्या काळात केशवराव हेडगेवार आणि नारायणराव सावरकर कोलकात्याला एकत्र राहात होते. तात्यारावांनी लिहिलेली ही पत्रे नारायणराव सर्वांना वाचून दाखवत असत. तेव्हा केशवराव हेडगेवारांचा स्वा. सावरकरांशी पहिला संबंध अशा प्रकारे आला.
 
सावरकर-साहित्याशी केशवराव हेडगेवारांचा संबंध कोलकात्याच्या वास्तव्यात आला. या काळात केशवरावांच्या बोलण्यात नेहमी उच्च देशविषयक विचार येत. ते त्यांचे सहाध्यायी सोमण यांच्याकडून ‘सिंहगडाचा पोवाडा’ म्हणवून घेत. हा पोवाडा स्वा. सावरकरांनी १९०५ साली रचला होता (दि. १३ सप्टेंबर १९५४ला डॉ. सोमण यांनी डॉटरांचे चरित्रकार नारायण हरी उपाख्य नाना पालकर यांना सांगितलेली आठवण; संघ अभिलेखागार, पालकरांची नोंदवही क्र. ३, पृ. २; संक्षिप्त रूप सं.अ.पा.नों, ३.२). केशवराव हेडगेवारांनी १८५७चे पुस्तक (स्वा. सावरकर लिखित ‘दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स १८५७’) कोलकात्याहून पाठविले होते. त्याला निळे आवरण होते. नागपूरला गोपाळराव टोंगू वाचीत. मोहप्याचे लक्ष्मण वामन उपाख्य आप्पा हळदे (हे पुढे नागपूर जिल्हा संघचालक झाले), (कोलकात्याहून नागपूरला सुटीवर आलेले) केशवराव हेडगेवार), यादवराव सुभेदार (हे पुढे हिंगणीचे संघचालक झाले) ऐकत असत. फडणीसांच्या वाड्यात गोपाळरावांकडे वाचन चाले (दि. ६ डिसेंबर १९५४ला हळदे यांनी पालकरांना सांगितलेली आठवण; सं.अ.पा.नों, २.१३२). पुढे संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते उमाकांत केशव उपाख्य बाबासाहेब आपटे व इतरांनी ‘वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स’च्या नऊ प्रती केल्या. त्यांतील प्रत्येक प्रतीला रु. ४० पर्यंत खर्च आला होता. त्याची मूळ डॉटरांकडून मिळाली होती (पालकरांचे टिपण; सं.अ.पा.नों, ५.१५).
 
सावरकर बंधूंच्या सुटकेची मागणी
 
सन १९२०ला काँग्रेसचे अधिवेशन लो. टिळकांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला होणार होते, त्यानिमित्त मे-जून १९२०ला मध्य प्रांतात ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये डॉ. हेडगेवारांची भाषणे होत. सभेत संमत झालेल्या ठरावांमध्ये राजकीय बंदिवानांची मुक्तता विशेषतः सावरकर बंधूंची मुक्तता असा विषय असे. दि. ४ जून १९२०ला सेलू, जि. वर्धा येथे डॉ. मुंजे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभेत संमत झालेल्या आठ ठरावांपैकी दुसरा ठराव ‘राजकीय कैद्यांची विशेषतः सावरकर बंधूंची मुक्तता न करणार्‍या व्हाईसरॉयच्या धोरणाचा धिक्कार’ असा होता. एकंदर समाज दोन हजार हजर होता. डॉ. मुंजे, बाबासाहेब देशपांडे, बडोदेकर, डॉ. हेडगेवार, शेठ सतीदास, रामभाऊ अभ्यंकर यांची ठरावांवर भाषणे झाली. (महाराष्ट्र, १६ जून १९२०).
 
दि. १५ मे १९२१ला दुपारी विनायक दामोदर व गणेश दामोदर या दोघा सावरकर बंधूंना अंदमानाहून कोलकात्यावरून मुंबईस आणून विनायक दामोदर यांस बोटीने रत्नागिरीस नेले व त्यांना तेथील तुरुंगात ठेवण्यात आले. बंदरात काही लोकांना त्यांचे दर्शन घडले. गणेश दामोदर यांस विजापूरच्या तुरुंगात ठेवण्यात आले (महाराष्ट्र, २५ मे १९२१). ऑगस्ट १९२२च्या शेवटच्या आठवड्यात, सन १९०९ पासून तुरुंगात असलेल्या बाबाराव सावरकर यांची साबरमती कारागृहातून सुटका झाली. धाकटे बंधू नारायणराव यांच्यासह ते अहमदाबादहून मुंबईला आले. वाटेत व ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले; पण ते स्वीकारण्यास किंवा आलेल्या मंडळींजवळ बोलण्याससुद्धा त्यांना शक्ती नव्हती. (महाराष्ट्र, ६ सप्टेंबर १९२२).
 
दि. १३ ऑटोबर १९२३ला स्वा. सावरकर यांच्या मुक्ततेसंबंधी ईशप्रार्थना करण्यासाठी टाऊन हॉलच्या पटांगणात भगवान दीन यांच्या अध्यक्षतेखाली नगर काँग्रेस कमिटीच्या विद्यमाने जाहीर सभा भरली होती. शंकर त्र्यंबक उपाख्य दादा धर्माधिकारी मास्तर यांनी मुद्देसूद भाषण करून ठराव पुढे मांडला. सावरकरांच्या देशभक्तीबद्दल त्यांस धन्यवाद देऊन त्यांच्या तुरुंगातील कष्टाबद्दल नागपूरच्या नागरिकांस वाईट वाटत आहे व तुरुंगाचे दरवाजे खोलून त्यांची मुक्तता करण्याचे सामर्थ्य ईश्वराने आम्हास द्यावे, अशा आशयाचा ठराव मांडण्यात आला. नंतर कालीचरण, विश्वनाथराव केळकर, भैय्यालाल सतीदास (संपादक, काँग्रेसचे अर्धसाप्ताहिक ‘प्रणवीर’) व डॉटर यांची भाषणे झाली. डॉक्टर म्हणाले, "१४ वर्षांनंतर सरकारने त्यांस सोडले, तर त्यात काही मेहेरबानी नाही, तो कायदाच आहे. न्यायाचा खून पाडून त्यांना शिक्षा देण्यात आली आहे. हे अपयश पुसून काढण्याची सरकारची इच्छा असेल, तर ते त्यांस सोडील, पण सरकारची तशी इच्छा दिसत नाही. सावरकरांना एकतर्फी पुराव्यावर शिक्षा झाली आहे. सरकार खुनशीपणा दाखवीत आहे. त्यांस आताही सोडण्यात न आले, तर हिंदी राष्ट्राविषयी सरकारच्या मनात कशी अढी आहे, याचा तो आणखी एक पुरावा म्हटला पाहिजे.” अध्यक्ष म्हणाले, "पूर्वी जे लोक अराजक व क्रांतिकारक मताचे असून रक्तपात करण्याच्या मार्गात होते, तेच आज शांतिमय असहयोगी बनले आहेत. ठराव एकमताने पारित झाला (महाराष्ट्र, १७ ऑटोबर १९२३).”
 
बाबाराव सावरकरांशी डॉक्टरांचा परिचय
 
नोव्हेंबर १९२३च्या पूर्वार्धात बाबाराव सावरकर नाशिकहून नागपूरला हवापालट करण्यासाठी आले असून, विश्वनाथराव केळकर यांच्याकडे महाल भागात त्यांचा मुक्काम होता. बाबारावांची प्रकृती बरीच सुधारली असली, तरी अजून त्यांना कोठ्यातील व डोयातील विकार त्रास देत होते. उपचार रोज सुरूच होते, अंगात ताकद अगदी कमी होती. त्यांच्या दर्शनाला तरुण मुले जातच असत (महाराष्ट्र, १७ नोव्हेंबर १९२३). सन १९२३च्या आसपास नागपुरात स्वातंत्र्यप्रेमी तरुणांची अनेक मंडळे होती. कृष्णाजी नारायण उपाख्य अण्याजी लांबे, पांडुरंग कृष्ण सावळापूरकर व इतर तरुणांनी ‘राष्ट्रप्रेम चर्चा मंडळ’ काढले होते. हे तरुण हस्तलिखित चालवीत असत. ते डॉ. हेडगेवार पाहात असत. डॉटर कधीकधी वाईकरांच्या गल्लीत असलेल्या या मंडळात येत असत. ही चर्चा मंडळे बाबाराव सावरकरांच्या सूचनेने निघाली होती (लांबे यांची आठवण, सं.अ., रजिस्टर १, पृ. ५). ‘राष्ट्रप्रेम चर्चा मंडळा’त राजकीय विषयांवर साप्ताहिक चर्चा होत. गोविंद सीताराम उपाख्य दादा परमार्थ, गायकवाड, तात्या बाक्रे, नारायण यशवंत उपाख्य तात्या तेलंग, हातिवलेकर, विठ्ठल गोविंद उपाख्य बापू भेदी (पैकी परमार्थ, तेलंग आणि भेदी संघस्थापनेच्या बैठकीत उपस्थित होते) वगैरे पाच-सहाजण होते. ही मंडळी टिळक विद्यालयात जमत. त्याच्यामागे गुप्त संस्था उभारण्याचा विचार होता. जुनी पिस्तुले जमा केली जात, सावरकर वाङ्मयाचे वाचन होत असे. डॉ. हेडगेवारांचा संघटना करण्याचा विचार या तरुणांच्या कानांवर आला. या तरुणांपैकी १०-१५ जण जाऊन डॉटरांना भेटले (डॉ. आठले यांनी पालकरांना सांगितलेली आठवण; सं.अ.पा.नों, ४.८८). याच सुमारास बाबाराव सावरकरांनी तरुण हिंदू सभेची प्रतिष्ठापना केली. (गोखले द. न., क्रांतिवीर बाबाराव सावरकर, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९७९, पृ. २७१; ही प्रतिष्ठापना कुठे झाली, हे स्पष्ट नाही). सन १९२४च्या सुमारास बाबाराव सावरकर आजारी असताना विश्वनाथराव केळकर यांनी डॉटरांची ओळख अण्णा वैद्य यांना करून दिली. त्यावेळी डॉटर दै. ‘स्वातंत्र्य’चे काम करत असत. व्यवस्थापकच ते होते. केळकर हे संपादक होते. बाबा आजारी होते व सावरकरांच्या नावामुळे तरुण मंडळी तेथे तीन-चारवेळा भेटावयास गेली. त्यावेळी त्यांनी तरुणांचा समाज असावा, असे सूचविले. म्हणून ‘तरुण भारत समाज’ स्थापन केला. वेळोवेळी सल्लामसलत घेण्यासाठी बाबारावांनी प्रभाकर बळवंत उपाख्य भैय्या दाणी, अण्णा वैद्य व आर. डी. देशपांडे (पैकी दाणी आणि वैद्य संघस्थापनेच्या बैठकीत उपस्थित होते; दाणी १९४५-१९५६ आणि १९६२-१९६५ या काळात संघाचे सरकार्यवाह होते) यांची डॉटरांशी ओळख करून दिली. ओळखीचा निष्कर्ष हा होता की, हे झाकले माणिक असून तुम्हाला सर्व परिस्थितीतून ते सहजच तारून नेतील. त्यानंतर डॉक्टरांकडे ही तरुण मंडळी येत असत. शाळा सुटली की हे तिघेजण ‘स्वातंत्र्य’ पत्रात डॉक्टरांकडे जाऊन बसत असत. डॉक्टरांना त्यांच्या समाजात व्याख्यानास घेऊन येत असत. त्यावेळी ‘तरुण भारत समाजा’चे दहा किंवा १५ सदस्य असतील. नंतर सर्व समाजांचे एकीकरण करण्याची कल्पना निघाली, पण त्याला मोठ्या माणसाची अध्यक्ष म्हणून आवश्यकता होती, म्हणून डॉटरांना या तरुणांनी म्हटले, पण ते डॉक्टरांनी नाकारले. "जोपर्यंत एक कार्य पूर्ण होत नाही, तोपर्यंत दुसरे कार्य हाती घेणे, माझ्या वृत्तीत बसत नाही. तेव्हा ‘स्वातंत्र्य’चा एकदा सोक्षमोक्ष लागला, म्हणजे मग दुसरा विचार करू.” दि. ७ नोव्हेंबर १९२४ला बाबाराव सावरकरांनी स्थापन केलेल्या ‘तरुण भारत समाज’ने निरनिराळ्या समाजांना आमंत्रण देऊन शस्त्रपूजन समारंभ डॉ. हेडगेवारांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला. गोविंदराव चोळकर, विश्वनाथराव केळकर हेही उपस्थित होते व त्यांचीच भाषणे झाली (सं.अ.; अण्णा वैद्य यांचा हस्तलिखित लेख, पृ. १).
 
हिंदुत्वाचा अमृतकुंभ
 
बाबाराव सावरकर आणि डॉ. हेडगेवार यांच्यात असे घनिष्ट संबंध प्रस्थापित होत असताना, स्वा. सावरकरांच्या जीवनात काय घडत होते? मे १९२३ मध्ये ‘अ मराठा’ या टोपणनावाने लिहिलेले स्वा. सावरकर यांचे १२८ पृष्ठांचे इंग्रजी पुस्तक ‘इसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व’ (मूल्य रु. १.५०) विश्वनाथराव केळकर वकील (१८९०-१९५०) यांनी नागपुरात छापले. (महाराष्ट्र, २९ ऑगस्ट १९२३). विश्वनाथराव केळकर सावरकरांच्या ‘अभिनव भारत संघटने’चे सदस्य होते. शिवाय, ते नारायणराव सावरकरांच्या पत्नी शांताबाई (माहेरचे नाव हरिदिनी) यांचे मामा होते. ते डॉक्टरांचे अत्यंत घनिष्ठ मित्र होते, संघस्थापनेच्या बैठकीत उपस्थित होते आणि दि. ९ जुलै १९३३ला नागपूर संघचालक झाले. डॉटरांनी सावरकरांचे ते हस्तलिखित त्यांच्याकडेच वाचले आणि आपल्या मनातील विचारांमध्ये आणि पुस्तकामधील हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्रासंबंधीच्या प्रतिपादनात कमालीचे साधर्म्य आहे, असे त्यांना लक्षात आले. त्या पुस्तकाचा डॉटरांनी त्या काळात आणि नंतरही सर्वत्र प्रसार केला (नारायण हरी पालकर, डॉ. हेडगेवार चरित्र, प्रथमावृत्ती, ना. ह. पालकर, पुणे, १९६०; पृ. १२८, १२९).
 
दि. ६ जानेवारी १९२४ मध्ये स्वा. सावरकरांची पुण्याच्या येरवडा कारागृहातून पुढील दोन अटींवर सुटका झाली. १) ते रत्नागिरीला राहतील. २) प्रकट किंवा अप्रकटपणे ते राजकारणात भाग घेणार नाहीत. (बाळ सावरकर, हिंदुसमाज संरक्षक स्वा. वीर सावरकर रत्नागिरी पर्व, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई, १९७२; पृ. ९. बाळ सावरकरांचे पूर्ण नाव शांताराम शिवराम असून ते स्वा. सावरकरांचे स्वीय सचिव आणि चरित्रकार होते; त्यांचे तात्यारावांशी रक्ताचे नाते नव्हते). रत्नागिरीत उद्भवलेल्या प्लेगमुळे ब्रिटिश सरकारने सावरकरांना तीन महिन्यांपर्यंत नाशिकला जाण्याची अनुज्ञा दिली. त्याप्रमाणे सावरकरांनी दि. १ जुलै १९२४ला रत्नागिरी सोडले. ते दि. १४ नोव्हेंबर १९२४ पर्यंत नाशिकला होते (बाळ सावरकर, उपरोक्त, पृ. ४७, ७६). याच काळात महाराष्ट्रात नि महाराष्ट्राबाहेरही सावरकरांचे अनेक चाहते त्यांच्या सत्काराची नि त्यांना थैली अर्पण करण्याची खटपट करीत होते. न. चिं. केळकर हे या ‘सावरकर पट्टी कमिटी’चे अध्यक्ष होते (बाळ सावरकर, उपरोक्त, पृ. ६१). दि. २८ ऑगस्ट १९२४ला सायंकाळी नाशिकच्या काळाराम मंदिरात अखिल महाराष्ट्रीयांतर्फे डॉ. मुंजे यांच्या अध्यक्षतेखाली सावरकरांना थैली अर्पण करण्याचा समारंभ झाला. त्यांना पूर्वी दिलेले रु. ५०० धरून ‘सावरकर पट्टी कमिटी’तर्फे एकंदर खर्च वजा जाता, रु. ११ हजार, ६६० अर्पण करण्यात आले. शिवाय, समारंभात आयत्या वेळी रु. ३२९ जमा झाले. शिवाय, अजून नागपूर शाखेकडील हजार रुपये आणि काही इतर शाखांकडून किरकोळ रकमा यावयाच्या असल्याचे कमिटीचे चिटणीस डॉ. गोपाळ सदाशिव पळसुले यांनी जाहीर केले (केसरी, २ सप्टेंबर १९२४). नागपुरात निधी गोळा करण्याच्या कामात डॉ. हेडगेवार आघाडीवर होते, अशी आठवण प्रख्यात साहित्यिक आणि पत्रकार गजानन त्र्यंबक उपाख्य भाऊसाहेब माडखोलकर यांनी पुढीलप्रमाणे लिहिली आहे. मूळचे मुंबईचे, पण जुलै १९२१ पासून पुण्याच्या ‘केसरी’मध्ये संपादकीय विभागात काम करणारे माडखोलकर ‘महाराष्ट्र’मध्ये काम करण्यासाठी १९२४ साली नागपूरला आले, तेव्हा ‘सावरकर निधी संकलना’चे काम चालू होते. माडखोलकर लिहितात, "मी नागपूरला आल्यावर दुसर्‍याच दिवशी सकाळी दादासाहेब ओगले (‘महाराष्ट्र’चे संपादक) यांच्या घरी डॉटरांचे दर्शन होण्याचा सुयोग आला. स्वातंत्र्यवीर बॅ. सावरकर यांच्यासाठी निधी जमविण्याचे काम त्यावेळी सुरू होते. डॉटरसाहेब हे अर्थातच त्या कामात प्रमुख होते व त्यासाठीच सकाळच्या चहाच्या वेळेला आप्पाजी तिजारे यांच्यासह ते दादांच्या भेटीला आलेले होते. त्यानंतर सुमारे अर्धा तास त्यांचे दादांचे निधीविषयीच मुख्यतः बोलणे झाले (तरुण भारत नागपूर - हेडगेवार स्मृती गौरव अंक, ६ एप्रिल १९६२).
 
नागपूर येथे होणार्‍या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सावरकरांच्या चाहत्यांनी त्यांचे नाव सूचविले, तर ‘सावरकर अद्याप तरुण आहेत, ते पुढे अध्यक्ष होऊ शकतील आणि सावरकर अध्यक्ष झाले, तर सरकारी सेवक संमेलनात भाग घेऊ शकणार नाहीत,’ अशी कारणे पुढे करून काही लोकांनी त्यांच्या नावाला विरोध केला. सावरकरांच्या नावाला डॉक्टरांचा पाठिंबा होता. ‘स्वातंत्र्य’चे संपादक गोपाळराव ओगले यांनी सावरकरांच्या नावाला विरोध केला. या वादामुळे शेवटी मतदान घ्यावे लागले, त्याचा निर्णय लागला, तो असा सावरकर ३४ मते, गोविंदराव सरदेसाई ३२, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर १४, परांजपे दोन, डॉ. केतकर नि वासुदेवराव आपटे यांस प्रत्येकी एकेक मत. सावरकरांची निवड झाली, म्हणून स्वागत मंडळाचे अध्यक्ष सर गंगाधरराव चिटणवीस यांनी त्यागपत्र दिले. (बाळ सावरकर, उपरोक्त पृ. ७२. प्रत्यक्षात हे संमेलन १९२६ साली होळकर संस्थानचे दिवाण सरदार माधव विनायक किबे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाले).
 
सावरकर-हेडगेवार प्रथम भेट
 
दि. २३ नोव्हेंबर १९२४ला स्थलबद्धतेची सुरुवात करण्यासाठी स्वा. सावरकर स्वदेशी बोटीने मुंबईहून रत्नागिरीला गेले. (केसरी, २५ नोव्हेंबर १९२४). परंतु, त्यावेळी रत्नागिरीत प्लेग चालू असल्याने ते तेथे न राहता, तेथून जवळच असलेल्या शिरगाव येथे विष्णुपंत दामले यांच्या घरी राहावयास गेले. (दि. २० जून १९२५ला शिरगावचे बिर्‍हाड हलवून रत्नागिरीस गेले, दि. १७ जून १९३७ पर्यंत सावरकर रत्नागिरीत होते; बाळ सावरकर, उपरोक्त, पृ. ७८).
 
मार्च १९२५ला रा. स्व. संघाची स्थापना करण्यापूर्वी स्वा. सावरकरांची भेट घेण्यासाठी डॉ. हेडगेवार शिरगावला आले. त्यांचा मुक्काम शिरगावला विष्णुपंत दामले यांच्या घरीच दोन दिवस होता. त्या मुक्कामात त्यांची सावरकरांशी त्यांनी त्यावेळी योजलेल्या स्वयंसेवक संघटनेच्या ध्येय-धोरणाविषयी प्रदीर्घ चर्चा होत असे. याविषयी सावरकरांचा अभिप्राय घेण्यासाठीच ते मुद्दाम नागपूरहून सावरकरांच्या भेटीसाठी आले होते. स्वयंसंघटनेचे नाव काय असावे, ध्येय काय असावे, कार्यपद्धती कशी असावी, यासंबंधी प्रामुख्याने डॉटर नि सावरकर यांचे या दोन दिवसांत प्रामुख्याने बोलणे होत असे (सं.अ.; भोंसला मिलिटरी स्कूल अ‍ॅण्ड हेडगेवार इ, हेडगेवार अ‍ॅण्ड सावरकर फर्स्ट भेट पृ. १).
 
विष्णुपंत दामले यांचे त्यावेळी १६ वर्षांचे असलेले चिरंजीव मोरेश्वर यांनी या भेटीचे पुढील वर्णन केले आहे, मध्यम उंची, भरदार शरीर, डोयावर उंच टोपी, कपाळावर आडवे गंध, करड्या रंगाच्या कोटाच्या आत पाठीमागच्या बाजूस कोटाखाली आलेला शर्ट, गुडघ्याच्या थोडेसे खालीपर्यंत असणारे धोतर नि पायांत बूट असे ते खास नागपुरी व्यक्तिमत्त्व आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. आमच्या घरी तात्यांसमवेत ते दुपारी जेवावयास होते व सायंकाळी सावरकर व ते असे दोघेही रत्नागिरीस निघून गेले (मो. वि. दामले, सावरकर स्मृती, प्रकाशिका सरोज मधुसूदन देसाई, रत्नागिरी, १९८२, पृ. ९). सावरकरांना भेटण्याकरिता डॉटरांबरोबर डॉ. सावरकर व विश्वनाथराव केळकर हेही होते, अशी आठवण दादा परमार्थ लिहितात. (परमार्थ यांची आठवण, सं.अ., रजिस्टर २, पृ. ८९).
 
बाबाराव-नारायणराव सावरकरांचा नवजात संघातील सहभाग
 
संघस्थापनेच्या दिवशी बाबा नागपुरातच होते, त्यांनी ही घटना पाहिली, संघाच्या शाखेवर जो पहिला ध्वज लावला गेला, तो डॉक्टरांनी बाबांच्याकडून करून घेतला, ध्वजाप्रमाणेच संघाची प्रतिज्ञा डॉक्टरांनी बाबांकडून लिहून घेतली, थोडे-फार फेरफार करून डॉ. हेडगेवारांनी ती स्वीकृत केली, असे बाबाराव सावरकरांचे चरित्रकार द. न. गोखले यांनी लिहिलेले आहे (गोखले, उपरोक्त, पृ. २७४, २७५). साक्षेपी लेखक असलेल्या गोखले यांनी चरित्रातील अनेक तपशील मृत्युशय्येवर असलेल्या बाबांकडूनच टिपून घेतले होते. तथापि, वरील विधानांना पुष्टी देणारे कोणतेही कागदपत्र संघाच्या अभिलेखागारात प्रस्तुत लेखकाला सापडले नाही. बाबाराव आणि नारायणराव सावरकरांचा संघकार्यात सहभाग हा स्वतंत्र लेखांचा विषय आहे. विस्तारभयास्तव दोघांचे या बाबतीतील कार्य केवळ बिंदुरूपाने देत आहे.
 
बाबाराव सावरकर
 
१) मे १९२६च्या सुमारास काशीला असलेल्या क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांनी अमरावतीत जाऊन तेथील ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळा’त लाठीकाठी इत्यादी शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून यावे, असे बाबा सावरकरांनी सूचविले आणि त्यांची अमरावतीस जाण्याची व्यवस्था केली. डॉ. हेडगेवार त्या उन्हाळी वर्गाचे निरीक्षण करण्यासाठी आले होते. याच घटनेमुळे राजगुरूंचा रा. स्व. संघाशी संबंध आला. राजगुरूंचा डॉटरांशी परिचय झाला होताच. त्यामुळे हा शिक्षणक्रम झाल्यावर ते नागपूरला गेले. तेथे ते रा. स्व. संघात जात. (वि. श्री. जोशी, वडनावल, मनोरमा प्रकाशन, मुंबई, २०१०, पृ. १०७, १०९). काशीचे प्रथम संघचालक व्यंकटेश गणेश उपाख्य भाऊराव दामले, महाराष्ट्र प्रांताचे प्रथम प्रांत संघचालक काशिनाथराव लिमये, लाहोरचे संघचालक धर्मवीर, सिने-दिग्दर्शक भालजी पेंढारकर अशा असंख्य मातब्बर मंडळींना बाबारावांनीच संघात आणले.
 
२) नागपुरात असताना अनेकदा बाबाराव केंद्र संघस्थानी उपस्थित असत (सं.अ., रजिस्टर ७, पृ. १४७).
 
३) संघ शाखा स्थापन करण्यासाठी डॉटरांसोबत मध्य प्रांतात एकत्र प्रवास. उदा. काटोल तालुयाच्या नरखेड, बेलोना, मोवाड या गावी शाखा स्थापन करून डॉटर बैलगाडीने जलालखेडा येथे आले, तेव्हा त्यांच्यासोबत बाबाराव होते (वि. शा. देशमुख यांची आठवण; डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी अंक, तरुण भारत, १९८९, पृ. १६०).
 
४) लहान गावांतील शाखांना निष्कांचन बाबाराव देणगी देत उदा. जलालखेडा संघाला बाबाराव सावरकर यांनी रु. २५ देणगी दिली होती (स्वयंसेवक विनायक दामोदर मूलकर यांचे टिपण; सं.अ., रजिस्टर ३, पृ. १७).
 
५) डिसेंबर १९२८च्या शेवटच्या आठवड्यात बाबाराव सावरकरांबरोबर डॉटर कोलकात्याला गेले होते. बाबारावांना त्यांच्या प्रकृतीकरिता वैद्यकीय चाचणीची जरुरी होती व अशी सुज्ञ डॉटर मंडळी कोलकात्यात आहेत, म्हणून ते कोलकात्यास डॉटरांना बरोबर घेऊन गेले. (दादा परमार्थ यांची आठवण; सं.अ., रजिस्टर २, पृ. १०२); त्यावेळी दोघांच्या मनात संघाला भारतव्यापी स्वरूप देण्याचा विचार घोळत होता (दि. १३ सप्टेंबर १९५४ला डॉ. गणेश मार्तंड पिंपरकर यांनी पालकरांना सांगितलेली आठवण; सं.अ.पा.नों., ३.०५). कोलकाता काँग्रेस संपल्यावर बाबाराव सावरकर व डॉटर सुभाषचंद्रांकडे गेले. भेटीत परस्परांची ओळख व विचारविनिमय झाला. (परमार्थ यांच्या टिपणांवरून पालकरांची प्रत; सं.अ.पा.नों., ३.३१
 
६) दि. २४ फेब्रुवारी १९३१ला विठ्ठलभाई पटेल ‘अलेझांड्रा’ बोटीने व्हिएन्नाला रवाना झाले. तत्पूर्वी डॉटर व बाबाराव सावरकर यांनी त्यांची मुंबईत गाठ घेऊन विचारपूस केली. (पालकरांचे टिपण; सं.अ.पा.नों., ३.१४०).
 
७) काशी (मार्च १९३१); ‘पंजाब व सिंध या प्रांतांत संघ बीजारोपणाला हिंदुस्थानातील सर्व प्रांतांपेक्षा सुपीक मनोभूमी सिद्ध’ असल्याने कराची येथे होणार्‍या ‘हिंदू युवक परिषदे’ला डॉटरांनी यावे, असे आग्रह करणारे पत्र बाबाराव सावरकरांनी डॉटरांना लिहिले, त्यानुसार दोघांचा प्रवास व कराचीत संघाची मुहूर्तमेढ रोवण्यात साहाय्य; दि. ६ ऑगस्ट ते दि. १४ सप्टेंबर १९३२ या काळात डॉटरांनी महाराष्ट्राचा पहिला-वहिला प्रवास बाबारावांच्या आग्रहामुळेच केला. या काळात मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, जमखंडी व कराड येथे संघशाखांना प्रारंभ झाला.
 
८) मार्च १९३१च्या काशीच्या भेटीत ५००-६०० तरुण असलेली स्वतःची ‘तरुण हिंदू सभा’ संघात विलीन केली. श्री पाचलेगावकर महाराज यांना त्यांचे ‘मुक्तेश्वर दल’ संघात विलीन करण्यास प्रवृत्त केले.
 
९) दि. २४ सप्टेंबर १९३२, दिल्ली, अध्यक्ष न. चिं. केळकर; दि. १५ ऑटोबर १९३३, अजमेर, अध्यक्ष भाई परमानंद अशा हिंदू महासभेच्या किमान दोन अधिवेशनांत रा. स्व. संघाच्या अभिनंदनाचे ठराव संमत करून घेतले.
 
१०) डॉटरांनंतर संघाच्या भवितव्याविषयी अगदी मृत्युशैय्येवर असतानादेखील चिंता वाहिली आणि त्यासंबंधी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींशी बोलणे केले.
 
नारायणराव सावरकर
 
१) सन १९३४ मध्ये मुंबईत संघाची शाखा सुरू झाली. पहिली शाखा नारायणराव सावरकर यांच्या गिरगावातील दवाखान्याच्या आवारात, तर दुसरी मुंबई उपनगरात सुरू झाली. (सं.अ., डॉ. हेडगेवार पत्रव्यवहार).
 
२) मुंबईची संघ शाखा स्थापन होऊन एक वर्ष होऊन गेले, तरी एवढ्या काळात संघचालक, सेनापती, कार्यवाह वगैरे आवश्यक असलेल्या अधिकार्‍यांची योजना झालेली नव्हती. म्हणून मुंबई संघ शाखेसाठी डॉटरांनी पुढीलप्रमाणे अधिकार्‍यांची योजना केली. नारायणराव सावरकर (जनरल अ‍ॅडवायझर), विश्वनाथ वैजनाथ उपाख्य दादा नाईक (एक्झियुटिव्ह ऑफिसर), गोपाळराव येरकुंटवार (जनरल ऑर्गनायझर). संघचालक वगैरेंची रीतसर योजना होईपर्यंत वरील अधिकारी मंडळ कायम राहणार होते व ती योजना झाली, म्हणजे हे मंडळ आपोआप विराम पावणार होते. अशा प्रकारे दादा नाईक मुख्याधिकारी म्हणून काम चालविणार होते. नारायणराव सावरकर सुयोग्य कर्णधाराचे काम करणार होते. संघाच्या धोरणासंबंधाने विशेष प्रश्न उद्भवला, तर तेव्हा गोपाळरावांचे मत ग्राह्य मानले जाणार होते, असे दि. १० ऑटोबर १९३५ला डॉटरांचे पत्र आहे (सं.अ., डॉ.हेडगेवार पत्रसंग्रह).
 
३) सन १९३२च्या आसपास डॉटर मुंबईला गेले की नारायणरावांकडे पुढील पत्त्यावर उतरत असत. पूजा सदन, लक्ष्मीनगर, खार. (उपरोक्त).
 
४) जून १९३३च्या आसपास मुंबईतील संघ कार्यालय नारायणराव सावरकरांच्या दवाखान्यात न राहता, पुढील पत्त्यावर आले. विठ्ठल इस्टेट डी ब्लॉक, दुसरा मजला, सॅण्डहर्स्ट ब्रिज, मुंबई-४. संघकार्यासाठी नागपुरातून मुंबईत आलेले गोपाळ येरकुंटवार तेथे राहू लागले. त्याआधी त्यांचा पत्ता - द्वारा डॉ. सावरकर, पोस्ट ऑफीसजवळ दादर, मुंबई (उपरोक्त).
 
स्वा. सावरकरांची विनाअट मुक्तता आणि स्वागत
 
दि. १० मे १९३७ला रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थलबद्धतेतून मुंबई सरकारने स्वा. सावरकरांची बिनशर्त मुक्तता केली. (महाराष्ट्र, १६ मे १९३७). दि. १८ जून १९३७ला बंधमुक्त स्वा. सावरकरांचे कोल्हापूरमध्ये प्रचंड स्वागत झाले. त्यात ‘राजाराम स्वयंसेवक संघा’चा (कोल्हापूरमध्ये संघ याच नावाने त्यावेळी काम करत होता) सुस्वर बॅण्ड सामील झाला होता (बाळाराव सावरकर, स्वा. सावरकर हिंदुसभापर्व १, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई, १९७५, पृ. ५). त्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. दि. २० जूनला सकाळी ८.१० पर्यंत कोल्हापूर येथील साठमारीच्या मैदानात ‘राजाराम स्वयंसेवक संघ’ या संघटनेने सादर केलेले सैनिकी संचलन, खेळ, ध्वजवंदन आदी कार्यक्रम वीर सावरकरांचेसाठी आयोजित करण्यात आले. (उपरोक्त, पृ. ८, ९). दि. २५ जूनला सकाळी ६.३० वाजता ‘सदर्न मराठा मेल’ने स्वा. सावरकर यांचे पुणे स्टेशनवर आगमन. त्यानंतर शनिवारवाड्यापासून त्यांची शहरात भव्य मिरवणूक निघाली. राष्ट्रीय स्वयंसेवक दलाचे वीर यांनी मोटारीच्या भोवती साखळी करून व्यवस्था ठेवली होती (केसरी, २९ जून १९३७).
 
दि. ३ जुलै १९३७ दुपारच्या पॅसेंजरने मुंबईहून निघून सायं. ४ वाजता स्वा. सावरकर पुण्यास पोहोचले. त्यांच्यासमवेत मुंबई संघचालक दादा नाईक आणि इतर मंडळी होती. दि. ४ जुलैला पुणे येथे दुपारी स्वा. सावरकर रा. स्व. संघाला भेट देण्यासाठी गेले. तेथे शहर संघचालक विनायकराव आपटे नि जिल्हा संघचालक न. गो. अभ्यंकर यांनी त्यांचे स्वागत केले. स्वयंसेवकांना उद्देशून केलेल्या भाषणात सावरकरांनी हिंदू संघटना, सैनिकी शिक्षण नि प्रत्यक्ष कार्य यांचे महत्त्व सांगितले (बाळाराव सावरकर, हिंदुसभापर्व १, पृ. ३१, ३४). दि. ७ जुलै १९३७ला पुणे संघचालक विनायकराव आपटे यांना पाठविलेल्या पत्रात डॉटर लिहितात, बॅ. सावरकर यांच्या महाराष्ट्रातील व विशेषतः पुण्यातील स्वागत प्रसंगाच्या कार्यक्रमांत गढून गेल्याकारणाने पत्र पाठविण्यास वेळही मिळाला नसेल, हे साहजिक आहे; परंतु खरोखर आपण भाग्यवान आहात, यात शंका नाही. बॅ. सावरकरांसारख्या अतुल स्वार्थत्यागी व निस्सीम देशसेवकाचा आपल्याला सहवास घडून त्यांच्या अमूल्य वासुधेचा आपल्याला आस्वाद घेता आला. आम्हीही त्या दिवसाची प्रतीक्षा करीत आहोत व परमेश्वराने तो सुदिन या भागाला लवकर दाखवावा, अशी त्याच्याजवळ आमची प्रार्थना आहे.” (सं.अ., डॉटरांचा पत्रसंग्रह)
 
नागपूरच्या आगामी विजयादशमी उत्सवाला सावरकरांनी अध्यक्ष व्हावे, अशी डॉटरांची तीव्र इच्छा होती. दि. २४ ऑगस्ट १९३७ला डॉटरांनी पुढील पत्र लिहिले -
 
परमपूजनीय राष्ट्रभक्त श्री. तात्याराव सावरकर यांस प्रेमपूर्वक स.न.वि.वि,
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या येत्या नागपूरच्या दसरा महोत्सवाचे अध्यक्षस्थान आपण स्वीकारावे, अशी संघाच्या सर्व मंडळींची उत्कट इच्छा आहे. या संघाची आपणाला सर्व माहिती आहेच व याशिवाय आणखी जी माहिती आपल्याला पाहिजे असेल, ती पूर्णपणे देण्याविषयी मी पूजनीय राष्ट्रभक्त श्री. बाबाराव सावरकर, डॉ. सावरकर व श्री. दादाराव नाईक यांना विनंती केली आहे.
मी स्वतः मुंबईला येऊनच ही विनंती आपणाला करणे अवश्य होते; परंतु यावेळी मी उत्तर हिंदुस्थानात संघाच्या अत्यंत महत्त्वाच्या कामाकरिता फिरत असल्यामुळे मला स्वतःला येणे अशय झाले आहे. त्यातही विशेषतः संघाचे हे आमंत्रण आपल्याला देण्याचा माझ्याइतकाच वरील त्रिवर्गांना अधिकार आहे. या विशिष्ट प्रसंगी सर्व दृष्टीने विचार करून आपणच यावेळचे हे अध्यक्षस्थान स्वीकारणे अत्यंत इष्ट आहे. म्हणून माझी आपणाला आग्रहपूर्वक विनंती आहे की, आपण हे अध्यक्षस्थान स्वीकारल्याचे मला सत्वर कळवावे.
 
मी कालच श्रीक्षेत्र काशी येथे आलो असून आणखी जवळजवळ आठ दिवस येथे माझे राहणे होईल. त्यापुढचा माझा मुक्काम मला निश्चितपणे आजच सांगता येत नसल्यामुळे मी खाली दिलेल्या काशी येथील पत्त्यावरच आपल्या उत्तराची अपेक्षा करीत आहे.
कळावे,
लोभ असावा, ही विनंती.
आपला के. ब. हेडगेवार काशी
येथील डॉटरांचा पत्ता पुढीलप्रमाणे होता - द्वारा भाऊराव दामले, जमखिंडीकरांचा वाडा, दुर्गा घाट, काशी. (सं.अ., डॉटरांचा पत्रसंग्रह).
 
दि. २४ ते २७ सप्टेंबर या काळात आयोजित केलेल्या वर्‍हाड प्रांतीय हिंदू महासभेच्या अधिवेशनासाठी स्वा. सावरकर दि. २४ला सकाळी अकोल्यात येणार होते. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्याकरिता डॉटरांनी स्टेशनवर हजर असावे, अशी अकोलेकरांची अत्यंतिक तीव्र इच्छा होती व त्याप्रमाणे त्यांनी डॉटरांना ते उत्तर हिंदुस्थानच्या दौर्‍यात असताना बनारस मुक्कामीच कळवून ठेवले होते. डॉटरांची स्वतःचीही तीच इच्छा असल्यामुळे ते त्याप्रमाणे त्यांचा दौरा लवकर आटोपून नागपूरला आले. दि. २३ सप्टेंबर १९३७ला केंद्र संघस्थानावर दिलेल्या बौद्धिक वर्गात डॉटरांनी सावरकरांसाठी हा दसरा आनंदाचा असल्यामुळे तशी तयारी ठेवा व दि. ३ व ४ सावरकरांच्या चरणी अर्पण करा, असे सांगून आज आपल्याला अकोल्यास जावयाचे असल्याचे सांगितले. त्याच रात्री डॉटर नागपूर सोडून अकोल्याला गेले. तेथे गेल्यावर सावरकरांच्या आजारासंबंधाने ते येत नसल्यामुळे हिंदू परिषद रद्द केल्याचेही त्यांना समजले. सावरकरांचा मुक्काम अकोल्याला असेपर्यंत डॉटरांनी तेथेच त्यांच्याबरोबर राहावे, असे त्यांनी अगोदरच ठरवून ठेवले होते. परंतु, सावरकर जरी आले नसले, तरी डॉटरांनी ठरविल्याप्रमाणे चार दिवसांपर्यंत अकोल्याला राहिलेच पाहिजे, असा तेथील सर्व लोकांचा आग्रह पडून त्याप्रमाणे डॉटरांना तेथे राहावे लागले. (सं.अ., डॉटरांचा पत्रसंग्रह व रजिस्टर ११, पृ. ४३२).
 
शंकरराव समुद्र यांच्या दोन आठवणी
 
सप्टेंबरमध्ये व्हावयाचा सावरकरांचा मध्य प्रांत-वर्‍हाडचा दौरा त्यांच्या आजारपणामुळे पुढे ढकलला गेला. तो आता नोव्हेंबर १९३७ मध्ये झाला. दि. २५ नोव्हेंबर १९३७ला सावरकरांच्या स्वागतासाठी डॉटर नागपूरहून अकोल्याला गेले. तेथे ते त्यांच्याबरोबर चार दिवस थांबणार होते (सं.अ., डॉटरांचा पत्रसंग्रह). त्या दौर्‍यात अकोल्यातील सावरकर-हेडगेवार यांच्या भेटीचे दोन महत्त्वाचे प्रसंग अकोल्याचे ज्येष्ठ संघ कार्यकर्ते शंकरराव समुद्र यांनी सांगितलेले आहेत (रमेश पतंगे संपादक, संघ गंगोत्री, सा. विवेक, मुंबई २००३, पृ. १८). डॉटर स्वयंसेवकांबरोबर अकोला स्थानकावर पोहोचले. डॉटरांनी स्थानकावर येताच, पुष्पहार आपल्याजवळ घेतला व गर्दीतून पुढे जाऊन डब्याचा दरवाजा स्वतः उघडला व स्वातंत्र्यवीरांच्या गळ्यात पहिला पुष्पहार घालण्याचा संकल्प पुरा करून डब्यामध्ये त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घातले व आपल्यासमवेत त्यांना डब्याच्या बाहेर आणले.
 
सावरकरांची निवासव्यवस्था मोहता मिलच्या अतिथीगृहात होती. त्यांच्या समवेत त्यांच्या अंगरक्षकाबरोबर शंकरराव समुद्र यांनी राहावे, अशी इच्छा डॉटरांनी व्यक्त केल्यामुळे समुद्र यांची योजना त्या निवासस्थानी झाली. संघाचा थोडा-फार परिचय स्वातंत्र्यवीरांना त्यांच्या अकोल्यातील भेटीत करून द्यावा, ही डॉटरांची मनीषा होती. ही भेट एकांतात विश्वसनीय सहकार्यांसमवेत व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. या दृष्टीने तत्कालीन अकोला नगर संघचालक बाबासाहेब चितळे यांच्या घरी भेटण्याचे ठरले. तेथे समुद्र, तात्या तेलंग, श्रीधर अनंत उपाख्य बापूसाहेब सोहोनी व तात्या सोहोनी आणि स्वा. सावरकर व त्यांचा अंगरक्षक एवढेच काही काळ एकत्र होते. संघकार्याची निर्मिती, उभारणी, सद्यस्थिती यांचा थोडयात परिचय डॉटरांनी सावरकरांना करून दिला. त्यांनी समाधान व्यक्त केले. कुणी कुणाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा किंवा योजना नव्हती. परंतु, परस्पर बोलण्याच्या शेवटी डॉटरांनी आपले मनोगत व्यक्त करताना एवढेच म्हटले की, "तात्याराव, आपण एक द्रष्टे पुरुष आहात. हिंदूराष्ट्राची यथोचित संकल्पना व प्रेरणास्थान आपल्या जीवनातून प्रकट व प्रभावी होईल. आपण कोणत्याही संस्थेशी लिप्त अगर समाविष्ट न होता, एक द्रष्टे पुरुष म्हणून भारतभर भ्रमण करा. पारतंत्र्यात जखडलेल्या या दिशाहीन हिंदू समाजाला उदबोधन करून जागृत करा. मी चालविलेल्या या अल्पशा संघटनेच्या योजनेद्वारे देशभर निष्ठावान स्वयंसेवकांचे संघटन करून शक्तिकेंद्र उभे करतो व या हिंदूराष्ट्राला जगातील एक महान शक्ती म्हणून उभी करून स्वातंत्र्य मिळवून वैभवशाली बनविण्याचे मनोमन आश्वासन देतो.” दोन महान व्यक्तींचे मनोमिलन झाले, असा भाव व्यक्त होऊन ही बैठक संपली.
 
सावरकरांची नागपूर संघाला प्रथम भेट
 
सावरकरांच्या आजारपणामुळे ते १९३७च्या विजयादशमी उत्सवाला अध्यक्ष म्हणून येऊ शकले नाहीत. तरी सावरकरांनी नागपूर संघात लवकरात लवकर यावे, अशी डॉटरांची तीव्र इच्छा होती. दि. ३ डिसेंबर १९३७ला बाबाराव सावरकरांना पाठविलेल्या पत्रात डॉटर लिहितात, "पू. तात्यारावांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे शय तितया लवकर समजणे अवश्य आहे. वेळही अनुकूल आलेली आहे. डिसेंबरच्या सुटीत संघाची सैनिक शिबिरे सर्व ठिकाणी होतात, ही गोष्ट आपणाला माहीत आहे. पू. तात्यारावांचे वास्तव्य दि. ११ पासून १९ पर्यंत नागपूर प्रांतात होणार असून, त्या काळात त्यांचा इकडच्या बाजूला दौरा होणार आहे. हा दौरा आटोपल्यावर त्यांनी चार दिवस नागपूरला पूर्ण विश्रांती घ्यावी किंवा त्यांनी आवडतील, ती कामे करावी. त्यानंतर दि. २४ला तात्यांनी ‘वर्धा जिल्हा कॅम्प’ पाहावा. दि. २५ला नागपूर केंद्राचा कॅम्प पाहावा व २६ला ‘अकोला जिल्हा कॅम्प’ पाहून त्याच दिवशी मेलने मुंबईला जावे.” (सं.अ., रजिस्टर ६, पृ. ३८)
 
त्याप्रमाणे दि. ११ डिसेंबर १९३७ला सकाळी मुंबई-कोलकाता मेलने स्वा. सावरकर नागपुरास येऊन पोहोचले. नागपूर स्टेशनवर त्यांच्या स्वागतार्थ सुमारे पाच हजार नागरिक उपस्थित होते. नागपूर नगरपालिका, हिंदू सभा, आर्य युवक संघ, जमीनदार संघ, म्युनिसिपल मतदार संघ, साहित्य संमेलन, हरिजन समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चर्मकार मंडळ, ट्रेड युनियन काँग्रेस, मेडिकल असोसिएशन वगैरे असंख्य संस्था व वर्ग या सत्कारात सामील होत्या. डॉ. मुंजे, गोपाळराव ओगले, रुईकर, डॉ. हेडगेवार, परांजपे, चोळकर, काळीकर, बाबासाहेब घटाटे, बंडखोर काँग्रेसवाले आणि नागपूर काँग्रेस कमिटीचे माजी चिटणीस पुराणिक, भास्करराव नियोगी व फुले हे स्थानिक म्युनिसिपालिटीचे उपाध्यक्ष व इतर बरेचसे सभासद व ग. आ. गवई, हेमचंद्र खांडेकर, किसन फागू प्रभृती हरिजन बंधू-भगिनी स्टेशनवर उपस्थित असलेल्या मंडळींत होती (महाराष्ट्र, १२ डिसेंबर १९३७). नागपूरला सावरकरांचे वास्तव्य बोबडे वकिलांकडे होते. तेथे त्यांचे आणि डॉटरांचे एकांतात बोलणे झाले (दि.९ डिसेंबर १९५४ ला तात्या तेलंग यांनी पालकरांना सांगितलेली आठवण, सं.अ.पा.नों २.१७१).
 
दि. १२ डिसेंबर १९३७ला सायंकाळी ५ वाजता सावरकरांनी रेशीमबाग पटांगणात नागपूर संघाला भेट दिली. प्रथम त्यांच्यासमोर काही लष्करी कार्यक्रम होऊन नंतर स्वयंसेवकांचा ‘मार्चपास’ झाला. त्यानंतर डॉटरांचे प्रास्ताविक भाषण झाले. त्यांनी स्वा. सावरकरांसारख्या अलौकिक व अत्यंत श्रेष्ठ अशा राष्ट्रवीराचे दर्शन संघाला घडले, हा संघाच्या आयुष्यातील अत्यंत भाग्याचा दिवस आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत होणार्‍या या भूमीवरून वाहणारा वायू स्वयंसेवकांच्या श्वासोच्छ्वासाबरोबर हृदयात जाऊन त्यांची राष्ट्रभक्ती सदैव जागृत ठेवील, असे उद्गार काढून सावरकरांना पुष्पहार घातला. त्यानंतर सावरकरांचे सुमारे तासभर भाषण झाले. हे भाषण इतके प्रभावशाली व ओजस्वी होते की, त्याचे वर्णन शब्दांत करणे अशय होते. नागपुरात झालेल्या सार्‍या भाषणांहून हे भाषण अपूर्व असे झाले. याप्रसंगी दूरदूरहून आलेले सद्गृहस्थ व भगिनी यांचा फार मोठा समाज जमला होता. डॉ. मुंजे, बाबासाहेब खापर्डे, घटाटे प्रभृती बडी मंडळीही उपस्थित होती.
 
सावरकर आपल्या भाषणात म्हणाले, "सांघिक मन उत्पन्न करण्याच्या एकाच इच्छेने क्रिया करण्याची वृत्ती उत्पन्न करण्याच्या दृष्टीने सैनिक संचलनाचे शिक्षण देणार्‍या अशा संघाचे महत्त्व फार आहे. या संघाशिवाय इतरही अनेक व्यायामशाळा आणि संघ शारीरिक आणि सैनिक शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. त्या सार्‍याच उपयुक्त आहेत; परंतु त्याहून या संघात आणखी एक विशेष आहे व तेच अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. सर्वांचे ध्येय स्वातंत्र्य हे आहे, परंतु केवळ ‘स्वराज्य’ आणि ‘स्वातंत्र्य’ हे शब्द उच्चारून ध्येयदिग्दर्शन करण्याचे दिवस आता निघून गेले आहेत. आता त्या ध्येयाची फोड करून सांगण्याची वेळ आली आहे. आपले कोण, परके कोण, हे आता स्पष्टपणे ओळखून वर्तन केले पाहिजे. बाहेरच्या परयांना घालवून दिल्यानेच केवळ स्वराज्य प्रस्थापित होणार नाही. आपल्यात शिरलेले जे शिरजोर लोक आहेत, त्यांनाही त्यांचे योग्य स्थान आपण दाखवून दिले पाहिजे. नाहीतर, एक परराज्य घालवून दुसरे आपण आपल्या डोयावर ओढवून घेतले, असे होईल.” शेवटी आभार प्रदर्शन होऊन हा समारंभ आटोपला (महाराष्ट्र, १९ डिसेंबर १९३७).
 
सावरकर-हेडगेवार यांचा एकत्रित मध्य प्रांत व वर्‍हाड प्रवास
 
दि. १४ डिसेंबर १९३७ला सकाळी पॅसेंजरने विश्वनाथराव केळकर, वर्धा संघचालक आप्पाजी जोशी यांच्या समवेत सावरकर नागपूरहून पुलगाव मार्गे आर्वीला आले. भोजनोत्तर दुपारी २ वाजता सावरकर आर्वीहून वर्ध्यास येण्यासाठी मोटारने निघाले. सायं. ४च्या सुमारास सावरकरांची मोटार वर्धा येथे येऊन पोहोचली. त्यानंतर सर्वपक्षीय सभेत त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘तालुका काँग्रेस कमिटी’चे चिटणीस करंदीकर यांनी सावरकरांना हार घातला. जाहीर सभेला काकासाहेब कालेलकर, श्रीकृष्णदास जाजू प्रभृती गांधींच्या परिवारातील मंडळीही हजर होती. या सभेला नागपुराहून मुद्दाम डॉ. हेडगेवार, मावकर, तात्याजी काळीकर प्रभृती २०-२५ मंडळी गेलेली होती. दि. १६ला दुपारी वर्धा येथे रा. स्व. संघ, महिलाश्रम, सेविका संघ, हरिजन वसतिगृह आदी संस्थांना सावरकरांच्या भेटी झाल्या. रात्री १० वाजता भोजनोत्तर गाडीने सावरकर चांद्यास रवाना झाले. दि. १७ला सकाळी चांद्याचे पहिले संघचालक देवईकर यांच्या अध्यक्षतेखाली चांदा येथे सावरकरांची प्रचंड जाहीर सभा झाली. याप्रसंगी ‘राष्ट्रीय मुस्लीम पक्षा’तर्फे अब्दुल रझाक आणि चांदा म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष नूरी सेठ यांनी सावरकरांना पुष्पहार घातले. त्यानंतर भगिनी मंडळ, रा. स्व. संघ आदी संस्थांना सावरकरांच्या भेटी झाल्या. सकाळी चांदा संघचालक नारायण पांडुरंग भागवत (वर्तमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे नातू होत) आणि इतरांसह सावरकर चांद्याहून वरोड्याला गेले. तेथे प्रचंड जाहीर सभा आटोपून चांद्याला परतले आणि भोजनोत्तर ब्रह्मपुरीला जाण्यास निघाले. सोबत विश्वनाथराव केळकर आणि चांद्याची पुढारी मंडळी होती (महाराष्ट्र, २६ डिसेंबर १९३७). दि. २० डिसेंबरला सावरकर हे आपला बिलासपूर, रायपूर इकडील दौरा आटोपून नागपूरमार्गे मेलने मुंबईस गेले. नागपूर स्टेशनवर त्यांच्या दर्शनार्थ अ‍ॅड. बोबडे, पाध्ये, मंडलेकर, डॉ. हेडगेवार प्रभृती सुमारे १०० मंडळी हजर होती (महाराष्ट्र, २२ डिसेंबर १९३७).
 
दि. २२ डिसेंबर १९३७ला मुंबई संघचालक दादा नाईक यांना पाठिविलेल्या पत्रात सावरकरांच्या नागपूर व वर्‍हाडच्या दौर्‍याचे पुढील वर्णन डॉटरांनी केले आहे, "त्यांचे वर्‍हाडमधील सर्व कार्यक्रम उत्साहपूर्ण असे झालेच, पण त्यापेक्षाही नागपूर प्रांतातील त्यांचे कार्यक्रम फारच स्फूर्तिदायक व दणदणीत असे झाले. नागपूर, वर्धा, चांदा, भंडारा, अकोला, उमरेड वगैरे ठिकाणी मी त्यांच्याबरोबर सर्व कार्यक्रमांना उपस्थित होतो. प्रत्येक ठिकाणचा कार्यक्रम एकापेक्षा एक वरचढ असाच होत होता. खास नागपूरच्या कार्यक्रमाने तर सर्व कार्यक्रमांवर ताणच केली म्हणावयाची. येथील त्यांच्या व्याख्यानांना २५ ते ३० हजारांपर्यंत लोकसमुदाय लोटत असे. नागपूरच्या संघातील त्यांचे व्याख्यान तर सर्व व्याख्यानांत अप्रतिम ठरले. आपण त्या वेळचे ‘महाराष्ट्र’ व ‘सावधान’ या पत्रांचे अंक जरूर वाचावेत, म्हणजे इकडील कार्यक्रमांची थोडीशी (पण थोडीशीच) कल्पना येईल. याच पत्रात सावरकरांच्या अध्यक्षतेखाली कर्णावती (अहमदाबाद) येथे भरणार्‍या अ. भा. हिंदू महासभेच्या आगामी अधिवेशनाविषयी डॉटर लिहितात - "आपण आपल्या सर्व मित्रमंडळींसहित अहमदाबाद हिंदुसभेला जाणार असालच. श्री. गोपाळराव येरकुंटवार हेही बहुतेक तिकडे जाणार असतीलच. तेही कार्य यशस्वी करण्याची जबाबदारी आपली आहेच. तेव्हा आपण सर्वांनी तेथे अवश्य जावे, असे मला वाटते.”
 
दि. १० जानेवारी १९३८ला नारायण पुराणिक यांना पाठविलेल्या पत्रात डॉटर लिहितात, "वर्‍हाड मध्य प्रांतातील बॅ. सावरकरांच्या दौर्‍याने या बाजूला समुद्रमंथनाच्या वेळी जी परिस्थिती निर्माण झाली असेल, ती झालेली आहे. एकंदरीत लोकांत नवचैतन्य स्फुरण पावले आहे.” (सं.अ., डॉटरांचा पत्रसंग्रह).
 
सावरकरांविषयी डॉटरांची आस्थेवाईक काळजी
 
स्वा. सावरकर जातील, तेथे संघ कार्यकर्त्यांनी त्यांच्या दौर्‍याचे व्यवस्थित नियोजन करावे, अशा आस्थेवाईक सूचना डॉटर देत असत. त्याचबरोबर सावरकरांच्या सहवासाचा कार्यकर्त्यांनी लाभ घ्यावा आणि संघकार्याच्या दृष्टीनेही सावरकरांचा प्रवास लाभदायक व्हावा, याकडे डॉटरांचे लक्ष असे.
 
दि. २ फेब्रुवारी १९३८ला बाबाराव सावरकर व वसंतराव ओक यांचे पत्र डॉटरांना मिळाले. त्यात त्यांनी बॅ. सावरकर हिंदू महासभेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीला दिल्लीला जाणार असून ते दि. ४ला रात्री १२ वाजता चाळीसगाववरून पंजाब मेलने निघून दि. ५ला सकाळी इटारसीला पोहोचणार असल्याचे कळविले होते. परंतु, सोयीच्या दृष्टीने त्यांचा मुक्काम इटारसीला न करता, एक स्टेशन पुढे म्हणजे हुशंगाबाद येथे व्हावा, असे ओक यांनी सूचविले होते. त्याप्रमाणे सावरकर दि. ४ ला रात्री १२ वाजता चाळीसगाववरून ‘पंजाब मेल’ने निघून दि. ५ला सकाळी हुशंगाबादला पोहोचतील, तिथे त्यांचा मुक्काम १२ तासांचा राहील व त्याच दिवशी सायंकाळी ‘ग्रॅण्ड ट्रंक एसप्रेस’ने ते हुशंगाबाद सोडतील, तरी त्यांचे स्टेशनवर स्वागत करावे व त्यांची उतरण्याची व्यवस्था करावी; सार्वजनिक कार्यक्रम मुळीच ठेवू नये, त्यांना पूर्ण विश्रांती मिळावी, असे पत्र डॉटरांनी हुशंगाबादचे दंडवते वकील आणि एन. बी. उपाख्य भैय्यासाहेब शिरपूरकर यांना लिहिले. हा बदललेला कार्यक्रम डॉटरांनी बाबाराव व तात्याराव सावरकरांना पत्राद्वारे कळविला (उपरोक्त पत्रांची नोंद, सं.अ., रजिस्टर ६, पृ. ५०).
 
दि. ५ फेब्रुवारी १९३८ला दिल्लीला असलेल्या वसंतराव ओक, कृष्णराव वडेकर आणि राम जोशी यांना पाठविलेल्या संयुक्त पत्रात डॉटर लिहितात, "स्वातंत्र्यवीर बॅ. तात्याराव सावरकर यांच्या सहवासात आता तुमचे काही दिवस जाणार आहेत. या त्यांच्या सहवासाचा व त्यांच्या आगमनाने उत्पन्न झालेल्या परिस्थितीचा भरपूर लाभ करून घेण्यास तुम्ही समर्थ आहात, अशी तुमच्याबद्दल सर्वांच्या अंतःकरणात पूर्ण खात्री आहे. मुंबईचे संघचालक श्री. दादाराव नाईक हेही यावेळी श्री. तात्यारावांबरोबर दौर्‍यात असल्यामुळे एकंदर कार्यक्रमात संघाच्या दृष्टीने बरीच मजा येईल, यात शंका नाही.”
 
दि. १० फेब्रुवारी १९३८ला नगरला संघकाम करणार्‍या यशवंत जयवंत उपाख्य बाबूराव मोरे यांना पाठविलेल्या पत्रात डॉटर लिहितात, "स्वातंत्र्यवीर बॅ. तात्याराव सावरकर यांना माझा कृतानेक साष्टांग नमस्कार सांगावा व त्यांच्या तेथील आगमनाचा संघकार्यास पूर्ण उपयोग करून घ्यावा. त्यांचे संघावर आत्यंतिक प्रेम आहे, हे सांगणे नकोच.”
 
दि. १२ मार्च १९३८ला त्यावेळी लाहोरला असलेल्या दादा परमार्थ यांना पाठविलेल्या पत्रात डॉटर लिहितात, "नागपूरला येण्यापूर्वी दिल्लीला आवश्यक तितके दिवस मुक्काम करून तेथे बॅ. सावरकर यांच्या ओजस्वी व्याख्यानाने उत्पन्न झालेल्या वातावरणाचा लाभ घेणे.” (सं.अ., डॉटरांचा पत्रसंग्रह).
 
जवळजवळ अज्ञात असलेली सावरकर-हेडगेवार भेट
 
दि. ८ एप्रिल १९३८ला डॉ. विठ्ठलराव पत्की, मुकुंदराव मुंजे व बॅ. विठ्ठलराव करंदीकर यांच्यासह नागपूरहून मुंबईला पोहोचले. दि. १० एप्रिल १९३८ला सकाळी स्वा. सावरकर आणि दादा परमार्थ आग्र्याहून मुंबईला आले (सं.अ., डॉटरांचा पत्रसंग्रह). दादरच्या लेडी जमशेदजी रस्त्यावरील भास्कर भूवनमध्ये सावरकर बंधू राहात असताना डॉटर भेटावयास गेले, अशी आठवण त्या काळात मुंबईत संघकार्य करणार्‍या गोपाळराव येरकुंटवार यांनी दि. २२ जून १९५५ला नाना पालकरांना सांगितली होती (सं.अ.पा.नों. ४.१३९). परंतु, ही घटना नेमकी कधी घडली, हे गोपाळरावांनी सांगितले नव्हते. एरव्ही प्रत्येक घटनेची दिनांकवार नोंद करणार्‍या बाळाराव सावरकरांनीही सावरकर-चरित्रात या घटनेचा उल्लेख केला नाही. बाळाराव सावरकर लिखित चरित्रात किमान जुलै १९३७ पासून जून १९३८ पर्यंत सावरकर बंधू या वास्तूत भाड्याने राहात होते, असा उल्लेख आहे (बाळाराव सावरकर, हिंदुसभापर्व १, पृ. ३८). दादा परमार्थ यांच्यासोबत सावरकर आग्र्याहून मुंबईला आलेले असताना मुंबईत असलेले डॉटर त्यांच्या भेटीला जाणार नाहीत, ही जवळजवळ अशय गोष्ट आहे. डॉटरांच्या मुंबई प्रवासाचे दिनांक लक्षात घेता, ही भेट दि. १० एप्रिल १९३८च्या सुमारास घडलेली असणार, हीच शयता उरते.
 
सावरकरांचा डॉक्टरांना प्रेमळ आग्रह
 
दि. ३० एप्रिल आणि १ मे १९३८ला पुण्यात होणार्‍या ‘हिंदू युवक परिषदे’चे अध्यक्षपद डॉटरांनी स्वीकारावे, अशी अनेक मंडळींची इच्छा होती; त्यांत स्वा. सावरकरही होते. स्वतः डॉटर अध्यक्षपद स्वीकारण्यास उत्सुक नव्हते. दि. ३० मार्च १९३८ला सावरकरांनी डॉटरांना पुढील तार पाठविली, ‘’आय ऑन टूर प्रेस यू अ‍ॅसेप्ट प्रेसिडेंटशिप हिंदू युवक ओब्लाइज.” (मी दौर्‍यावर. तुम्ही ‘हिंदू युवक’चे अध्यक्षपद स्वीकारावे आग्रह कृपा करावी (सं.अ., रजिस्टर १, पृ. २९). स्वतः डॉटरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढील उल्लेख केला, "आपण मला आपल्या परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची जेव्हा विनंती केली, त्यावेळी मी एवढ्या मोठ्या मानाचे व जबाबदारीचे स्थान स्वीकारावे की नाही, याबद्दल विचार करू लागलो. परंतु, येथील काही फार मोठ्या गृहस्थांची जेव्हा मला अध्यक्षस्थान स्वीकारण्याची आज्ञा करणारी पत्रे आली; तेव्हा योग्य अयोग्यतेचा विचार बाजूस सारून मी हे जबाबदारीचे स्थान स्वीकारण्याचे निश्चित केले” (केसरी, ३ मे १९३८). ‘हिंदू युवक परिषदे’वेळी स्वा. सावरकरांनी संघाचा ‘भावी हिंदू राष्ट्राची आशा, भावी पिढी निर्माण होण्याचे एकमेव स्थान’ असा भाषणामध्ये उल्लेख केला (दि. १० नोव्हेंबर १९३९ला अ. स. भिडे यांनी मुंबईहून डॉटरांना लिहिलेल्या पत्रावरून पालकर यांचे टिपण; सं.अ., रजिस्टर १, पृ. ३७). परिषद झाल्यावर दि. २ मे १९३८ला सावरकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परेड ग्राऊंडला भेट दिली आणि तेथे ‘गार्ड ऑफ ऑनर’ स्वीकारला व ध्वजवंदनास हजेरी लावली (द मराठा, ६ मे १९३८).
 
सावरकरांची नागपूर संघाच्या लष्करी छावणीला भेट
 
डिसेंबर १९३८ला स्वा. सावरकरांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे ‘अखिल भारत हिंदू महासभे’चे अधिवेशन होणार होते. त्याच सुमारास होणार्‍या संघाच्या लष्करी छावणीला (आजच्या परिभाषेत शिबिराला) सावरकरांनी भेट द्यावी, ही डॉटरांची उत्कट इच्छा होती. सावरकरांनी डॉटरांना लिहिलेल्या पत्रावरून अधिवेशनाची तारीख एक दिवस पुढे ढकलण्यात आली असून, अधिवेशन दि. २८, २९ व ३० डिसेंबर या दिवशी करण्याचे निश्चित झाले. अधिवेशनाच्या तारखेत बदल झाल्यामुळे तदनुरोधाने ‘नागपूर कॅम्प’चा विचार करण्याकरिता दि. २० नोव्हेंबरच्या रात्री प्रांत संघचालक बाबासाहेब पाध्ये यांच्या बंगल्यावर संघाच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे, दि. ३० डिसेंबर रोजी प्रातःकाळी संघाच्या कॅम्पचा उद्घाटन समारंभ करण्याचे व दि. ३०, ३१ व १ या दिवशी कॅम्प चालू राहील, असे ठरले. सावरकरांच्या वरील पत्राला दि. १ डिसेंबर १९३८ला डॉटरांनी पुढील उत्तर लिहिले, "वंदनीय देशभक्त श्री. तात्याराव, आपले दि. २८-११-३८चे पत्र आजच मिळाले व ते वाचून सर्वांना आनंद झाला. संघाच्या येत्या छावणीचा उद्घाटन समारंभ आपल्याच हस्ते करण्याचे सर्वांच्या मते नक्की ठरले. हा समारंभ दि. ३० (डिसेंबर)ला सकाळी ८ वाजता होईल. पू. बाबाराव यांनी आपले आजचे पत्र पाहिले व हे पत्र त्यांच्या अनुमतीनेच आपणाला लिहिले आहे” (सं.अ., डॉटरांचा पत्रसंग्रह).
 
दि. ३० डिसेंबर १९३८ला सकाळी सावरकरांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या नागपूर जिल्हा लष्करी छावणीचे उद्घाटन झाले. सावरकरांच्या आगमनापूर्वीच ३०-४० हजारांच्या प्रचंड जनसमुदायाचे स्वागत करण्याचे सौभाग्य, शहरापासून सहा मैल दूर असलेल्या या छावणीला मिळाले होते. समारंभाच्या अध्यक्षांची स्वारी तळावर येऊन पोहोचताच, स्वयंसेवकांनी सैनिक वंदना करून त्यांचे स्वागत केले. स्वयंसेवकांची पाहणी केल्यावर, अध्यक्षांनी भगव्या ध्वजाला पुष्पमाला समर्पण करून तो उंच उभारला. यावेळी बॅण्डच्या सुस्वर आलापांनी वातावरण अधिकच शांत गंभीर झाले. ‘ध्वज तो चढवूया पुन्हा! - ध्वज हा लढवूया पुन्हा!’ या वीरगीताचा उद्गाता स्वहस्तेच तो ध्वज उभारीत आहे, हा गंभीर व रोमांचकारी देखावा पाहून हिंदुमात्राचे अंतःकरण उचंबळून आल्यास नवल नाही. ध्वजारोहणानंतर कोर्ट मार्शलचा व गार्ड माऊंटिंगचा मनोवेधक कार्यक्रम करून दाखविण्यात आला व मग पुढील लष्करी कार्यक्रम करण्याकरिता ही प्रचंड सेना जवळच्या पटांगणाकडे जाऊ लागली. त्यासरशी तेथे जमलेला प्रचंड लोकसमुद्रही तिकडे वळला. एकाच ठेयावर एका शिस्तीत चालणारे, एकाच विचाराने, एकाच हृदयाच्या स्पंदनाने वागणारे हे सहस्रावधी स्वयंसेवक, भारतवर्षात ठिकठिकाणी पसरलेल्या यांच्या शाखा व शुलेंदुप्रमाणे वर्धमान होणारी यांची ही संघटना बघून ‘हिंदू जाती! तुझा भविष्यकाल उज्ज्वल आहे’; ‘या प्रचंड संघटनेचे जनक डॉटर हेडगेवार धन्य आहेत’ असले उद्गार प्रेक्षकांमधून जागोजागी निघत होते. ‘मार्च पास इन कंपनीज’, ‘सेंट्री ड्रील’, ‘एफीशन्सी ड्रील’ इत्यादी विविध सैनिक कार्यक्रम चालू असताना, प्रत्येकाचे सविस्तर वर्णन ध्वनिवर्धकातून सांगितले जात होते. वरील कार्यक्रमानंतर सरसंघचालक डॉटर यांनी उपस्थित अलोट जनसमुदायाचे व दूरदूरहून आलेल्या नामांकित पाहुणेमंडळींचे गोड शब्दांत स्वागत करून बॅ. सावरकर व क्षात्र जगद्गुरू यांना पुष्पहार घालून गौरविले व सन्मान्य अध्यक्षांना आपले भाषण करण्याची विनंती केली. छावणीच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान दिल्याबद्दल संघाचे आभार मानून, सावरकरांनी हिंदीमध्ये समयोचित भाषण केले (सं.अ., आरएसएस नागपूर लष्करी छावणी १९३८ प्रतिवृत्; केसरी, ६ जानेवारी १९३९; महाराष्ट्र, ११ जानेवारी १९३९).
 
सावरकरांचे भाषण
 
लष्करी छावणीच्या उद्घाटनाच्या भाषणात सावरकर म्हणाले, "आजचा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा व संस्मरणीय आहे. कारण, उभा हिंदू समाज याप्रसंगी येथे एकत्र झालेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही या राष्ट्रातील महान संस्था असून, आजचे तिचे भव्य व स्फूर्तिदायक स्वरूप हिंदुत्व जिवंत असल्याचे द्योतक आहे, यात शंका नाही. आजच्या मंगल प्रसंगी संघातील स्वयंसेवकांना व संघाच्या चाहत्यांना मी दोन गोष्टी सांगू इच्छितो, संघांतील स्वयंसेवकांच्या ठिकाणी जो आज्ञाधारकपणा व शिस्त दिसून येते, ती संघातील सतत शिक्षणाचा स्वाभाविक परिणाम होय. समाजात शिस्त निर्माण होण्यासाठी आज्ञाधारकपणाची सवय, स्वयंस्फूर्तीने जुळवून घेणे अवश्य असते आणि संघात रोजच्या कार्यक्रमांतून ही शिस्त पालनाची वृत्ती उत्पन्न होते, हे खरोखर अभिनंदनीय आहे.
 
आपला समाज तेजस्वी व कणखर वृत्तीचा होण्यासाठी लष्करी शिक्षणाची फार आवश्यकता असते, हे ओळखून संघाने लष्करी शिक्षण देण्याचा अनुकरणीय उपक्रम चालविला आहे. मी युरोपात असताना मला असे दिसून आले की, तेथील सैनिकही हेच शिक्षण घेतात आणि एकदा या शिक्षणाची गोडी त्यांना लागली की, त्याचाच विकास होत होत श्रेष्ठ दर्जाचे सैनिकत्व त्यांच्या अंगी उत्पन्न होते. समोर असलेल्या हजारो गणवेषयुक्त शिस्तबाज स्वयंसेवकांकडे पाहून असे निश्चितपणे समजायला हरकत नाही की, या तरुणांच्या अंतःकरणांत राष्ट्रकार्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे आणि इच्छाशक्तीतूनच लोकोत्तर कार्याची निर्मिती होत असते. मी अशी अपेक्षा करतो की, आपल्या अंतःकरणांत उत्पन्न झालेल्या इच्छेबरोबरच राष्ट्रकार्याला आवश्यक असणार्‍या इतर सद्गुणांच्या जोपासनेचाही प्रयत्न निष्ठेने होत असेल. मातृभूमीच्या मोचनाची आपण गंभीर प्रतिज्ञा केल्याचे विस्मरण केव्हाही होता कामा नये. ‘राष्ट्रमोचन’ हे एक दिव्य आहे व त्या दिव्यातून पार पडण्यास प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आपण हिंदुत्वाचे निशाण फडकाविले असल्यामुळे ते सदैव उंच फडकत राहील, याची सर्व जबाबदारी आता आपल्यावरच आहे. आपण निश्चय करूया की, अखिल हिंदुराष्ट्राला या राष्ट्रध्वजाखाली एकत्रित होऊन आपण कार्य करावयास लावू. आज येथे उपस्थित असलेल्या अन्य प्रांतीय हिंदू बांधवांना मी विनंती करू इच्छितो की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आपण पाहिलेलेच आहे. या संघटनेचा विस्तार उत्तरोत्तर वाढत असून लवकरच सर्व देशभर त्याचे जाळे पसरेल, यात शंका नाही. आपणही आपआपल्या प्रांतात या संघाचे लोण पोहोचविले पाहिजे. कारण, संघटनेशिवाय राष्ट्रात नवचैतन्य व आत्मविश्वास उत्पन्न होणेच शय नाही. हिंदू समाजाच्या सांप्रतच्या परिस्थितीत हीच राष्ट्रव्यापी संघटना आपल्या प्रिय राष्ट्राचा उद्धार करील, असा मला पूर्ण विश्वास वाटतो.”
 
सावरकरांचे अशा आशयाचे भाषण झाल्यावर प्रांत संघचालक अ‍ॅड. बाबासाहेब पाध्ये यांनी अध्यक्षांचे व उपस्थित स्त्री-पुरुषांचे समयोचित शब्दांत आभार मानले व हा चिरस्मरणीय समारंभ संपला. हिंदू महासभेचे अधिवेशन नागपूरलाच असल्यामुळे त्याकरिता हिंदुस्थानातील सर्व भागांतून आलेले अखिल भारतीय प्रसिद्धीचे प्रमुख हिंदू पुढारी याप्रसंगी उपस्थित होते. त्यांत लाहोरचे भाई परमानंद व डॉ. सर गोकुलचंद नारंग, धुळ्याचे श्रीमंत प्रतापशेठ, कोलकात्याचे बाबू पद्मराज जैन व आशुतोष लाहिरी, अजमेरचे चांदकरण शारदा, पुण्याचे ल. ब. भोपटकर, बडोद्याचे आनंदप्रिय, यवतमाळचे लोकनायक बापूजी अणे इत्यादी अनेक थोर थोर पुढारी दिसत होते. छावणीचे मनोहर दृश्य व अनेकविध लष्करी कार्यक्रम पाहून सर्वांनी मुक्तकंठाने संघाची प्रशंसा केली. यावेळी हिंदू महासभेच्या निमित्ताने नागपुरास आलेले दूरदूरच्या संघ शाखांचे अनेक प्रमुख अधिकारी केंद्रस्थानाच्या या छावणीत भाग घेण्याकरिता मुद्दाम राहिले होते. त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा अवर्णनीय प्रेमळपणा व उमेद पसरली होती आणि त्यामुळे कॅम्पमधील सर्व कार्यक्रमांमध्ये विशेषच गोडी उत्पन्न झाली होती (उपरोक्त).
 
सावरकरांच्या ठिकठिकाणी संघाला भेटी आणि गौरवोद्गार
 
सावरकर आपल्या अखिल भारतीय प्रवासात कुठेही गेले असता, तेथील संघ किंवा ‘राष्ट्र सेविका समिति’ला (तसेच पूर्वास्पृश्य वस्तीला) भेट देणार, असा क्रम ठरलेला असे. दि. ३ एप्रिल १९३८ला सकाळी स्वा. सावरकर यांचे कानपूर येथे संघाच्या स्वयंसेवकांपुढे ‘१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध’ या विषयावर अविस्मरणीय भाषण झाले. (बाळाराव सावरकर, हिंदुसभापर्व १, पृ. ८८). दि. ३ ऑटोबर १९३८ला सकाळी लाला हरिचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली संघाचा विजयादशमी उत्सव होता. समारंभाला उपस्थित असलेल्या सावरकरांनी शस्त्रपूजन केले. लुटारू वृत्तीच्या राष्ट्रांच्या बजबजलेल्या आजच्या जगात हिंदुस्थानने शस्त्रबळ बाळगल्याशिवाय त्याला तरणोपाय नसल्याचे उद्गार त्यांनी काढले (महाराष्ट्र, १६ ऑटोबर १९३८).
 
दि १६ एप्रिल १९३९ला एलिचपूर शाखा, परतवाडा संघस्थानावावर सायंकाळी ६ वाजता स्थानिक संघचालकांसोबत स्वा. सावरकरांचे आगमन होताच लष्करी अभिवादन. मग ध्वजपूजन, प्रार्थना आणि संघचालकांचे प्रास्ताविक झाल्यावर सावरकरांचे भाषण. पंजाबपासून बंगालपर्यंत फिरत असता, बहुतेक सर्व मुख्य ठिकाणी संघाच्या शाखा आहेत. सर्व महाराष्ट्रभर संघाचे जाळे विणले गेले आहे. आजपर्यंत संघाचे ४० हजारांपर्यंत घटक झालेले आहेत. त्या प्रत्येकांना प्रत्येक ठिकाणी ‘हिंदूंचा हिंदुस्थान’ ही शिकवण मिळत आहे. हे सर्व संघाच्या सरसंघचालकांच्या १४ वर्षांच्या तपश्चर्येचे फळ आहे; त्यांच्या पुण्याईचे दृश्य स्वरूप आहे. अढळ व अचल निष्ठा ठेवणारे लोक संघाचे आहेत व निर्माण होतात, हीच आनंदाची गोष्ट आहे. याच तत्त्वावर कदाचित अनेक संस्था असतील अगर नवीन निर्माण होतील. त्या सर्व आपल्या परीने उपयुक्तच ठरतील. परंतु, राष्ट्राच्या दृष्टीने शास्त्रशुद्ध, सुसंघटित व प्रत्यक्ष कार्य करणारी अशी रा. स्व. संघ हीच संस्था असल्याचे उद्गार सावरकरांनी काढले (सं.अ., भाषण, गुरुपूजन एलिचपूर -१९३९).
 
दि. ३ मे १९३९ला सायंकाळी ६ वाजता स्वा. सावरकरांनी पुण्याच्या संघाच्या अधिकारी शिक्षण वर्गास भेट देऊन तेथील तरुण स्वयंसेवकांशी चर्चा केली (बाळाराव सावरकर, हिंदुसभा पर्व १, पृ. २१९). दुसर्‍या दिवशी पुण्याच्या वर्गात नि इतर स्वयंसेवक यांच्यापुढे गुरू गोविंदसिंगांचे चरित्र स्वा. सावरकरांनी अत्यंत स्फूर्तिदायक भाषेत सांगितले. तसेच, या भाषणात त्यांनी हिंदू पक्षाचा कार्यक्रम काय असला पाहिजे, याचेही विवेचन केले. संघाच्या स्वयंसेवकांसमवेत चर्चा करून तेथेच त्यांच्यासमवेत भोजन केले. ते साधारण दुपारी ३.३० पर्यंत तेथे होते (उपरोक्त, पृ. २२०). प्रांतिक बैठक अशा वर्गातच होत असे. त्यावेळी योगायोग असा की, स्वा. तात्याराव सावरकर बैठकीत उपस्थित होते. त्यांनी त्या बैठकीत भाषण केले. त्यात सांगितले की, हे संघाचे कार्य मूलग्राही आहे. हिंदुत्वाच्या कार्याची ही मुळे खोलवर जाऊन रुजली पाहिजेत. त्या आधारावरच हिंदुत्वाचा प्रचंड वटवृक्ष उभा राहील. मनातील सर्व किंतु दूर करून बाकीच्या राजकारणाच्या गोंधळात न सापडता, ज्यांनी हे कार्य स्वीकारले आहे, त्यांनी मनापासून हे कार्य पुढे नेले पाहिजे. (अनंतराव देवकुळे यांनी पालकरांना सांगितलेली आठवण; सं.अ.पा.नों. ४.१३९; सावरकरांनी केलेले भाषण, त्याचा त्यावेळी उपस्थित असलेल्या मंडळींवर झालेला परिणाम अविस्मरणीय असल्याचे देवकुळे सांगतात).
दि. ७ जून १९३९ला उमरखेड येथे स्वा. सावरकरांच्या स्वागतार्थ काढलेल्या प्रचंड मिरवणुकीत संघाची हातांत भाले घेतलेली पथके सामील झाली होती. (महाराष्ट्र, १४ जून १९३९).
 
दि. ३० जुलै १९३९ला नूतन मराठी विद्यालयाच्या प्रांगणात डॉ. ल. वा. परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे संघाचा गुरुपौर्णिमा उत्सव. सुरुवातीला बॅ. बाळासाहेब खासगीवाले, नानासाहेब भोंडे, शंकरराव दाते, वैद्य पानसे यांनी संघाची प्रतिज्ञा घेतली. "आपल्या प्रास्ताविक भाषणात शहर संघचालक विनायकराव आपटे यांनी हिंदू महासभेचे काम या संघास मान्य आहे. परंतु, या संघातील प्रत्येक सैनिकाने गणवेश धारण करून महासभेच्या प्रत्येक कामात भाग घेतलाच पाहिजे, असे आपण केव्हाही म्हणू शकणार नाही. ‘स्काऊट असोसिएशन’सारखे इतर संघ जसे स्वतंत्रपणे काम करतात, त्याचप्रमाणे हा संघ राष्ट्रीयत्वाची पूर्ण जाणीव ठेवून काम करीत आहे,” असे उद्गार काढले. आपल्या भाषणात सावरकरांनी "हिंदुत्वाच्या अथांग सागरावर संकल्पविकल्प, पक्षोपपक्ष, जयपराजय यांच्या कितीही लाटा आदळून गेल्या, तरी हा सागर आहे तसाच कायम आहे. ही गोष्ट या संघाचे आद्य प्रणेते डॉटर यांच्या लक्षात येऊन त्यांनी या संघाची प्राणप्रतिष्ठा केली, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मनुच्या ओंजळीत मावणारा मासा ज्याप्रमाणे वाढत वाढत मोठा होऊन मनुची नाव प्रलयकाळी वाचवू शकला, त्याचप्रमाणे डॉटर यांनी अल्पप्रमाणात सुरू केलेली ही संघटना आज प्रचंड स्वरूप धारण करून राष्ट्राचा उद्धार करू शकेल, अशी मला खात्री वाटते. हिंदुस्थान हा हिंदूंचाच होय, याच राष्ट्रीय भावनेवर विसंबून हा राष्ट्रीय संघ काम करीत आहे. तेव्हा त्याच्या कार्यास उत्तरोत्तर यश येवो व भारताची आकांक्षा सुफलित होवो, हीच कोणाची झाली तरी इच्छा राहणार,” असे उद्गार काढले. संघाच्या या उत्सवासाठी सुमारे १५ हजार स्त्री-पुरुष शाळेच्या प्रांगणात जमलेले असून, सुमारे चार-पाच हजार लोकांना जागेअभावी परत जावे लागले. रु. २५०-३०० व्यक्तिगत गुरुदक्षिणा मिळू शकली नाही. कारण ध्वजाजवळ माणूस येऊच शकला नाही. एकूण गुरुदक्षिणा रु. तीन हजार (केसरी, १ ऑगस्ट १९३९).
 
दि. ५ नोव्हेंबर १९३९ला दोन दिवस चालणारे ‘हिंदू युवक परिषदे’चे अधिवेशन पंढरपूर स्टेशनजवळ कर्‍हाड धर्मशाळेच्या आवारात अ. भा. हिंदू महासभेचे उपाध्यक्ष कुंवर चांदकरण सारडा यांच्या अध्यक्षतेखाली सुरू. आपल्या उद्घाटनपर भाषणात सावरकरांनी ‘भावी हिंदू राष्ट्राची आशा, भावी पिढी निर्माण होण्याचे एकमेव स्थान’ असे संघाविषयी गौरवोद्गार काढले (केसरी, ७ नोव्हेंबर १९३९). दि. २६ मार्च १९४०ला सकाळी स्वा. सावरकरांनी मद्रास येथे संघाच्या शाखेवर भाषण केले. संघचालक वरदराजुलू नायडू यांनी त्याचा सारांश तामिळ भाषेत सांगितला. दादाराव परमार्थ यांनी स्वयंसेवकांना सावरकरांचे चरित्र आणि महती सांगितली. योगायोगाने हा दिवस शिवजयंतीचा होता (बाळाराव सावरकर, हिंदुसभा पर्व १, पृ. ३१९).
 
संघाचा पुरातन भगवा ध्वज आणि सावरकरकृत अभिनव हिंदू ध्वज
 
स्वा. सावरकरांनी १९२८ साली ‘अखिल हिंदू ध्वज’ म्हणून कृपाण, कुंडलिनी अंकित भगवा ध्वज तयार केला होता. दि. २१ ऑटोबर १९३६च्या सुमारास लाहोर येथे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अ. भा. हिंदू महासभेच्या १८व्या अधिवेशनात पुढील ठराव पारित झाला, हिंदू राष्ट्रवाद व अध्यात्म यांची मध्यवर्ती कल्पना व्यक्त करणारा हिंदू राष्ट्रध्वज हा ‘अखिल हिंदू राष्ट्रध्वज’ म्हणून स्वीकारण्यात यावा, असा ठराव महासभा करीत आहे (इंद्रप्रकाश, अ रिव्ह्यू ऑफ द हिस्ट्री अ‍ॅण्ड वर्क ऑफ द हिंदू महासभा अ‍ॅण्ड द हिंदू संघटन मूव्हमेंट, नवी दिल्ली, १९३८, पृ. ३३८).
 
‘अभिनव हिंदू ध्वज’ हिंदू महासभेच्या वर्किंग कमिटीत पारित होण्याचा संभव दिसतो, तर त्यासंबंधी काय करावे, अशी विचारणा करणार्‍या धुळ्याच्या त्र्यंबक व्यंकटेश उपाख्य भाऊराव कुलकर्णी यांना दि. ८ फेब्रुवारी १९३८ला पाठविलेल्या पत्रात डॉटर लिहितात, "याबाबतीत संघातर्फे कोणतीही चळवळ करणे, इष्ट होणार नाही. वर्तमानपत्रांत तर यासंबंधी मुळीच चर्चा करू नये. वर्किंग कमिटीच्या सभासदांना शंकरराव देवांसारख्या तिर्‍हाईत गृहस्थांकडून खासगी रितीने लिहविणे व महत्त्वाच्या लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा करणे, बरे होईल. मात्र, भगव्या ध्वजाचा इतिहास हा केवळ ३०० वर्षांचा नसून त्यापेक्षा फार जुना आहे व निदान आद्य शंकराचार्यांनी तरी आपला दिग्विजय याच ध्वजाखाली केला होता, याबद्दल कोणास शंका राहण्याचे कारण नाही. त्यापेक्षा या ध्वजाचा इतिहास किती मागे नेऊन पोहोचविता येईल, याचा शोध इतिहास संशोधकांनी जरूर घ्यावा. हिंदूराष्ट्र हे पुरातन राष्ट्र असून या हिंदूराष्ट्राचा भगवा ध्वज हाही पुरातनच ध्वज आहे. हिंदूराष्ट्राची उत्पत्ती अभिनव नसल्याने अभिनव ध्वजाचीही या हिंदूराष्ट्राला आवश्यकता नाही व निदान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तरी त्या पुरातन, जयिष्णू भगव्या ध्वजाला सोडून हा अभिनव ध्वज आपणासमोर ठेवणार नाही (सं.अ., डॉटरांचा पत्रसंग्रह).”
 
रा. स्व. संघ आणि रामसेना
 
दि. १० सप्टेंबर १९३९ला रात्री ८ ते ९ वाजता मुंबईतील सरदारगृह येथे अ. भा. हिंदू महासभेच्या कार्यसमितीची बैठक झाली. ‘हिंदुस्थानातील हिंदूंनी आपापल्या प्रांतांत राष्ट्रीय सैन्यदल (हिंदू मिलिशिया) उभारावे व १८-४० या वयाच्या सर्व हिंदूंनी त्यात दाखल व्हावे,’ असा ठराव क्र. ३ संमत करण्यात आला (केसरी, १२ सप्टेंबर १९३९). याच हिंदू मिलिशियाला ‘रामसेना’ असे नाव देण्यात आले.
 
दि. २९ ऑटोबर १९३९ला सायंकाळी डॉ. हेडगेवार आणि नागपूर संघचालक बाबासाहेब घटाटे डॉ. मुंजे यांच्या घरी आले. "हिंदू राष्ट्रीय सेनादलाची संघटना उभी करण्याचे काम तुम्ही हाती घ्यावे,” असे डॉ. मुंजे डॉटर यांना म्हणाले. परंतु, डॉटरांनी अनेक कारणे सांगून तसे करण्यास नकार दिला. डॉटरांच्या मनावर डॉ. मुंजे यांनी हे ठसविण्याचा परोपरीने प्रयत्न केला की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाहेर असे सेनादल उभारण्याचा स्वतंत्र प्रयत्न झाला, तर त्यांच्यात व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्पर्धा आणि मत्सर निर्माण होईल व त्यातून दोघांनाही घातक परिणाम होतील (मुंजे यांची दैनंदिनी; वीणा हरदास, धर्मवीर डॉ. मुंजे यांचे चरित्र खंड २, पृ. ३३०; सं.अ.पा.नों., २.१२).
 
स्वतः सावरकरांच्या दृष्टीने ‘रामसेना’ ही संघाची प्रतिस्पर्धी संघटना म्हणून अभिप्रेत नव्हती. दि. २ ऑगस्ट १९४१ला पुणे येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांसमोर बोलताना सावरकर म्हणाले, "रामसेना हे हिंदुसभेचे अधिकृत दल असून हिंदुसभेची दैनंदिन कामे यातील स्वयंसेवक करतील. रा. स्व. संघ ही हिंदुत्वाची भावना चेतविणारी पक्षातीत संस्था आहे. त्यामुळे त्यातील घटकांना हिंदुसभेच्या कामात अधिकृतरीत्या भाग घेता येत नाही. संघाची संघटना पूर्ण झाल्यावर त्याच्या अधिकृत कामास सुरुवात होईल. परंतु, तोपर्यंतच्या काळात हिंदू समाजावर येणार्‍या संकटांना उदा. ढाका-अहमदाबाद सारखे दंगे यांना तोंड देण्यासाठी हिंदुसभेतर्फे अधिकृत लोक संघटितपणे उभे राहिले पाहिजेत. हीच गोष्ट ‘रामसेना’ करू इच्छिते. निवडणुकीवेळी प्रतिपक्षीयांकडून हिंदुसभेच्या सभा मोडण्याचे प्रयत्न होतील. त्यावेळीही प्रतिकार करण्यासाठी हिंदुसभेजवळ एक अधिकृत दल पाहिजेच. रामसेना याच कार्यासाठी आहे. याच भेटीत सावरकरांनी रा. स्व. संघ व ‘राष्ट्र सेविका समिति’ यांनाही भेटी दिल्या होत्या, हे लक्षणीय आहे (केसरी, ८ ऑगस्ट १९४१).
 
हिंदुसभा (किंवा राम सेना) आणि संघ या दोन संघटनांमधील असलेल्या भिन्नतेबाबतचा विवेक तात्याराव सावरकरांत जसा होता, तसा तो बाबाराव सावरकरांतही होता. दि. २४ सप्टेंबर १९३२च्या सुमारास दिल्लीला झालेल्या हिंदू सभेच्या एका बैठकीत एकदा संघविषयक ठराव चर्चेला निघाला आणि त्यावर भाषण करताना बाबू जगत नारायण यांनी असे प्रतिपादन केले की, "संघ हिंदुसभेच्या हाताखाली असावा! यावेळी कर्मधर्मसंयोगाने बाबाराव सावरकर अध्यक्ष होते. त्यांनी लगेच बाबू जगत नारायण यांच्या विचारसरणीला विरोध केला आणि म्हटले की, संघ नि सभा या दोन संस्था विभिन्न कार्यपद्धतीवर अधिष्ठित आहेत. एक सैनिकी वळणाची असून दुसरी नागर आहे. हिंदुसभा नागर नि म्हणून लोकमतानुवर्ती असल्यामुळे तिचे चालक सदैव बदलत राहणार. चंचल लोकमत जिकडे जाईल, तिकडे हिंदुसभेला गेले पाहिजे. यामुळे तिचे चालक सदा अत्युत्तमच असतील, याविषयी हमी देता येणार नाही. अशा स्थितीत संघासारखी संघटना सभेच्या हाती दिली, तर संघाचे कार्य अतूट चालणार नाही आणि त्याचा खेळखंडोबा होऊन बसेल. याकरिता संघ स्वतंत्रच असावा नि तो एकचालकानुवर्तीच राहावा. तो सभेच्या अधिकाराखाली घेऊ नये.” बाबांचा हा युक्तिवाद कोणालाच पटला नाही, पण सीमा प्रांताचे प्रतिनिधी मेहरचंद खन्ना यांनी उठून ठासून सांगितले की, "बाबाजींचे बोलणे सोळा आणे बरोबर आहे!” आणि मेहेरचंद खन्नांच्या या भाषणाने सभेचे पारडे फिरून बाबांचा संघाला पाठिंबा देणारा मूळ ठराव मान्य झाला. (गोखले, उपरोक्त, पृ. २७८; गोखले या प्रसंगाचे वर्ष देत नाहीत. परंतु, जगत नारायण व मेहेरचंद खन्ना या दोघांचा १९३२ नंतर हिंदुसभेशी संबंध फारसा राहिला नाही आणि १९३२च्या अ. भा. हिंदू महासभेच्या अधिवेशनात संघविषयक ठराव पारित झाला, हे लक्षात घेता, ही घटना सप्टेंबर १९३२च्या अधिवेशनाच्या अगोदर घडली असली पाहिजे.)
 
सावरकरांची डॉटरांविषयी आस्था आणि प्रेम
 
जून १९३९ मध्ये डॉटर नाशिकला गंभीर आजारी आहेत, हे कळताच दादर, मुंबईहून सावरकरांनी दि. ७ जुलैला डॉटरांना पुढील पत्र लिहिले, श्री. हेडगेवार, सरसंघचालक, यांसी महाशय, आपण तापाने बरेच आजारी असल्याचे ऐकून धक्का बसल्यासारखे झाले आहे. बाबा (ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर) समाचारास येतच आहेत. प्रकृतीस अत्यंत जपावे. औषध पथ्यपाणी यांत किमपिही चालढकल होऊ नये. आपले स्वास्थ्य म्हणजे हिंदुराष्ट्राचा आज एक आधारस्तंभ! ईश्वर आपणांस उदंड आयुष्य बळ नि यश देवो!
 आपला वि. दा. सावरकर अध्यक्ष हिंदुमहासभा
 (सं.अ., डॉटरांचा पत्रव्यवहार, महाराष्ट्र, मुंबई. १९३९-४०, ००१२ सावरकरांनी केलेला ईश्वराचा उल्लेख हा ते नास्तिक असल्याचा अनेकजणांच्या समजुतीला छेद देणारा आहे).
 
देशातील महत्त्वाच्या घडामोडींविषयी डॉटरांचे
 
मत सावरकरांना महत्त्वाचे वाटे. दि. ५ सप्टेंबर १९३९ला डॉटरांना मुंबईहून लिहिलेल्या पत्रात स्वा. सावरकर लिहितात, "दि. १० सप्टेंबरला मुंबईच्या सरदारगृहात युद्धपरिस्थितीवर विचार करण्यासाठी हिंदू सभेच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक आहे. आपण प्रतिष्ठित पाहुणे म्हणून येऊन मार्गदर्शन करा” (पालकरांचे टिपण; सं.अ., रजिस्टर १, पृ. ३५).
 
ठिकठिकाणी संघाला मार्गदर्शन करत असताना एक फार मोठे पथ्य सावरकरांनी पाळले. त्यात त्यांचा आणि डॉटरांचा दोघांचा मोठेपणा दिसतो. डॉटर गेल्यानंतर दि. १३ जुलै १९४०ला नूतन सरसंघचालक गोळवलकर गुरुजींना लिहिलेल्या पत्रात सावरकर लिहितात, "Even in the lifetime of Dr. Hedgewar I always use to advise the Sangh meetings hundreds of which I had to attend throughout concerned it is Dr. Hedgewar alone who must have the last word on any question and that I had full confidence in his discretion on that matter.". (डॉ. हेडगेवारांच्या हयातीतसुद्धा संपूर्ण भारतभर मी संघाच्या शेकडो कार्यक्रमांत उपस्थित राहून उपदेश केला आहे. परंतु, संघासंदर्भात कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय हा केवळ डॉ. हेडगेवार यांचाच असावा, ही माझी भूमिका होती आणि त्या बाबतीत त्यांच्या विवेकावर मला पूर्ण विश्वास होता).
 
अखेरची भेट
 
दि. २३ एप्रिल १९४०ला डॉटरांनी पुण्याच्या अधिकारी शिक्षण वर्गाचे उद्घाटन केले. या वर्गात १३२ गावांतून ८०२ स्वयंसेवक उपस्थित होते. संख्येच्या व इमारतीच्या अशा दोन्ही दृष्टीने यावर्षीची भव्यता पुष्कळच वाढली होती. लोकांत उत्साह वाढलेला असून कार्यासंबंधीची तीव्रताही विशेष दिसून येत असल्याचा डॉटरांचा अभिप्राय होता (पालकरांचे टिपण; सं.अ., रजिस्टर १, पृ. ४१). याच वर्गात दि. ११ मे १९४०ला डॉटरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रांताची दोन दिवसांची प्रांतिक बैठक सुरू झाली. दि. ११ मे रोजी सावरकर दुपारी मुंबईहून पुण्यात पोहोचल्यावर थोड्याच वेळात संघाच्या अधिकारी शिक्षण वर्गाला भेट देण्यासाठी गेले. तेथे त्यांनी संघकार्य कसे चालावे, यासंबंधी छोटे भाषण केले आणि अधिकारी नि स्वयंसेवकांशी चर्चाही केली. त्यानंतर सावरकर ल. ब. भोपटकर यांच्या सत्कार समारंभात सहभागी झाले आणि रात्रीच्या गाडीने मुंबईला आले (बाळाराव सावरकर, हिंदुसभा पर्व १, पृ. ३३५). हीच स्वा. सावरकर आणि डॉ. हेडगेवार यांची अखेरची भेट ठरली!
 
सावरकरांची डॉक्टरांना वाहिलेली श्रद्धांजली
 
डॉटरांच्या निधनाची दुःखद वार्ता समजताच, दादर, मुंबईहून रात्री ९.२५ मिनिटांनी सावरकरांनी गोळवलकर गुरुजींना पुढील विद्युतसंदेश पाठविला, "हिंदुमहासभा मोर्न्स हेडगेवार्स डेथ, डीपेस्ट ग्रीफ; हेडगेवार डेड, लाँग लिव्ह हेडगेवार; हेडगेवार डेड, लाँग लिव्ह संघ - बॅ. सावरकर” (हिंदू महासभेला हेडगेवारांच्या निधनाचा शोक अतीव दुःख; हेडगेवार गेले, हेडगेवार अमर होवोत; हेडगेवार गेले, संघ दीर्घायुषी होवो - बॅ. सावरकर) (सं.अ., टेलेग्राफ्स, ००११). यानंतर लगेच सावरकरांनी सर्व हिंदू सभा शाखांना कळविले की, त्यांनी दि. ३० जूनला डॉटरांना प्रकट सभा घेऊन श्रद्धांजली वाहावी व त्या सभांचे प्रतिवृत्त संघाच्या केंद्र कार्यालयाकडे पाठवावे. या आदेशाप्रमाणे दि. ३० जूनला मुंबईत घेण्यात आलेल्या मुंबईत झालेल्या सभेविषयी ‘केसरी’च्या वृत्ताचा काही भाग पुढीलप्रमाणे, अ. भा हिंदुमहासभेच्या आदेशानुसार दि. ३० जूनला मुंबई येथे स्वा. सावरकरांच्या अध्यक्षतेखाली ‘डॉ. हेडगेवार दिन’ साजरा करण्यात आला. शोकप्रदर्शक ठराव नारायणराव सावरकर यांनीच मांडला. स्वा. सावरकर डॉटरांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहताना म्हणाले, "डॉ. हेडगेवार यांनी आपले अंतःकरण पिळवटून हिंदू समाजाला चैतन्यवर्षा प्राप्त करून दिली. हिंदू समाजाला अत्यंत धडाडीने त्यांनी हिंदुत्वाच्या स्वाभिमानाचा संदेश दिला. काँग्रेसने जातीय भावना नष्ट करण्याचा प्रयत्न केला; परंतु हिंदू आपली जातीयता विसरले, तरी इतर जाती आपापली जातीयता विसरू शकत नाहीत. स्वामी श्रद्धानंदांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासंबंधीचा दुखवट्याचा ठराव येत नाही. याचे कारण मुसलमानांना वाईट वाटेल, हेच. आज हेडगेवार यांच्याबाबतीत तीच स्थिती आहे. मुसलमान वारला असता, तर प्रत्येक काँग्रेसवाला दुखवट्याची सभा भरून मोकळा झाला असता. तुर्कस्तानमध्ये भूकंप झाला, तर त्यासंबंधी दिन पाळण्यात येतो; पण काँग्रेस डॉ. हेडगेवारांसंबंधित काहीही करू शकत नाही. कारण, मुसलमानांना खुश करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न. राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली आमचे पाय खाली ओढण्याचा प्रयत्न काँग्रेसवाले आज करीत आहेत. डॉ. हेडगेवार यांचे हे हिंदू संघटनेचे कार्य पुढे चालविणे, हे तरुणांचे कर्तव्य आहे. आज सैनिकशिक्षण घ्या, मी हिंदू आहे ही भावना ठेवा, माझे राष्ट्र हिंदू ही भावना ठेवा, तरच त्यांचे कार्य तुम्ही पुढे चालविले असे होईल. आपणास रायफलचे शिक्षण न देणारे इंग्रज आता सक्तीचे लष्करी शिक्षण देऊ लागले आहेत, ही गोष्ट लक्षात घेऊन हेडगेवार यांच्या शिकवणुकीचा फायदा घ्या” (केसरी, ५ जुलै १९४०).
 
सभेच्या अध्यक्षपदावरून बोलताना सावरकर म्हणाले, "डॉ. हेडगेवारांसारख्या संघटकाची आज फार आवश्यकता होती. ज्या कल्पनेचे त्यांनी एकांतात चिंतन केले, ती कल्पना आज उघडपणे सर्व हिंदुस्थानात पसरली आहे. ‘हिंदुस्थान हिंदूंचा’ या घोषणेची गर्जना आज सर्व भारतात होत आहे आणि आता ती कल्पना मूर्त स्वरूपात उतरविण्याचा काळ येत असता, त्यांची फार आवश्यकता होती. आता डॉ. हेडगेवारांचे ते अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करणे, हे आजच्या तरुणांचे कर्तव्य आहे. मोठ्या माणसांची कार्ये अपुरीच राहतात. युगप्रवर्तक किंवा शककर्ते त्यांच्या काळात त्या पदाला पोहोचत नाहीत. त्यांचे कार्य पुढे चालले नि यशस्वी झाले, तरच त्याचे संस्थापक युगप्रवर्तक वा शककर्ते ठरतात!” (महाराष्ट्र, ७ जुलै १९४०).
 
डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर उद्घाटन समारंभाला सावरकरांचा संदेश
 
सन १९६२ला डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी स्वा. सावरकरांना विशेषरीत्या निमंत्रिण्यात आले होते. परंतु, प्रकृती स्वास्थ्याअभावी त्यांनी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पुढील हृदयद्रावक पत्र पाठविले, "आपले दि. १६ मार्च पत्र आले, ते पावले. संघसंस्थापक परमपूजनीय डॉ. हेडगेवार यांचे स्मृती मंदिराच्या उद्घाटन समारोहाला मी यावे, याविषयीचे आपले आमंत्रण मी केव्हाही नाकारले नसते. माझेही हे कर्तव्य म्हणून मी आलो असतो. पण, आता माझ्या सध्याच्या प्रकृतिमानामुळे मला प्रवास तर काय, पण घरच्या घरी आलेल्या अगदी आप्तेष्टांच्या भेटीसुद्धा घेववत नाहीत. जगताचा आणि माझा संबंध सुटल्यासारखाच झाला आहे. पत्रांची उत्तरेसुद्धा धाडवत नाहीत आणि धाडतही नाही. आपलेच पत्र पाहिले, म्हणून हे उत्तर तरी लिहवून स्वाक्षरी तेवढी मी करीत आहे. त्यातही आपल्यासारखा कर्णधार तेथे उपस्थित असता, आता जगात विद्यमान नसल्यासारखेच होऊ इच्छिणार्‍या माझ्या अनुपस्थितीची जाणीव कोणीही बाळगू नये. समारंभातील एक उणीव म्हणून तरी, अशी माझी सर्वांना मनःपूर्वक विनंती आहे, कार्ये मात्र पुढे चालवावीत; शतपट प्रकर्षाने चालवावीत, एवढीच इच्छा आहे. आपला वि. दा. सावरकर” (तरुण भारत, नागपूर, ७ एप्रिल १९६२).
 
‘कुड्या दोन त्या, एक आत्मा परि’ असेच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. हेडगेवारांबाबत म्हणता येईल. हिंदू समाजाला संघटित आणि बलशाली करून हिंदूराष्ट्राच्या वैभवाच्या परमोच्च शिखरावर नेणे, हेच दोघांचे उद्दिष्ट होते आणि त्यासाठी दोघेही खपले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचा वारसा पुढे नेण्याचे दायित्व आपल्या सर्वांचे आहे.
 
डॉ. श्रीरंग गोडबोले 
९८९००२४४१२