वैद्यकीय क्षेत्रातला दीपस्तंभ...

    19-May-2026   
Total Views |

गोरगरिबांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवून देणारे निष्णात ‌‘यूरोलॉजीतज्ज्ञ‌’ डॉ. देवेंद्र काठोड पाटील. आंबाडीतील झिडके गावाच्या या सुपुत्राच्या जीवन-विचारांचा मागोवा घेणारा हा लेख...

डॉ. देवेंद्र पाटील म्हणजे वसई ते आंबाडी, मोखाडा, विक्रमगड या परिसरातल्या रहिवाशांच्या गळ्यातले ताईत. डॉ. देवेंद्र यांच्यावर लोकांचे इतके प्रेम का? ते सांगणारी एक घटना- मोखाडा येथून वसईच्या त्यांच्या ‌‘यूरोलॉजी सुपर स्पेशल इस्पितळा‌’त 70-75 वर्षांची दिसणारी ती स्त्री-रुग्ण आली होती. डॉक्टर देवेंद्र यांनी तिला तत्काळ तपासले. तिच्या किडनीमध्ये खडा झाला होता. त्यामुळे पू होऊन त्याचे दूषित संक्रमण शरीरभर पसरले होते. मरणासन्न अवस्थेत असलेल्या तिला उपचारासाठी ‌‘डायलिसिस‌’ करावे लागणार होते. ही आरोग्य उपचारसुविधा ‌‘यूरोलॉजी‌’ इस्पितळात नव्हती. त्यांनी रुग्णाच्या सोबत असलेल्या मुलीला सांगितले की, रुग्ण महिलेला खासगी इस्पितळात हलवणे गरजेचे आहे. ती म्हणाली, “मी एक नंबर देते, त्यावर फोन करा आणि सांगा.” त्यांनी तिची विनंती मान्य करून रुग्णाच्या नातेवाईकाला फोन केला. त्या महिलेची गंभीर परिस्थिती सांगितली, तर समोरची व्यक्ती म्हणाली, “असं करा, पेशंटला परत पाठवा. आम्ही उद्या सगळ्यांशी बोलून ठरवतो की, काय करायचं.” संक्रमण शरीरात पसरलेली ती महिला उपचार मिळाले नाहीत, तर ती दगावू शकत होती, असे सांगूनही ती व्यक्ती म्हणत होती, पेशंटला घरी पाठवा. हे सगळे ऐकून रुग्णासोबतची ती 17-18 वर्षांची मुलगी ‌‘आई... आई‌’ करून रडू लागली. डॉक्टरांनी पाहिले, ती रुग्ण 70 वर्षांची दिसत होती. मात्र, प्रत्यक्षात ती 40 वर्षांची होती. कष्ट आणि त्रास यामुळे तिला अकाली वृद्धत्व आले होते. कष्टकरी भगिनीच्या आरोग्याची आणि जीवनाची परिस्थिती पाहून त्यांना वाईट वाटले. डॉ. देवेंद्र यांनी खासगी दवाखान्यात संपर्क केला, त्या महिलेला तिथे प्रवेश मिळवून दिला आणि तिचे संपूर्ण शुल्क भरले. ती महिला आजारातून बरी व्हायला हवी, हा एकच विचार त्यांच्या मनात होता.

‌‘एमबीबीएस‌’, ‌‘एमएस‌’, ‌‘यूरोलॉजी‌’मध्ये ‌‘डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड‌’पर्यंत शिक्षण पुढे ‌‘रोबोटिक‌’संदर्भात इन्टिट्युटिव्हचे प्रशिक्षण, असे सर्व संबंधित वैद्यकीय शिक्षण डॉ. देवेंद्र यांनी पूर्ण केले. आज ते ‌‘यूरोलॉजी‌’ क्षेत्रातले निष्णात आणि प्रसिद्ध डॉक्टर आहेत. वसई ते विक्रमगड परिसरातील लाखो लोकांवर त्यांनी उपचार केले. त्यांचे रुग्णालय गरीब रुग्णांसाठी अक्षरशः देवदूतासारखे काम करते. आधुनिक सुविधा असलेल्या या रुग्णालयात गरिबातल्या गरीब रुग्णावर उपचार केले जातात. तितकी होईल, तितकी सवलत दिली जाते. परिसरातील आदिवासी बांधव कष्टात जुंपलेले असतात. जास्तच तहान लागली, तर तहान जाण्यापुरते पाण्ाी पितात. त्यामुळे निर्जलीकरण होणे, मुतखडा होणे या समस्या वाढल्या आहेत. डॉ. देवेंद्र आदिवासी परिसरात सातत्याने आरोग्य शिबीर भरवतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उच्चशिक्षणाचा टक्का वाढवण्यासाठीचे त्यांचे कार्य अमूल्य आहे. डॉ. देवेंद्र पाटील यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ.

आंबाडी येथील झिडके गावच्या कुणबी समाजाचे काठोड पाटील आणि रंजना पाटील या दाम्पत्याला पाच अपत्ये. त्यांपैकी एक देवेंद्र. काठोड हे शिक्षक होते, तर रंजनाबाई गृहिणी. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची. पण, गरजूंचा त्यांच्या घरी राबता असे. काठोड यांनी गरजवंतांना कधीही रिकाम्या हाताने पाठवले नाही. अनेक लोकांच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी केला. बाबा दुःखी व्यक्तींना नेहमी आधार देतात, हे लहानपणापासून देवेंद्र पाहत आले. बाबांच्या या स्वभावामुळे पंचक्रोशीत ते लोकप्रिय होते. त्यांचा मुलगा म्हणून देवेंद्र यांनाही लोक जीव लावायचे. समाजाचा आत्यंतिक स्नेह आणि प्रेम पाहून देवेंद्र लहान वयातही भारावून जात. तसे ते अभ्यासात हुशार. शिकत असतानाच ती घटना घडली. त्यांच्या भावाचा अपघात झाला. मुंबईच्या ‌‘केईएम‌’मध्ये त्यांना दाखल करण्यात आले. देवेंद्र त्यांच्यासोबत रुग्णालयात राहिले. त्यावेळी तिथे रुग्णसेवा करणारे डॉक्टर पाहून देवेंद्र यांनी ठरवले की, “मीसुद्धा असाच डॉक्टर बनणार. गोरगरीब-गरजूंना दिलासा देणार.” त्यांनी त्यांचे स्वप्न प्रचंड कष्टाने-मेहनतीने पूर्ण केले. पुढे डॉ. अस्मिता यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. वसई येथे त्यांनी अत्याधुनिक ‌‘यूरोलॉजी‌’संदर्भित रुग्णालय काढले. या रुग्णालयामुळे वसई ते पुढे डहाणूपर्यंतच्या जनतेला ‌‘यूरोलॉजी‌’संदर्भात चांगल्या उपचाराचा लाभ झाला.

डॉ. देवेंद्र म्हणतात, “खा. हेमंत सवरा आणि मी पक्के मित्र. गोरगरीब समाजाची वैद्यकीय सेवा करायची, हा आमचा ध्यास तेव्हा होता, तो आताही आहे. त्यातूनच आंबाडी येथे गोरगरिबांसाठी सुपर स्पेशालिस्ट रुग्णोपयोगी इस्पितळ काढावे, अशी इच्छा आहे. मात्र, एखादे सुपर स्पेशालिस्ट इस्पितळ उभे राहण्यासाठी त्याच्या साथीला सहयोगी व्यवस्थाही निर्माण होणे गरजेचे असते. सध्या आंबाडी असू दे की, पालघरमधील दुर्लक्षित खेडी; या सर्व परिसरात तशी व्यवस्था उभी राहत आहे.” तसेच आंबाडी परिसरात उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सेवा उपलब्ध करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात मानवी मूल्यांचा जागर करणाऱ्यांसाठी डॉ. देवेंद्र यांचे कार्य म्हणजे दीपस्तंभच!

9594969638





योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.