बंगालमध्ये भाजपच्या जनशक्तीचा विजय, तृणमूलच्या धनशक्तीचा पराजय!

    19-May-2026   
Total Views |

भाजप आणि सुवेंदू अधिकारी यांचा प. बंगालमध्ये पराभव व्हावा, म्हणून तृणमूल काँग्रेसने जंग जंग पछाडले. तृणमूल काँग्रेसने सुवेंदू अधिकारी यांना नंदीग्राममधून पराभूत करण्यासाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च केल्याचाही आरोप करण्यात आला. पण, अखेरीस नंदिग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघांतून सुवेंदू अधिकारीच विजयी ठरले आणि तृणमूलच्या धनशक्तीचा दारुण पराभव झाला.

प. बंगालमध्ये सत्तापरिवर्तन झाले आणि ममता बॅनर्जी यांच्या हातून भाजपने १५ वर्षांची सत्ता खेचून घेतली आणि त्या राज्यात सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. प. बंगालमध्ये भाजप सत्तेवर येऊ नये म्हणून तृणमूल काँग्रेसने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. त्याच्या ‌‘सुरस‌’ कथा आता बाहेर येऊ लागल्या आहेत.

सुवेंदू अधिकारी यांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव व्हावा म्हणून तृणमूल काँग्रेसने जवळजवळ १०० कोटी रुपये खर्च केले, अशी माहिती समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसने नंदीग्राम मतदारसंघात १०० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप भाजपच्या कोणा नेत्याने केला नाही; तर हा आरोप केला आहे, त्या मतदारसंघातून निवडणूक लढविलेले ‌‘आम जनता उन्नयन पाट‌’चे उमेदवार शाहीदुल हक यांनी! तृणमूल काँग्रेसने त्या मतदारसंघात पाण्यासारखा पैसा ओतल्याचा आरोप हक यांनी केला आहे.

या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचा पराभव करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने सर्व ती तयारी केली होती. केवळ अधिकारी यांचा पराभव करण्यासाठी 100 कोटींची व्यवस्था त्या पक्षाने केली होती. ‌‘तृणमूल‌’च्या नेत्या ममता बॅनर्जी, त्या पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि त्या पक्षाचा राजकीय सल्लागार म्हणून कार्यरत असलेला ‌‘इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी गट‌’ हे सर्व त्यामध्ये सहभागी होते, असा आरोप हक यांनी केला आहे. ‌‘तृणमूल‌’च्या कार्यकर्त्यांनी आणि त्या पक्षाच्या राजकीय सल्लागार असलेल्या गटाने मतदारांना मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप केल्याचा आरोप हक यांनी केला आहे. नंदीग्राममधील घराघरांमध्ये जाऊन एक हजार ते पाच हजार रुपयांच्या रकमेच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले, असेही हक यांनी म्हटले आहे. मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी ही रक्कम वाटण्यात आली, हे उघड आहे. मात्र, नंदीग्राममधील सर्वसामान्य जनतेने तृणमूल काँग्रेसचे उमेदवार पवित्र कार आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याकडून पैशांची पाकिटे घेतली. मात्र, त्यांनी मतदान केंद्रांवर जाऊन भाजपला मतदान केले, असे हक यांनी सांगितले. त्या मतदारसंघातील मतदारांनी पैसे स्वीकारले असल्याचे म्हटले जात असले, तरी शेवटी त्यांनी पवित्र कार आणि सुवेंदू अधिकारी यांच्यामधून अधिकारी यांचीच निवड केली. नंदीग्रामच्या मतदारांनी राज्यामध्ये चांगले सरकार यायला हवे, म्हणून सुवेंदू अधिकारी यांना निवडले. त्या मतदारसंघातील सुज्ञ मतदारांना माझा सलाम, असेही हक यांनी म्हटले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा जो ओघ वाहत होता, त्याची चौकशी करावी, अशी मागणी हक यांनी केली आहे. त्या निवडणुकीत जो पाण्यासारखा पैसा ओतला गेला, त्याचे धागेदोरे बांगलादेश, पाकिस्तान यांसह काही अन्य देशांशी जोडले गेले आहेत, असा आरोप हक यांनी केला. देशविरोधी आर्थिक कट रचल्याबद्दल अभिषेक बॅनर्जी यास त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणीही हक यांनी केली. मात्र, हक यांनी जे आरोप केले, त्याबद्दल तृणमूल काँग्रेसकडून आतापर्यंत तरी अधिकृतपणे उत्तर देण्यात आलेले नाही. निवडणूक जिंकण्यासाठी आणि आपल्या प्रतिस्पध उमेदवाराच्या पराभवासाठी तृणमूल काँग्रेस कोणत्या थराला जाऊ शकते, ते यावरून लक्षात येते. या सर्व आरोपांची सखोल चौकशी व्हायला हवी आणि सत्य देशातील जनतेसमोर यायला हवे!

कर्नाटकमध्ये दहा लाख बांगलादेशी?

कर्नाटकमधील भाजप नेते आर. अशोक यांनी, कर्नाटक राज्यात दहा लाख बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत असल्याचा आरोप केला आहे. राज्यातील मतदारयाद्यांमधील अशा बोगस मतदारांना शोधून काढून त्यांची नावे मतदारयाद्यांमधून वगळण्यासाठी विशेष सखोल तपासणी केली पाहिजे, अशी मागणी आर. अशोक यांनी केली आहे. दि. १६ मे रोजी बंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना अशोक यांनी हा आरोप केला. यावेळी आर. अशोक यांनी विशेष सखोल तपासणी(एसआयआर)चे जोरदार समर्थन केले. “कर्नाटक राज्यात येत्या २० जूनपासून ‌‘एसआयआर‌’ मोहीम हाती घेण्यात येत असून, त्याद्वारे राज्यातील ५.५५ कोटींहून अधिक मतदारांची छाननी केली जाणार आहे. या मोहिमेत ज्यांची नावे अनेकदा आली आहेत, त्यांच्या नोंदी रद्द करणे, बेकायदेशीर मतदारांच्या नोंदी रद्द करणे, जिवंत नसलेल्या मतदारांची नावे वगळणे याकडे लक्ष दिले जाणार आहे. मतदारयाद्यांचे या मोहिमेद्वारे शुद्धीकरण केले जाणार आहे. ही मोहीम म्हणजे केवळ प्रशासकीय सुधारणांचा भाग नाही, तर त्याद्वारे लोकशाही अधिक दृढ करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत,” असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यातील बांगलादेशी नागरिकांची बेकायदेशीर उपस्थिती हा राज्यासमोरील गंभीर प्रश्न असल्याकडे आर. अशोक यांनी लक्ष वेधले.

राज्यात सुमारे दहा लाख बेकायदेशीर बांगलादेशी असल्याचा आरोप त्यांनी केला. याकडे प्रदीर्घ काळ दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही ते म्हणाले. “आपले म्हणणे कोणाला खोटे वाटत असेल, तर अशा लोकांना आपण बंगळुरू शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करून राहत असलेल्या बांगलादेशी लोकांच्या वस्त्या दाखवू,” असे ते म्हणाले. देशामध्ये सुमारे दोन कोटींहून अधिक बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे मंत्री झमीर अहमद खान आणि अन्य काही नेत्यांनी कर्नाटक राज्यात बांगलादेशी बेकायदेशीरपणे राहत असल्याच्या म्हणण्याचे खंडन केले आहे. त्यावर, केवळ राजकीय कारणांसाठी हे नेते वस्तुस्थिती नाकारत आहेत, असे आर. अशोक यांनी म्हटले आहे.

देशात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या समस्येकडे आर. अशोक यांनी लक्ष वेधले आहे. या प्रश्नाकडे कोणत्याही पक्षाने राजकीय चष्म्यातून न पाहता, देशहिताचा विचार करून पाहायला हवे. पण, राष्ट्रहिताचा विचार देशातील किती प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते करतात, हाही मोठा प्रश्नच आहे.

‌‘मुस्लीम कोणापुढे झुकणार नाहीत!‌’

देशातील काही कट्टर मुस्लीम नेते भडक वक्तव्ये करून प्रकाशझोतात राहण्याचा आणि मुस्लीम समाजास भडकविण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा जहाल नेत्यांपैकी एक आहेत, ‌‘जमात-उलेमा-ए-हिंद‌’चे अध्यक्ष अर्शद मदानी. अलीकडेच केलेल्या एका वक्तव्यात, “भारतामध्ये मुस्लीम समाज आणि मुस्लिमांची चिन्हे यांना लक्ष्य केले जात आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. असे असले, तरी मुस्लीम कोणासमोर झुकणार नाहीत, असा इशारा देण्यासही ते विसरले नाहीत. ‌‘जमात-उलेमा-ए-हिंद‌’च्या दोन दिवसांच्या कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात मदानी यांनी हा इशारा दिला आहे. भारतातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, याकडे लक्ष वेधून मदनी यांनी, ‌‘मुस्लीम समाज कोणापुढेही झुकणार नाही,‌’ असा इशारा दिला आहे. मदानी यांच्या या वक्तव्याने एक नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. तसेच समाजमाध्यमांवरूनही त्यावर मतप्रदर्शन केले जात आहे. बळ, धमक्या आणि जबरदस्ती याचा वापर करून मुस्लिमांना कधीच दाबून टाकता येणार नाही, असे मदानी यांनी म्हटले आहे. ‌‘जमात-उलेमा-ए-हिंद‌’च्या वतीने जे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे, त्यामध्ये ‌‘समान नागरी कायदा‌’, ‌‘वन्दे मातरम‌’ची सक्ती, मशिदी आणि मदरसा यांच्याविरुद्ध केली जाणारी कारवाई, मतदारयाद्यांची सखोल तपासणी करण्याची मोहीम आदींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच याआधी केवळ मुस्लीम समाजास लक्ष्य करण्यात येत होते, आता इस्लामलाही लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. देशातील काही कट्टर मुस्लीम नेते आणि संघटना मुस्लीम समाजाचे मन अधिक कलुषित करण्याचा प्रयत्न कसा करीत आहेत, त्याची यावरून कल्पना येते. अशा मुस्लीम नेत्यांचे प्रयत्न त्या समाजाने हाणून पाडायला हवेत. तसेच देशातील जनतेनेही एकमुखाने अशा नेत्यांचा धिक्कार करायला हवा.

9869020732







दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.