लोकप्रतिनिधींकडून पर्जन्य जल उदंचन केंद्रांची पाहणी
पाणी साचू नये यासाठी सर्वंकष कृती आराखडा केंद्राकडे सादर – आमदार अमीत साटम
19-May-2026
Total Views |
मुंबई : (Amit Satam Monsoon Inspection) पावसाळ्यापूर्व तयारीचा भाग म्हणून मुंबईतील विविध लोकप्रतिनिधींनी मंगळवारी रे रोड येथील ब्रिटानिया, वरळी येथील लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलँड पर्जन्य जल (पम्पिंग ) उदंचन केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. सखल भागांमध्ये पावसाचे पाणी जलद गतीने वाहून जाण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेला सर्वंकष कृती आराखडा केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आल्याची माहिती आमदार अमीत साटम यांनी यावेळी दिली.
या पाहणी दौऱ्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, आमदार अमीत साटम यांच्यासह महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर आणि पर्जन्य जल वाहिन्या विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, मुसळधार पाऊस आणि भरतीच्या काळात साचलेले पावसाचे पाणी उदंचन संचांच्या साहाय्याने समुद्रात सोडले जाते. ओहोटीच्या काळात पूर नियंत्रक दरवाजे खुले ठेवून पाणी नैसर्गिकरीत्या समुद्रात वाहून जाते.
भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी नाल्यांत शिरू नये यासाठी पूर नियंत्रक दरवाजांचा वापर केला जातो. तसेच नाल्यातील कचरा रोखण्यासाठी यांत्रिक जाळी प्रणाली कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Amit Satam Monsoon Inspection)
सध्या हाजी अली (महालक्ष्मी), इर्ला (जुहू), लव्हग्रोव्ह (वरळी), क्लिव्हलँड (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड) आणि गझदरबंध (सांताक्रूझ) अशी सहा पर्जन्य जल उदंचन केंद्रे कार्यरत असून माहुल (चेंबूर) आणि मोगरा (वेसावे) येथील दोन केंद्रांची कामे प्रगतिपथावर असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेने आयआयटी मुंबईच्या माध्यमातून शहराच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास करून पावसाच्या पाण्याचा प्रभावी निचरा करण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी केंद्रीय निधीतून करण्यात येणार असल्याचेही साटम यांनी स्पष्ट केले.
५५० हून अधिक उदंचन संच तैनात!
आमदार अमीत साटम यांनी सांगितले की, पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाहणी सुरू आहे. सखल भागांतील पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणी ५५० हून अधिक उदंचन संच तैनात करण्यात आले आहेत. नाले आणि नदी स्वच्छतेची कामेही वेगाने सुरू असून निर्धारित मुदतीत ती पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Amit Satam Monsoon Inspection)