मुंबई प्राणीसंग्रहालयात येणार आशियाई सिंह? गुजरात प्रशासन सकारात्मक

    19-May-2026
Total Views |
Veermata Jijabai Bhosale Udyan
 
मुंबई : (Veermata Jijabai Bhosale Udyan) वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयासाठी (राणीबाग) गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने आशियाई सिंहांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानुसार दोन नर आणि दोन मादी आशियाई सिंह मुंबईला देण्याची तयारी गुजरात प्रशासनाने दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सिंहाच्या दर्शनासाठीची आतुर झालेल्या पर्यटकांना लवकरच सिंह पहाता येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
 
राणी बागेत सिंह आणण्यासाठी राणीबाग प्रशासनाचे विविध प्रयत्न सुरू होते मात्र यात त्यांना यश येत नव्हते. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सिंहासाठीचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर सिंह आणण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली.
 
सक्करबाग प्राणीसंग्रहालयाच्या संचालकांनी ६ मे रोजी मुंबई प्राणीसंग्रहालयाला पत्र पाठवून हा प्रस्ताव दिला आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण आणि संबंधित सक्षम प्राधिकरणांच्या मंजुरीनंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
 
हेही वाचा :  मुंबईतील प्रकल्प साईटवर एमएमआरडीएचे मान्सून सुरक्षा प्रोटोकॉल लागू
 
गुजरातमधील प्राणीसंग्रहालयात आशियाई सिंहांची संख्या पुरेशी असल्याने अतिरिक्त सिंह मुंबईला देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. त्याबदल्यात मुंबई प्राणीसंग्रहालयाने दोन जिराफ किंवा एक भारतीय एकशिंगी गेंडा आणि तीन कॅपुचिन माकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ तसेच केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांनुसार ही अदलाबदल करण्यात येणार आहे. यासाठी पशुवैद्यकीय तपासणी, क्वारंटाईन आणि वाहतूक प्रक्रियाही पूर्ण करावी लागणार आहे. मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आशियाई सिंह आल्यास पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे.(Veermata Jijabai Bhosale Udyan)