नागपूर : (Nagpur Legislative Council Election) नागपूर विधानपरिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी सर्वच पक्षांच्या नेत्यांशी बोलणार आहे, अशी माहिती महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना दिली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "नागपूरमधील मतदानाची टक्केवारी बघितल्यास ७५ टक्क्यांहून अधिक मतदान भाजप-महायुतीकडे आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची टंचाई आणि आपत्तीचा विचार करता इथे निवडणूक घेण्यापेक्षा ती बिनविरोध व्हावी, अशी विनंती मी सर्वांना करणार आहे. राज्यातील ज्या निवडणूका बिनविरोध होऊ शकतात त्या बिनविरोध कराव्या, यासाठी आम्ही सर्वजण पुढाकार घेणार आहोत. आमच्या तिन्ही पक्षांच्या जागावाटपाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे समन्वय समितीत बसून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. एकंदरित निवडणूका बिनविरोध व्हाव्या, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या भूमिकेला सर्वच पक्ष साथ देतील, असा विश्वास आहे." (Nagpur Legislative Council Election)
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा
ते पुढे म्हणाले की, "रायगडच्या पालकमंत्रीपदाचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाध शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बसून याबाबत निर्णय घेतील."
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले की, "मुख्यमंत्री आणि आमदार, खासदार, मंत्री, नेते किंवा पदाधिकारी जेव्हा भेटतात तेव्हा ते केवळ राजकीय विषय बोलत नसतात. त्यांचे मतदारसंघ किंवा त्यांच्या भागातील प्रश्न असतात. पक्षीय प्रश्न हे पक्षातच बोलावे लागतात. पण युतीतील समन्वय असेल किंवा इतर काही गोष्टी असल्यास मुख्यमंत्र्यांशी किंवा आमच्याशी चर्चा होते. त्यामुळे त्यांच्यात काही आलबेल नाही म्हणून भेटतात, असे मला वाटत नाही."
देश टिकला तर आपण टिकू
पेट्रोल तूटीमुळो होणाऱ्या दरवाढीबाबत बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आखाती देशातील युद्धामुळे टंचाईचे पडसाद पडणारच आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा आपल्याला फायदा होईल. शेवटी देश टिकला तर आपण टिकू. त्यामुळे यात कोणतेही राजकारण न करता पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सर्वांनी पाठबळ दिल्यास यातून आपण बाहेर पडू."
मंत्रिमंडळ बैठकीतील मंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीबद्दल सांगतात ते म्हणाले की, "कधी कधी ज्या मंत्र्यांचा विषय नाही ते मंत्री ऑनलाईन मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहू शकतात. ज्यांचा विषय आहे ते बैठकीला येतात. त्यामुळे काही मंत्री प्रत्यक्ष तर काही मंत्री ऑनलाईन उपस्थित राहतील. कोरोनाकाळातही आपण ऑनलाईन बैठका घेतल्या होत्या. यामुळे मोठा खर्च वाचतो." (Nagpur Legislative Council Election)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....