अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला!- इराणी जहाज आणि लष्करी तळे केली लक्ष्य- इराणकडून प्रत्युत्तराची भाषा
27-May-2026
Total Views |
नवी दिल्ली : (America Iran strike 2026) इराण आणि अमेरिका यांच्यात सोमवार दि.25 मे रोजी झालेली युद्धविरामाची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, अमेरिकेने पुन्हा इराणला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने मंगळवार दि. 26 मे रोजी होर्मुत्झ समुद्रधुनीजवळच्या आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर सुरुंग पेरणार्या जहाजांवर हल्ला केला.
तसेच, इराणच्या अब्बास बंदराजवळील क्षेपणास्त्र तळालाही अमेरिकेकडून लक्ष्य करण्यात आले असून, यामध्ये इराणच्या चार सैनिकांचा मृत्यु झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेकडून शस्त्रसंधींचे उल्लंघन झाल्याचा आरोप इराणने केला असून, या हल्ल्याचे योग्य ते उत्तर देण्यात येईल अशी धमकीही इराणने दिली आहे.
कतारच्या दोहा शहरात सुरु असलेली शांतीवार्ता फिस्कटल्यानंतर, इराण आणि अमेरिका पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले असून, स्वसंरक्षणाच्या नावाखाली अमेरिकेने इराणला लक्ष्य केले आहे. अमेरिकेने होर्मुत्झ समुद्रधुनीजवळच्या आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर सुरुंग पेरणार्या जहाजांवर हल्ला केला असून, इराणच्या अब्बास बंदरावरील लष्करी तळालाही लक्ष्य केले आहे. याच बंदरातून इराणी नौदल होर्मुत्झ समुद्रधुनीतून जाणार्या जहाजांवर लक्ष ठेवते. तसेच, क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची क्षमताही या बंदारामध्ये इराणकडे आहे.
या हल्ल्यामुळे दोन्ही देशातील शांतीवार्तेच्या प्रक्रियेवर परिणाम झाला असून, इराणने शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचा आरोप अमेरिकेवर केला आहे. होर्मुत्झ समुद्रधुनीजवळच्या ज्या भागातून इराणी सैन्य नियंत्रण ठेवते, त्यावरच अमेरिकेने हल्ला केल्याने इराणने त्याला इराणीभूमीवरील हल्ला असल्याचे मानले आहे. तर, हा हल्ला आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांमध्ये केला असून, त्याचा उद्देश स्वरंक्षण असल्याचे अमेरिकेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
अमेरिकेच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्याचा इशारा इराणने दिला असून, शत्रुशी वाटाघाटी केल्याने निव्वळ नुकसानच होते. इराणी हवाईदल सदैव तयार असून, आदेशाची वाट पाहात असल्याचे इराणी हवाईदल कमांडर सय्यद माजिद मौसवी यांनी म्हटले आहे.
दरम्यान इराणने अमेरिकेचा एमक्यु-9बी रीपर ड्रोन पाडल्याचा दावा केला असून, तसेच इराणच्या हद्दीमध्ये घुसलेल्या अमेरिकेच्या एफ-35 विमानावर गोळीबार केल्याचा दावा केला आहे. तसेच, इराणच्या सैन्याने अमेरिकेच्या आरक्यु-4 या ड्रोनालाही लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेवरचा दबाव पुन्हा वाढला!
दोन्ही देशात पुन्हा चिघळलेल्या या संघर्षाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही दिसून आला. गेले काही दिवस कमी झालेल्या कच्च्या तेलाच्या किमती या हल्ल्यानंतर उसळल्या असून, त्याचा परिणाम जागतिक भांडवली बाजारावरही दिसून आला. भारतीय भांडवली बाजारातही याचे नकारात्मक परिणाम दिसून आले होते.(America Iran strike 2026)