आफ्रिकेतील भारताच्या प्रकल्प निर्यातीस चालना; इंडिया एक्झिम बँकेकडून AFC ला १०० दशलक्ष डॉलर्सची कर्जसुविधा
19-May-2026
Total Views |
मुंबई : (India Africa Trade Relations) भारत आणि आफ्रिका यांच्यातील आर्थिक व व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत इंडिया एक्झिम बँकेने आफ्रिका फायनान्स कॉर्पोरेशन (AFC) ला १०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची कर्जसुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा आफ्रिका खंडातील भारताच्या प्रकल्प निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात आली असून, भारत सरकारच्या “फोकस आफ्रिका” उपक्रमांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत भारत आणि आफ्रिका यांच्यातील संबंध (India Africa Trade Relations) अधिक व्यापक झाले असून, व्यापार, पायाभूत सुविधा, क्षमता विकास आणि तंत्रज्ञान हस्तांतरण या क्षेत्रांत सहकार्य वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारत-आफ्रिका व्यापार ८१.९० अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचला. यामध्ये भारताच्या निर्यातीचा वाटा ४२.७० अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका होता.
इंडिया एक्झिम बँकेने दिलेली ही कर्जसुविधा यापूर्वी AFC ला देण्यात आलेल्या आर्थिक सहाय्याच्या पुढील टप्प्यातील महत्त्वाची मदत मानली जात आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये कोविड-१९ महामारीनंतर आफ्रिकन देशांच्या अर्थव्यवस्थांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीसाठी AFC ला १०० दशलक्ष डॉलर्सची सुविधा देण्यात आली होती. त्यानंतर मार्च २०२६ मध्येही भारताच्या प्रकल्प निर्यातीस समर्थन देण्यासाठी आणखी १०० दशलक्ष डॉलर्सची सुविधा मंजूर करण्यात आली होती.
आफ्रिका फायनान्स कॉर्पोरेशन (AFC) ही आफ्रिकेतील पायाभूत सुविधा गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणारी कराराधारित पॅन-आफ्रिकन बहुपक्षीय वित्तीय संस्था आहे. AFC मध्ये ४८ सार्वभौम सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे.
या नव्या कर्जसुविधेमुळे आफ्रिकेतील भारतीय कंपन्यांच्या प्रकल्पांना चालना मिळण्याबरोबरच भारत-आफ्रिका आर्थिक सहकार्य आणखी दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(India Africa Trade Relations)