मुंबईकरांच्या खिशाला आणखी फटका, इंधन, दुधानंतर आता पाव आणि ब्रेडही महागला

    19-May-2026   
Total Views |
Mumbai Inflation News
 
मुंबई : (Mumbai Inflation News) इंधन आणि दूध दरवाढीनंतर आता मुंबईकरांना महागाईच्या आणखी धझळा बसायला लागल्या आहेत. मुंबईकरांचा आवडता वडा पाव आता महागणार आहे. पाव आणि ब्रेडच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्य़ानं मुंबईकरांच्या खिशाला आणखी फटका बसणार आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये विविध ब्रेड प्रकारांच्या दरात प्रति पाकीट २ ते ५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
 
प्रमुख ब्रेड उत्पादक मॉर्डन ब्रेड कंपनीने ब्रेड प्रकारांच्या किमती वाढवल्या आहेत. त्यापाठोपाठ आता ब्रिटानिया आणि इतर कंपन्याही लवकरच दरवाढ जाहीर करण्याच्या तयारीत आहेत.(Mumbai Inflation News)
 
पावाचे दर का वाढतायेत?
 
ब्रेड पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती हे दरवाढीमागचं एक मोठं कारण आहे. भारत मोठ्या प्रमाणावर पॅकेजिंग दर्जाच्या प्लास्टिकची आयात करतो. मात्र रुपयाच्या घसरणीमुळे आयात खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहतूक आणि वितरण खर्चातही वाढ झाली आहे. ब्रेड उत्पादनात वापरले जाणारे प्रिझर्व्हेटिव्ह, मीठ आणि इतर घटक महागल्याने उत्पादन खर्च वाढल्याचं सांगण्यात येतं आहे.
 
 
आता किती झाले ब्रेडचे दर?
 
मुंबईत नवीन दर तत्काळ लागू झाले आहेत.
१. ४०० ग्रॅम सँडविच ब्रेड : ४० रुपयांवरून ४५ रुपये
२. होल व्हीट ब्रेड : ५५ रुपयांवरून ६० रुपये
३. मल्टिग्रेन ब्रेड : ६० रुपयांवरून ६५ रुपये
४. ब्राउन ब्रेड : ४५ रुपयांवरून ५० रुपये
६. छोटं व्हाईट ब्रेड पाकीट : २० रुपयांवरून २२ रुपये
७. छोटं ब्राउन ब्रेड पाकीट : २८ रुपयांवरून ३० रुपये
 
ब्रेडसोबत पावाचे दरही वाढणार
 
स्थानिक बेकरी चालकांनीही पावाच्या लादीचे दर पाच रुपयांनी वाढवले आहेत. पावाच्या किमतीही एक रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. पॅकेजिंग साहित्य, इंधन आणि इतर खर्च वाढल्याने जुन्या दरात विक्री करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य असल्याचं सांगितलं आहे. बेकरी संघटनांनीही उत्पादन आणि वितरण खर्च सातत्याने वाढत असल्याने दरवाढ अपरिहार्य असल्याचं स्पष्ट केलंय. या दरनवाढीनंतर मुंबईकर चिंता व्यक्त करत आहेत. दूध, ब्रेड आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू सतत महाग होत असल्याने घरगुती खर्चाचं गणित बिघडत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.(Mumbai Inflation News)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक