अवैध कब्जा केलेल्या जमिनीवर मशिद-मदरसे बांधणे चुकीचेच

    19-May-2026   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
पश्चिम बंगालमध्ये अवैध मदरशांविरोधात राज्य सरकारने सुरू केलेल्या कारवाईला इस्लाम धर्मप्रचारक आणि मौलाना मुजफ्फर हुसेन रजवी यांनी उघडपणे समर्थन दिले आहे. त्यांनी म्हटले की, इस्लाम धर्म कधीही अवैध जमिनीवर मशिद किंवा मदरसा उभारण्यास परवानगी देत नाही. जर एखादी व्यक्ती बेकायदेशीररीत्या जमीन ताब्यात घेऊन मशिद किंवा मदरसा बांधत असेल, तर ते चुकीचे असून इस्लाम अशा कृत्याचे समर्थन करत नाही.

मौलाना रजवी यांनी स्पष्ट केले की, मशिद आणि मदरसे केवळ वैधरीत्या खरेदी केलेल्या जमिनीवरच उभारले गेले पाहिजेत. त्यांनी पुढे सांगितले की, एखाद्या व्यक्तीला जमीन दान करायची असली तरी इस्लामी नियमांनुसार ती जमीन विधिपूर्वक विकली जाणे आवश्यक असते. जमीन कोट्यवधी रुपयांची असली तरी प्रतीकात्मक स्वरूपात एक रुपयाला विकली गेली तरी चालेल, मात्र व्यवहार कायदेशीर असणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्या जागेवर धार्मिक संस्था उभारणे योग्य मानले जाते.

मौलाना म्हणाले की, मशिद आणि मदरसा उभारणीसाठी समाजातील लोक आपल्या क्षमतेनुसार निःस्वार्थपणे सहकार्य करू शकतात आणि त्यावर कोणतीही बंदी नाही. रस्त्यावर नमाज पठणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, मशिदींमध्ये जागा अपुरी पडल्यासच मजबुरीमुळे रस्त्यावर नमाज अदा केली जाते. इस्लाम स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी नमाज पठण करण्याची शिकवण देतो, तर रस्ते अनेकदा घाण आणि अशुद्धतेने भरलेले असतात. त्यामुळे नमाजासाठी मशिद हेच सर्वात योग्य स्थान असल्याचे त्यांनी नमूद केले.

लाऊडस्पीकरच्या वापराबाबत मौलाना रजवी यांनी सांगितले की, त्याचा उपयोग केवळ नमाजाच्या वेळेची माहिती देण्यासाठी काही मिनिटांसाठी केला जातो. सरकारने ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी कोणतेही नियम लागू केले, तर लोकांनी घाबरण्याची गरज नाही. उलट सरकारच्या आदेशांचे पालन आणि समर्थन केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक