फाल्टा मतदारसंघात राजकीय ट्विस्ट!

पुनर्मतदानापूर्वी जहांगीर खानची निवडणुकीतून माघार

    19-May-2026   
Total Views |
West Bengal Politics
 
मुंबई : (West Bengal Politics) पश्चिम बंगालमधील फाल्टा विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुनर्मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी पक्षाचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. त्यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. फाल्टा विधानसभा मतदारसंघ हा अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघाचा भाग असल्याने, जहांगीर खान यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणे तृणमूलसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 
पश्चिम बंगालमधील २९३ जागांचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले होते. मात्र, निवडणूक आयोगाने फाल्टा मतदारसंघातील मतदान रद्द केले होते. गंभीर गैरप्रकार आणि लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहोचल्याचे कारण देत आयोगाने पुनर्मतदानाचा निर्णय घेतला होता. आयोगाला अनेक मतदान केंद्रांमधून मतदारांना धमकावल्याच्या तसेच ईव्हीएममध्ये कथित छेडछाड झाल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. काही प्रकरणांमध्ये विरोधी उमेदवारांची नावे हटवण्यात आल्याचे आरोपही समोर आले. याशिवाय अनेक मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज अपूर्ण आढळल्यामुळे मतदान प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
 
 
जहांगीर खान तेव्हा चर्चेत आले होते, जेव्हा त्यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा यांना खुले आव्हान दिले होते. निवडणुकीपूर्वी अजय पाल शर्मा यांनी स्वतःची तुलना ‘सिंघम’ आणि ‘पुष्पा’ चित्रपटातील कठोर अधिकाऱ्यांशी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना जहांगीर खान म्हणाले होते, “जर ते सिंघम असतील, तर मी पुष्पा आहे.”(West Bengal Politics)
 
फाल्टा येथे पुनर्मतदानाची तयारी सुरू असताना तृणमूल काँग्रेसचा एकही मोठा नेता प्रचारात दिसून आला नाही. याच मुद्द्यावरून समीक भट्टाचार्य यांनी प्रश्न उपस्थित करत विचारले की, फाल्टा येथील प्रचारादरम्यान अभिषेक बॅनर्जी नेमके कुठे आहेत? दरम्यान, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनीही प्रचारसभेत जहांगीर खान यांच्यावर निशाणा साधत “पुष्पा कुठे आहे?” असा टोला लगावला होता.
 
जहांगीर खान यांनी निवडणूक राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर फाल्टा मतदारसंघातील लढत अधिकच रंजक बनली आहे. या घटनेचा परिणाम केवळ फाल्टा मतदारसंघापुरता मर्यादित राहणार नाही, तर डायमंड हार्बरसह संपूर्ण बंगालच्या राजकारणावर त्याचे पडसाद उमटू शकतात, असे सांगण्यात येत आहे.(West Bengal Politics)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक