संतश्रेष्ठ तुकाराम महाराज अभंगात सांगूनच गेले आहेत की, ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.’ म्हणजेच, आयुष्यात कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी आणि सुख-समाधान मिळवण्यासाठी आपले मन प्रसन्न असणे सर्वात महत्त्वाचे आहे. तेव्हा, या मनाचे नेमके काय कार्य आहे? या मनाची ताकद तरी किती? यांसारख्या प्रश्नांची उकल करणारा हा लेख...
आयुर्वेदामध्ये मनाला ‘उभय इंद्रिय’ मानले आहे. इंद्रिये दोन प्रकारची असतात, कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये. जी इंद्रिये कर्म/कार्य करण्यात मदत करतात (जसे-हात, पाय, गुद, उपस्थ (Genitacs) आणि वाणी) कर्मेंद्रिये ही पाच आहेत. ज्ञानेंद्रिये म्हणजे ज्याने माणसाला आसपास, परिसरात घडणाऱ्या गोष्टींचे आकलन होते, ज्ञान होते, ती इंद्रिये म्हणजे ज्ञानेंद्रिये होय. हीपण पाच आहेत. (जसे-डोळे, कान, नाक, मुख/जीभ आणि त्वचा) बाह्य सृष्टीतील घडामोडींची जाण करून देण्यासाठी ज्ञानेंद्रियांची कार्यशीलता उत्तम असणे गरजेचे आहे. तसेच ज्ञान झाल्यावर त्या कृती करण्यासाठी कर्मेंद्रिये उत्तम कार्यरत असणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. मग मनाला ‘उभयात्मक इंद्रिय’ का म्हटले आहे? कारण, ते ज्ञानेंद्रियाचे व कर्मेंद्रियाचे दोन्हींचे कार्य करते. मनाचा सहभाग नसेल, तर कुठलेच इंद्रिय कार्य करू शकत नाही. कार्य करायला उद्युक्त करणे, हे मनाचे सर्वांत मोठे कार्य आहे. उदा. फेोन वाजतो, आपण उचलतो, तेवढ्यात दार वाजते किंवा कुकरची शिटी होते. आपण मोबाईलवर बोलत बोलत दार उघडतो, गॅस बंद करतो. ही बहुकार्यक्षमता मनामुळे शक्य असते. दुसरे उदाहरण - ऑनलाईन गेम, वेबसीरिज बघता बघता संध्याकाळची रात्र आणि रात्र संपून मध्यरात्र कधी होते, हे कळतच नाही. तेव्हा भूक-तहान-झोप-लघुशंका (मूत्र प्रवृत्तीची जाणीव) इ. काहीच होत नाही. मनाची Total Involvement (Complete Arrest) त्या गेम, वेब सीरिजमध्ये झाल्यामुळे इतर संवेदना मनापर्यंत पोहोचत नाहीत, मन त्याची नोंदच घेत नाही आणि त्यावर अंमलबजावणी केली जात नाही. मनाला घोड्याच्या लगामाची उपमा यासाठीच (रथातील घोड्यांचा लगाम असे वर्णन भगवद्गीतेत आहे.) दिली आहे. मन आपल्या कृतींचे नियंत्रण करते. (Controller), उद्युक्तही करतो. (Initiator) आणि इंद्रिय-आत्मा व वस्तू (Objects) यामध्ये मध्यस्थाचेही कार्य करते. म्हणूनच मनाला ‘उभयात्मक इंद्रिय’ तर म्हटलेच आहे, त्याचबरोबर ते अतींद्रियदेखील आहे (इंद्रियांपलीकडे आहे.) म्हणजे, इंद्रियांपेक्षा वरचढ, इंद्रियांना जाणवेल, समजेल त्यापेक्षा परे आहे. मनाला सत्त्व (Pure Consciousness), चेतस (Intelligence) आणि चित्त (Consciousness) अशी पर्यायी नावे आहेत.
मनाची काही महत्त्वाची कार्ये आहेत. चिंतन करणे (एखाद्या गोष्टीबद्दल सखोल विचार करणे, समजून घेणे, ज्ञानग्रहण करणे.) विचार्य म्हणजे आकलन झालेल्या ज्ञानाचे प्रोसेसिंग करणे. उह्य (म्हणजे त्याबद्दल निष्कर्ष काढणे) थोडक्यात, चिंतन म्हणजे प्राथमिक विचार करण्याची प्रक्रिया (1st Unprocessed Thinking, Basic Understanding) विचार्य म्हणजे तर्क लावून विचार करणे (Logical Reasoning & Analysis) एखादी गोष्ट स्वीकारावी की सोडून द्यावी, याबद्दल ठरविणे. उह्य म्हणजे अंदाज बांधणे (अनुमान करणे.) ध्येय आणि संकल्प हीदेखील मनाचीच कार्ये आहेत. ध्येय म्हणजे आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचणे. एखादी क्रिया/कर्म/नवीन गोष्ट कानावर पडली, तर त्याचे ज्ञान होऊन, विचार करून, समाजावून घेऊन, त्याबद्दलची प्रतिक्रिया, त्याबद्दलचे मत तयार करणे, म्हणजे ध्येय होय. संकल्प म्हणजे त्याबद्दल मन बनविणे. ही गोष्ट चांगली आहे/वाईट आहे, ही करावी/टाळावी, इतरांना सांगावे/सांगू नये, आपल्या फायद्याची आहे/तोट्याची आहे इ. ठरविणे म्हणजे संकल्प होय. प्रत्येक ज्ञानेंद्रियातील आणि कर्मेंद्रियातील ज्ञान impulse जे मनापर्यंत पोहोचते आणि ती व्यक्ती त्या गोष्टीला प्रतिसाद देते, त्यापूव मनातून हे पाच टप्पे पार करूनच तो प्रतिसाद उत्पन्न होतो.
उदा. वर्गात शिक्षिकेने हाक मारली, तर त्याला प्रतिसाद द्यायचा का नाही व त्यावर उभे राहायचे. शिक्षिकेजवळ जायचे का बसूनच उत्तर द्यायचे, हे सगळं मन क्षणार्धात ठरविते आणि तो विद्याथ/ती विद्यार्थिनी चटकन तसा प्रतिसाद देते. (त्यामध्ये चिंतन, विचार्य, उह्य, ध्येय आणि संकल्प) या सगळ्या कृती झालेल्या असतात. आपले मन प्रत्येक बाह्य impulseला (प्रेरणा/उत्तेजना/इच्छा) याचप्रकारे प्रतिक्रिया देत आहे. प्रत्येक अवयवातून काही ना काही कार्य सुरू असते. जेव्हा त्यावर कार्य/प्रतिकार्य/प्रतिक्रिया देण्याची वेळ येते, तेव्हा त्यात मनाची भूमिका, जबाबदारी ही असतेच. झोपेतही जर स्वप्ने पडत असतील, तर शरीर जरी शांत, निपचित पडले असेल, तर मन कार्यरत राहते आणि ओरडणे, दचकणे, किंचाळणे, चाळणे, रडणे इ. प्रतिक्रिया शरीरामार्फत मनाद्वारे निर्माण केले जाते.
एवढी मोठी मनाची ताकद आहे. मन अतिशय चंचल आहे, ते एका जागी टिकत नाही, स्थिरावत नाही, रमत नाही. अभ्यासाला बसल्यावर भूक लागते, तहान लागते, झोप लागते. जप करताना विविध विचारांचा कॅलिडोस्कोप मनात सुरू असतो. मनाला एकाग्र करणे खूप कठीण असते. कारण, मनाला प्रत्येक Impulseला प्रतिक्रिया द्यायची असते. मनाला जेवढ्या अधिक संवेदना पोहोचतात, तेवढे ते अधिक चंचल होते. योगशास्त्रात मनातील विचारांना आभाळातील ढगांची उपमा दिली आहे. आभाळात जसे खूप ढग असतात, विविध आकाराचे आणि सतत बदलत असतात, तसेच मनातही भरपूर विचार असतात. पाण्यात दगड टाकल्यावर जसे तरंग निर्माण होतात, तसेच मनातही विचारांचे तरंग उमटत राहतात. त्या तरंगांमध्ये न अडकता, फक्त बघ्याची भूमिका घ्यायला ज्याला जमली, तो जिंकला!
मनाची दोन मुख्य कर्मे आहेत, इंद्रिय अभिग्रह, म्हणजेच इंद्रियांना आवरणे आणि उत्तेजना देणे. घोड्याची गती जशी लगामाने वाढविली/कमी केली जाते, तसेच कुठल्या कर्मेंद्रिय/ज्ञानेंद्रियाने कार्य अधिक व्हावे आणि कुठले रोकावे, थांबवावे, हे मनाचे महत्त्वाचे कार्य आहे. (Controlling of Urges) प्रत्येक आवेगाला, संवेदनेला थांबवावेच लागते, असे नाही. काही वेळेस त्यावर त्वरित, लगेच कृती अपेक्षित असते. हा सारासार विचार मनाद्वारे होतो. दुसरे कर्म म्हणजे स्वनिग्रह (Self Control, Self Limiting) कुठपर्यंत करावे आणि कुठे थांबावे, काय सुरू करू नये, कशाच्या वाट्यालाच जाऊ नये, ही सदसद्विवेकबुद्धी मनाद्वारेच कार्यरत आहे. स्वतःच्या भल्यासाठी, आरोग्यासाठी आणि सकारात्मक विचारासाठी कुठली कृती/क्रिया फायद्याची आहे आणि कशापासून दूर राहावे, मोह टाळावा, आवरावा याला ‘निग्रह’ म्हणतात. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उत्तम व स्वनिग्रह करता येतो.
स्वस्थ व्यक्तीसाठी प्रसन्न (positive)आत्मा, मन आणि इंद्रिय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ शरीरस्वास्थ्य म्हणजे व्यक्ती निरोगी असे आयुर्वेदाने मानले नाही.
समदोषक समाग्निश्च समधातुमलक्रियः|
प्रसन्नात्मेद्रियमनाः स्वस्थ इत्याभिधीयते॥ (क्रमशः) - वैद्य किर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429
[email protected]