डोंबिवली : (Dombivli Power Outage) डोंबिवली निवासी भागातील केबल जळल्याने सुदर्शन नगरमधील एक लेनचा वीजपुरवठा १५ तासांपासून बंद असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडल्याने नागरिकांना रात्रभर उष्णतेचा त्रास सहन करावा लागला.
डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील सुदर्शननगर मधील प्लॉट क्रमांक आर- 15 च्या आजूबाजूच्या जवळपास अंदाजे सात आठ इमारतींचा मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला.
तेथील जागरूक नागरिक डॉ अद्वेत पाध्ये यांनी व इतर नागरिकांनी महावितरणला कळविल्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता केबल जळाल्याचे निदर्शनास आले. त्याठिकाणी केबलला जॉईंट मारणे किंवा नवीन केबल टाकणे आवश्यक होते.
केबल दुरुस्ती रात्री करणे शक्य नव्हते. त्यामुळे हे काम बुधवारी सकाळीच करता येईल असे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार बुधवारी सकाळी केबल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
मात्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास लाईट गेल्याने नागरिकांच्या झोपेचेही हाल झाले. ज्यांच्याकडे इन्व्हर्टर होते त्यांचेही इन्व्हर्टर बॅटरी चारपाच तासानंतर उतरल्यावर त्यांनाही विजेविना राहावे लागले.
डोंबिवली निवासी भागात रस्ते, नाले, गटारी, सांडपाणी वाहिन्या इत्यादी बनविताना महावितरणच्या भूमिगत केबलांना धक्का लागल्याने त्याचे दुष्परिणाम गेल्या काही महिन्यांपासून दिसू लागले असून अनेक भागात याच कारणांनी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत असून त्याचा फटका आता रहिवाशांना आणि महावितरणला बसत आहे.
बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास केबलला जॉईंट मारण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.(Dombivli Power Outage)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....