मीरा रोडनंतर घाटकोपरमध्येही बकऱ्याच्या कुर्बानीवरून वादंग; धर्माच्या नावाखाली माफियागिरी चालणार नाही; सोमय्यांचा कडक इशारा

    27-May-2026   
Total Views |
Kirit Somaiya
 
मुंबई : (Bakri Eid controversy) मीरा रोड परिसरातील सोसायटीमध्ये बकऱ्यांच्या कुर्बानीसाठी उभारण्यात आलेल्या शेडवरून निर्माण झालेल्या वादानंतर बुधवारी घाटकोपर परिसरातही याच मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला. घाटकोपरमधील सागर पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये बकरे बाहेर काढण्यासाठी पोलिस दाखल झाले. येथील रहिवाशांनी सांगितले की, या सोसायटीमध्ये सुमारे २५ बकरे आणण्यात आले आहेत आणि ते महानगरपालिकेची परवानगी न घेता कुर्बानीसाठी ठेवण्यात आले आहेत. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
 
 
घाटकोपरमधील या सोसायटीमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या देखील पोहोचले होते. बीएमसीच्या दोन गाड्या सोसायटीमध्ये दाखल होताच बकरे बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र मुस्लिम समुदाय बकरे बाहेर काढण्यास तयार नसल्याने परिसरात तणाव कायम आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या राज्यमंत्री माधुरी मिसळ यांनी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहून अशा घटनांचा राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक वातावरणावर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे.
 
हेही वाचा :  मोतीलाल नगर : नव्या अनधिकृत बांधकामांबाबत म्हाडाकडे सातत्याने तक्रारी; पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कारवाईचे म्हाडाचे संकेत
 
मंगळवारी मुंबईतील मीरा रोड येथील पूनम क्लस्टर सोसायटीच्या सृष्टी कॉम्प्लेक्समध्ये बकरीदच्या कुर्बानीसाठी आणलेले बकरे सोसायटीतून बाहेर काढण्यात आले होते. रविवारी येथे बकऱ्यांच्या कुर्बानीसाठी उभारण्यात आलेले शेड हिंदू पक्षाच्या तक्रारीनंतर सोमवारी महानगरपालिकेने हटवले होते. त्यानंतर मुस्लिम पक्षाने पुन्हा शेड उभारण्यास सुरुवात केली होती. याला हिंदू पक्षाने विरोध दर्शविला. दुपारी परिस्थिती अधिक चिघळली, जेव्हा विरोध करणारे लोक सोसायटीच्या प्रवेशद्वारावर जमले आणि घोषणाबाजी सुरू झाली. वाद वाढत जाऊन मारहाणीपर्यंत पोहोचला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. (Bakri Eid controversy)
 
 
 
धर्माच्या नावाखाली माफियागिरी चालणार नाही!
 
कुर्बानी नक्की होणार आणि ती झालीच पाहिजे, मात्र ती महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच झाली पाहिजे. अशा निवासी परिसरांमध्ये कुर्बानी करून धार्मिक माफियागिरी चालवण्यासाठी धर्माचा आडोसा कोणीही घेऊ नये. याविरोधात कारवाई झाली पाहिजे. लोक आपला धर्म पाळत आहेत, पण त्यासाठी काही नियम आणि शिस्त असते, ती पाळलीच पाहिजे. योग्य व्यवस्था करण्याबाबत मी महानगरपालिका प्रशासन आणि आयुक्तांना आधीच स्पष्ट सूचना दिल्या होत्या. कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीमध्ये एक जरी बकरा बांधलेला आढळला, तर त्यासाठी महानगरपालिका आयुक्त जबाबदार असतील. कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची जबाबदारी पोलिसांचीही आहे.
- किरीट सोमय्या, भाजप नेते (Bakri Eid controversy)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक