मानवी मेंदू हे एक कोडेच. विविध गोष्टींचे नियंत्रण मेंदूकडेच असते. त्यामुळेच मेंदूशी संबंधित विकाराचा परिणाम मानवी जीवनावर अधिक होतो. आज जगभर या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असतानाच, त्यावरच्या संशोधनानेही वेग घेतला आहे. अशाच एका संशोधनात या विकारांवरच्या उपचाराबाबत एक आशेचा किरण समोर आला. या संशोधनाचा आणि त्यांच्या परिणामाचा घेतलेला आढावा...
मानवी मेंदू हा निसर्गाने निर्माण केलेला सर्वांत गुंतागुंतीचा अवयव. विचार, भावना, निर्णयक्षमता, भाषा, स्मरणशक्ती आणि शरीराच्या असंख्य क्रियांवर एकाचवेळी नियंत्रण ठेवणारा हा अवयव सतत कार्यरत असतो. त्यामुळेच मेंदूचे आरोग्य बिघडणे, व्यक्तीच्या संपूर्ण अस्तित्वावरच परिणाम करणारी प्रक्रिया ठरते. विशेषतः ‘अल्झायमर’ आणि ‘डिमेन्शिया’सारखे विकार आज जगभर झपाट्याने वाढत असून, वृद्धत्वाशी संबंधित आरोग्य समस्यांमध्ये ते सर्वांत गंभीर मानले जातात. अशा वेळी मेंदूतील पेशींना पुन्हा ऊर्जा देऊन स्मरणशक्ती सुधारण्याचा दावा एका संशोधनाद्वारे करण्यात आला आहे.
फ्रान्स आणि कॅनडातील संशोधकांनी केलेल्या या अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे, ‘मायटोकॉन्ड्रिया’ ही सूक्ष्म जैविक रचना. ‘मायटोकॉन्ड्रिया’ हे पेशींचे ऊर्जाकेंद्र मानले जाते. शरीरातील प्रत्येक पेशीला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा निर्माण करण्याचे काम ‘मायटोकॉन्ड्रिया’ करतात. मेंदूच्या बाबतीत ही गरज अधिक महत्त्वाची ठरते; कारण शरीराच्या वजनाच्या तुलनेत मेंदू ऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारा अवयव आहे. मानवी शरीरातील एकूण ऊर्जेपैकी जवळपास 20 टक्के ऊर्जा मेंदू वापरतो. मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्स म्हणजे मज्जापेशी असतात. या पेशी एकमेकांना सतत संदेश पाठवत असतात. आठवणी तयार होणे, जुनी माहिती साठवणे, निर्णय घेणे, चेहरे ओळखणे किंवा एखादी गोष्ट शिकणे या सर्व प्रक्रिया न्यूरॉन्सच्या कार्यक्षमतेवरच अवलंबून असतात. मात्र, या पेशींना पुरेशी ऊर्जा मिळाली नाही, तर त्यांचे संदेशवहन मंदावते. दीर्घ काळ असेच सुरू राहिल्यास स्मरणशक्ती कमी होणे, गोंधळ वाढणे आणि व्यक्तिमत्त्वात बदल दिसू लागतात.
नव्या संशोधनात वैज्ञानिकांनी उंदरांच्या मेंदूमध्ये ‘मायटोकॉन्ड्रियां’ची कार्यक्षमता कृत्रिमरीत्या वाढवली. यासाठी त्यांनी विशेष जैविक तंत्रज्ञानाचा वापर केला. प्रयोगात असे दिसून आले की, स्मरणशक्ती कमी झालेल्या उंदरांमध्ये पुन्हा आठवणी टिकून राहण्याची क्षमता वाढली. त्यांच्या वर्तनातही सकारात्मक बदल दिसून आले. यावरून संशोधकांनी असा निष्कर्ष मांडला की, ‘न्यूरोडिजेनेरेटिव्ह’ विकारांमध्ये केवळ मेंदूतील पेशींचा मृत्यू होत नाही, तर त्याआधी पेशींची ऊर्जा निर्माण करण्याची क्षमताही कमकुवत होते. ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जाते; कारण ‘अल्झायमर’वरील आजपर्यंतच्या बहुतांश संशोधनात ‘अमायलॉईड प्लॅक्स’ आणि ‘टाऊ प्रोटीन’ या दोन घटकांवरच अधिक भर देण्यात आला होता. ‘अल्झायमर’मध्ये मेंदूत विशिष्ट प्रकारचे प्रोटीन साचू लागतात. त्यामुळे न्यूरॉन्समधील संदेशवहन विस्कळीत होते आणि पेशी नष्ट होऊ लागतात. परंतु, नव्या संशोधनाने ऊर्जा व्यवस्थापनालाही तितकेच महत्त्व दिले आहे. म्हणजेच मेंदूतील पेशी पूर्णपणे नष्ट होण्यापूव त्या ऊर्जेअभावी निष्क्रिय होत असाव्यात, अशी शक्यता या अभ्यासातून पुढे आली आहे.
‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अंदाजानुसार जगभरात सुमारे 55 दशलक्षांहून अधिक लोक ‘डिमेन्शिया’ने प्रभावित आहेत. दरवष जवळपास एक कोटी नवे रुग्ण आढळतात. यातील सुमारे 60 ते 70 टक्के रुग्ण ‘अल्झायमर’चे असतात. वाढते आयुर्मान, शहरी जीवनशैली, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणांमुळे पुढील काही दशकांत ही संख्या झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘डिमेन्शिया’मध्ये सुरुवातीला व्यक्ती अलीकडील घटना विसरू लागते. वस्तू कुठे ठेवल्या हे आठवत नाही, संभाषणातील धागा हरवतो किंवा निर्णय घेण्यात अडचण येते. पुढील टप्प्यात व्यक्ती स्वतःच्या नातेवाईकांनाही ओळखू शकत नाही. काही रुग्णांमध्ये नैराश्य, चिडचिड, भीती, संशयी स्वभाव किंवा आक्रमक वर्तन दिसून येते. परिणामी रुग्णासोबत संपूर्ण कुटुंबावरच ताण निर्माण होतो.
याच पार्श्वभूमीवर नव्या संशोधनाचे महत्त्व अधिक ठळकपणे समोर येते. आजची उपलब्ध औषधे प्रामुख्याने रोगप्रसाराची गती कमी करण्यासाठी वापरली जात आहेत. स्मरणशक्ती पूर्णपणे परत मिळविणे किंवा मेंदूचे नुकसान भरून काढणे, हे जवळपास अशक्य मानले जाते. मात्र, मेंदूतील ऊर्जानिर्मिती सुधारून न्यूरॉन्स पुन्हा सक्रिय होऊ शकतात, ही संकल्पना भविष्यातील उपचारपद्धतीसाठी नवी दिशा देणारी ठरू शकते. अर्थात, या संशोधनाला पुढे यश कसे येते, यावर हे अवलंबून असणार आहे. कारण, हा प्रयोग अद्याप प्राण्यांपुरते मर्यादित असून मानवांवरील चाचण्या, औषधांची सुरक्षितता, दीर्घकालीन परिणाम आणि उपचारांचा प्रभाव यासाठी अजून बराच काळ लागणार आहे. तरीदेखील मेंदूबाबतच्या विकारांच्या अभ्यासात हे संशोधन महत्त्वाचे पाऊलच ठरले आहे. स्मरणशक्ती हरवणे हा वृद्धत्वाचा अपरिहार्य भाग आहे, ही समजूत मोडून काढण्याची क्षमता या संशोधनात दिसते. मेंदूच्या पेशींना पुन्हा ऊर्जा देऊन त्यांचे कार्य सुधारता येऊ शकते, ही कल्पनाच भविष्यात लाखो रुग्णांसाठी आशेचा नवा आधार ठरू शकते.