मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मिरा रोड परिसरातून हिंदू तरुण-तरुणीला धर्मांध मुस्लिमांकडून गंभीर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ओला-उबर चालक अजय चौधरी आणि त्याच्या मैत्रिणीने मिरा रोड पोसील ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. १८ मे रोजी मीरा-भाईंदर रोडवरील शिवर गार्डनजवळील महानगर गॅस पंप येथे घडली.
तक्रारदार अजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सीएनजी पंपावरील रांगेतून पुढे जाण्याच्या वादातून हा प्रकार सुरू झाला. १८ मे रोजी सकाळी ते आपल्या मैत्रिणीला कामावर सोडण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी सकाळी सुमारे ११:३० वाजता त्यांनी महानगर सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी गाडी थांबवली. पंपावर कार आणि रिक्षांसाठी स्वतंत्र रांगा होत्या. अजय यांनी आरोप केला की, ते कारच्या रांगेत उभे असताना, हिरव्या रंगाची स्विफ्ट गाडी अचानक रिक्षांच्या रांगेतून पुढे आली आणि जबरदस्तीने त्यांच्या गाडीच्या पुढे घुसण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेत स्विफ्ट कारने त्यांच्या गाडीच्या डाव्या बाजूच्या आरशाला धडक दिली.
त्यानंतर अजय यांच्या मैत्रिणीने आपल्या गाडीची काच खाली केल्यावर स्विफ्ट गाडीतील महिलेने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र वाद वाढू नये म्हणून अजय यांनी स्विफ्ट गाडीला पुढे जाऊ दिले. परंतु काही मिनिटांतच हा वाद हिंसक वळणावर गेला. अजय यांच्या म्हणण्यानुसार, एका दुचाकीवरून दोघेजण (फैजान खान आणि मोहम्मद खान) घटनास्थळी आले आणि स्विफ्ट कारचा चालक हिलाल खान याच्यासोबत त्यांनीही वादात सहभाग घेतला. अजय यांचा आरोप आहे की, हिलाल खान, फैजान खान आणि मोहम्मद खान यांनी त्यांना जबरदस्तीने गाडीतून बाहेर ओढले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. याशिवाय, पांढरा टी-शर्ट आणि चष्मा घातलेला ३० ते ३५ वर्षे वयोगटातील आणखी एक अज्ञात व्यक्तीही मारहाणीत सहभागी झाला.
पुढे असेही सांगण्यात आले की, अजय यांना वाचवण्यासाठी त्यांची मैत्रीण मध्ये पडली असता आरोपींनी तिलाही जमिनीवर ढकलले, शिवीगाळ केली आणि सार्वजनिक ठिकाणी तिचे कपडे फाडूण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत अजय यांच्या नाकाला दुखापत झाली असून त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. हल्ला तीव्र झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अजय यांनी हिलाल खानला पकडून त्याला रिक्षाने थेट पोलीस ठाण्यात नेले, जिथे पोलिसांनी संबंधित आरोपींची ओळख पटवली.
पोलिसांनी सदर आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ७९, ११५(२), ३५२, १८९(१), १८९(२), १९० आणि १९१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१), ३७(३) आणि १३५ अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, सीएनजी पंप आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संपूर्ण घटनाक्रम पडताळण्याचे काम सुरू आहे.