२६४० सदनिकांसाठी आतापर्यंत ७८,९७६ अर्ज प्राप्त

५५,२४४ अर्ज अनामत रकमेसह

Total Views |
 MHADA Lottery 2026
 
मुंबई : (MHADA Lottery 2026) म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २,६४० घरांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडत प्रणालीमध्ये ७८,९७६ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ५५,२४४ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून आपला सहभाग निश्चित केला आहे. अधिकाधिक अर्जदारांना सोडत प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी मंडळाने दि. २८ मे, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
 
त्याचबरोबर सोडतीतील कन्नमवार नगर-विक्रोळी (पूर्व) प्रकल्पातील १२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका आता केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबई मंडळाने सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या २,६४० सदनिकांपैकी विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १२२१ सदनिकांच्या किंमतीत ७.५ टक्के कपात केली आहे. या संधीचा अधिकाधिक इच्छुक अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.(MHADA Lottery 2026)
 
हेही वाचा :  अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडीया व्यवस्थापनाला दणका
 
म्हाडा मुंबई मंडळाने दि. ३० मार्च रोजी मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील २६४० सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत जाहीर केली. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी ७९८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी ८३९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.(MHADA Lottery 2026)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.