मुंबई : (Devendra Fadnavis Energy Policy) राज्यात अणुऊर्जा निर्मितीकरिता सरकारने मंगळवारी विविध कंपन्यांशी सामंजस्य करार केला. या कंपन्यांनी राज्यात ६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक केली असून त्यातून १ लाख २३ हजार ५०० रोजगार निर्मिती होणार आहे.
मंत्रालयात आयोजित बैठकीत अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्य शासनासोबत चार कंपन्यांचे सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये एनटीपीसीएल (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड), अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ललितपुर पावर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) यांचा समावेश आहे. यावेळी पारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, एनटीपीसी लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक ए. पी. सामल, अदानी पॉवर कंपनीचे बिझनेस हेड विवेक शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या न्यूक्लिअर एनर्जी बिजनेसचे अध्यक्ष रंजय शरण आदी उपस्थित होते.(Devendra Fadnavis Energy Policy)
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवून देशात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी महाराष्ट्र पुरेपूर प्रयत्न करीत आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना शासनाच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल."
ते पुढे म्हणाले की, "राज्यात स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठ्या संधी असून. स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये अणुऊर्जा अत्यंत महत्त्वाची आहे. या क्षेत्रात होत असलेल्या गुंतवणुकीतून राज्य ऊर्जा निर्मितीमध्ये अधिक वेगाने प्रगती करणार आहे. ही गुंतवणूक केवळ ऊर्जा निर्मितीसाठीच लाभाची नसून त्यामुळे रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्र नेहमी देशात अग्रेसर असणार आहे. कंपन्यांनी सामंजस्य करार प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये आणण्यासाठी गतीने कार्यवाही करावी. संबंधित कंपन्यांनी प्रकल्पाच्या जागांचे सर्वेक्षण करावे. यासाठी राज्य शासनाचा संबंधित विभाग त्यांना सहकार्य करेल."(Devendra Fadnavis Energy Policy)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....