लैंगिक हिंस्र मानसिकतेचा चेहरा आणि गुन्हेगारांची छुपी रणनीती

Total Views |

अलीकडे बातम्यांमधून सतत दिसून येणाऱ्या लैंगिक गुन्हेगारी आणि हिंसेच्या घटनांवरून आपण व्यवस्थेवर आणि सामाजिक संस्थांवर बोट ठेवले. पण, एक समाज म्हणून आपल्याला सर्वांत मोठा आणि छळणारा प्रश्न पडतो, तो हा की, एखादा माणूस इतका पाशवी कसा बनू शकतो? अशा नराधमांच्या डोक्यात नक्की काय चाललेले असते? मानसोपचारशास्त्र आणि जागतिक संशोधनातून या ‌‘डार्क‌’ मानसिकतेचे जे वास्तव समोर आले आहे, ते केवळ धक्कादायक नाही, तर आपल्याला अंतर्मुख करणारे आहे.

1. ‌‘डार्क ट्रायड‌’ (The Dark Triad) आणि विकृत व्यक्तिमत्त्व

या विषयातील संशोधक (Balkisoglu colleagues) यांच्या जागतिक संशोधनानुसार, गंभीर लैंगिक गुन्हेगारांच्या मानसिकतेत तीन प्रमुख विकृत पैलू एकत्र आलेले दिसतात. याला मानसशास्त्रात याला ‌‘डार्क ट्रायड‌’ (गडद त्रिकूट) म्हटले जाते.

सहानुभूतीचा पूर्ण अभाव (Psychopathy): हा या ‌‘डार्क ट्रायड‌’चा सर्वांत धोकादायक आणि क्रूर पाया आहे. सर्वसामान्य माणसाला दुसऱ्याच्या डोळ्यांतील अश्रू किंवा वेदना पाहून त्रास होतो; कारण त्याच्यात सहानुभूती असते. परंतु, या गुन्हेगारांमध्ये ही संवेदना पूर्णपणे मेलेली असते. लहान मूल रडत असेल, वेदनेने विव्हळत असेल, तरीही यांच्या मनात कोणतीही दयेची भावना निर्माण होत नाही. गुन्हा केल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात पश्चात्तापाचा लवलेशही नसतो.

स्वार्थी आणि धूर्त प्रवृत्ती (Machiavellianism): या प्रवृत्तीची मुख्य व्याख्या म्हणजे ‌‘साध्य गाठण्यासाठी कोणत्याही साधनांचा वापर करणे.‌’ अशा व्यक्तींसाठी समोरचा माणूस, मग ते निष्पाप लहान मूल का असेना, एक जिवंत व्यक्ती नसून केवळ स्वतःची शारीरिक भूक किंवा विकृत आनंद पूर्ण करण्याचे एक ‌‘साधन‌’ किंवा ‌‘वस्तू‌’ असते. हे गुन्हेगार पकडले जाण्यापासून कसे वाचायचे, पुरावे कसे नष्ट करावयाचे आणि स्वतःचा मुखवटा साफ कसा ठेवायचा, याचे गणित आधीच आखतात.

अहंकार आणि आत्ममग्नता (Narcissism): याचा अर्थ केवळ स्वतःच्या रूपावर किंवा गुणांवर प्रेम करणे नव्हे, तर मी कायद्याच्या आणि समाजाच्या पलीकडे आहे, हा पराकोटीचा अहंकार असणे. या नराधमांना वाटते की, विश्वातील प्रत्येक गोष्ट केवळ त्यांच्या आनंदासाठीच बनली आहे.

हे तीन पैलू जेव्हा एकाच व्यक्तीमध्ये एकत्र येतात, तेव्हा एक अत्यंत विकृत आणि हिंस्र शिकारी किंवा ‌‘प्रेडेटर‌’ (Predator) तयार होतो. यामुळेच, अशा गुन्हेगारांकडून होणाऱ्या लैंगिक हिंसेची तीव्रता अत्यंत भीषण, पाशवी आणि अनेकदा जीवघेणी (खुनापर्यंत जाणारी) ठरते.

2. वैचारिक विकृती

लैंगिक विकृती हा मानवी मेंदूतील विचारांचा असा एक गंभीर दोष आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या गुन्ह्याचे समर्थन करण्यासाठी वास्तवाचा विपर्यास करते. सोप्या शब्दांत, हे गुन्हेगार स्वतःच्या नजरेत ‌‘गुन्हेगार‌’ ठरू नयेत, म्हणून स्वतःच्या मनाची अशी काही खोटी समजूत घालतात, ज्याला मानसशास्त्रात ‌‘न्यूट्रलायझेशन तंत्र‌’ म्हटले जाते.

पीडितेवर दोषारोप (Blaming the Victim): हे गुन्हेगार स्वतःची बाजू मांडताना म्हणतात की, ‌‘त्या मुलाने/मुलीनेच मला तसा इशारा दिला किंवा तिच्या कपड्यांमुळे किंवा वागण्यामुळे मी उत्तेजित झालो.‌’ स्वतःच्या विकृतीचे खापर ते एका निरागस, हतबल बालकावर फोडतात.

गुन्ह्याची तीव्रता कमी करून दाखवणे (Minimization): ‌‘मी त्याला/तिला कोणतीही शारीरिक इजा केली नाही किंवा मी फक्त स्पर्शच केला होता, यात एवढी मोठी काय चूक आहे?‌’ असे म्हणून ते आपल्या कृत्याचे गांभीर्य कमी करतात.

विकृत प्रेमाचा मुखवटा (Illusion of Mutual Consent): अनेक बाल लैंगिक शोषक स्वतःला असे भासवतात की, मी त्या मुलावर/मुलीवर प्रेम करतो आणि त्या मुलालाही माझ्यासोबत राहायला आवडते. या आत्मवंचनेमुळे त्यांच्या मनातील अपराधीपणाची भावना पूर्णपणे नष्ट होते.

नियमांचे उल्लंघन करण्याचे समर्थन:
‌‘मला हवा तो आनंद घेण्याचा अधिकार आहे आणि माझ्या इच्छा पूर्ण करणे, हे इतरांचे कर्तव्य आहे,‌’ अशी कमालीची स्वाथ आणि आत्मकेंद्री विचारसरणी त्यांच्यात रुजलेली असते.

3. भावना व्यवस्थापनाचा अभाव

भावनांचे व्यवस्थापन करणे म्हणजे राग, नैराश्य, भीती किंवा लैंगिक इच्छा योग्य पद्धतीने हाताळणे किंवा त्या नियंत्रणात ठेवणे. लैंगिक गुन्हेगारांमध्ये ही क्षमता पूर्णपणे कोलमडलेली असते. त्यांच्यात खालील मानसिक त्रुटी प्रकर्षाने दिसतात.

तणावाचा विकृत निचरा : जेव्हा या व्यक्तींच्या वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यावसायिक आयुष्यात अपयश, नैराश्य किंवा तणाव येतो, तेव्हा त्या परिस्थितीचा सामना करण्याची ताकद त्यांच्यात नसते. या मानसिक तणावातून आणि कमकुवतपणातून सुटका करून घेण्यासाठी ते स्वतःपेक्षा असाहाय्य, कमकुवत आणि हतबल असणाऱ्या लहान मुलांवर किंवा महिलांवर आपले वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात.

आवेग नियंत्रण नसणे : सर्वसामान्य माणसाला एखाद्या चुकीच्या इच्छेवर नियंत्रण ठेवता येते; कारण त्याच्या मनातील सदसद्विवेकबुद्धी जागी असते. परंतु, हे गुन्हेगार मनात विकृत विचार आल्यानंतर येणारा आवेग रोखू शकत नाहीत आणि परिणामांचा विचार न करता, थेट कृती करतात.

भावनिक एकाकीपणा आणि अपरिपक्वता :
हे गुन्हेगार प्रौढ व्यक्तींशी निकोप आणि निरोगी भावनिक नातेसंबंध प्रस्थापित करू शकत नाहीत. त्यांच्यातील या भावनिक अपरिपक्वतेमुळे ते लहान मुलांकडे आकर्षित होतात; कारण लहान मुलांना फसवणे, त्यांच्यावर ताबा मिळवणे आणि त्यांना घाबरवणे गुन्हेगाराला खूप सोपे वाटते.

4. गुन्हेगारांचे प्रकार आणि त्यांच्या क्लृप्त्या

सर्वच गुन्हेगारांची मानसिकता सारखी नसते. काही संधिसाधू असतात, तर काही ‌‘नियोजनबद्ध शिकारी‌’ (Predatory) असतात, जे आधीपासून पाळत ठेवतात. गुन्हेगार सुरुवातीला चॉकलेट, खेळणी किंवा महागड्या वस्तू देऊन मुलांचा आणि कुटुंबाचा विश्वास जिंकतो आणि त्यांचा शुभचिंतक म्हणून भासवत घरात घुसखोरी करतो. याशिवाय, ‌‘हे कोणाला सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना मारून टाकेन,‌’ अशी धमकी देऊन मुलाला दीर्घ काळ अबोल आणि भीतीच्या दडपणाखाली ठेवले जाते.

सर्वांत धोकादायक बाब म्हणजे, हे गुन्हेगार समाजात अत्यंत सामान्य माणसांसारखे साधे-सरळ वावरत असतात. ते कोणाचे तरी मामा-काका, शेजारी, शिक्षक किंवा अगदी कुटुंबातील सन्माननीय व्यक्तीही असू शकतात. त्यांचा हाच सभ्यतेचा मुखवटा त्यांच्यातील विकृत भक्षकाला लपवून ठेवण्यास मदत करतो. अपराधी कोणताही असो, घरातील असो वा बाहेरचा, अशा प्रवृत्तींना समाजात ओळखणे आणि वेळीच ठेचणे, ही केवळ कायद्याची नाही, तर आपल्या अस्तित्वाची गरज आहे. (क्रमशः)





प्रो. डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर

प्रोफेसर डॉ शुभांगी रघुनाथ पारकर, या एमबीबीएस, एमडी, पीएचडी, ज्येष्ठ मनोचिकीत्सक आणि आंतरराष्ट्रीय संशोधक असून. केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे माजी अधिष्ठाता होत्या. जागतिक पातळीवर संशोधन लेखनासाठी त्याना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मनोविकार, मानसिक आरोग्य आणि सकारात्मक मानसशास्त्र या विषयांवर विविध वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकात विपुल लेखन करत जनजागृती करत असतात.