पक्ष्यांची यादी '४०० पार'

    18-May-2026
Total Views |
Young Birdwatcher Achieves Milestone
 
पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेत शिकणारा अर्पित चौधरी पक्षीनिरीक्षण करतो. त्याला पक्ष्यांची नावे तोंडपाठ आहेत. त्याची ही पक्षीनिरीक्षणाची आवड जोपासण्यात त्याचे वडील अक्षय चौधरींचा मोठा हातभार आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्या पक्ष्यांच्या यादीत भर पडली असून ४०० पक्ष्यांची नोंद त्याने केली आहे. छोट्या पक्षीनिरीक्षकाच्या याच नोंदीविषयी माहिती देणारा हा लेख...
 
गदी लहान असल्यापासून मला पक्षी, प्राणी, साप व फुलपाखरे यांची आवड आहे; खासकरून पक्षी माझे सर्वांत आवडते! पक्षी आणि निसर्गविषयी असलेली वेगवेगळी पुस्तके वाचणे, तसेच इंटरनेटवरून त्यांची माहिती गोळा करणे मला खूप आवडते. माझी आवड लक्षात घेऊन माझे वडील मला वेगवेगळ्या ठिकाणी पक्षी बघायला घेऊन जातात. मी एप्रिल महिन्यातील माझा वाढदिवस निसर्गात जाऊन साजरा करतो. यंदाच्या माझ्या वाढदिवशी आम्ही कर्नाटकातील ‘ओल्ड मॅगझिन हाऊस’ याठिकाणी पक्षीनिरीक्षणासाठी गेलो. कारण या जागेबद्दल मी खूप वाचले होते आणि तिथे पक्षी बघायचीसुद्धा खूप इच्छा होती. ‘ओल्ड मॅगझिन हाऊस’ हे दांडेलीच्या गणेशगुडी गावात आहे. हा पूर्ण परिसर काली व्याघ्र प्रकल्पात येतो. काली नदीवर जेव्हा धरण बांधण्यात आले, तेव्हा याठिकाणी जिलेटीनच्या कांड्या ठेवत असत; म्हणून याला ‘मॅगझिन हाऊस’ नाव पडले. याठिकाणी मला पहिल्यांदाच दिसलेला पक्षी म्हणजे मलबारी कर्णा (Malabar trogon). या पक्ष्याला मी कोटीगाव आणि तिलारी येथे पाहिले होते. पण खास फोटो काही मिळाले नव्हते; या वेळेस मात्र त्याने पोटभरून फोटो दिले. हिरव्यागार जंगलात हा लालबुंद पक्षी उठून दिसत होता.
 
पुढे काटेसावरीच्या झाडातील एका छोट्या छिद्रात मलबारी तांबट पक्ष्याचे घरटे दिसले. त्याठिकाणी नर आणि मादी आळीपाळीने पिल्लांना भरवायला येत होते. पुढे एक-दोन तास आराम करून आम्ही लपनगृहात गेलो. पक्ष्यांना त्रास न देता, जवळून त्यांचे फोटो काढता यावे, यासाठी लपनगृहाची व्यवस्था असते. याठिकाणी मी पहिल्यांदाच पाहिले पक्षी होते, पांढर्‍या पोटाचा निळा माशीमार (white bellied blue flycatcher) चा सुतार (Lesser yellownape) संध्याकाळी या लपनगृहात पक्ष्यांची वर्दळ सुरू झाली. पाचू होला (Asian emerald dove), काळ्या गळ्याची मनोली (black throated munia), लाल चकोत्री (red spurfowl), पिवळी रामगंगा (Indian yellow tit), पिवळ्या भुवईचा बुलबुल (yellow burrowed bulbul), भृंगराज कोतवाल (racket tailed drongo), आकाशी माशीमार (blue naped monarch) या पक्ष्यांचे दर्शन आम्हाला लपनगृहातून झाले.
 
दुसर्‍या दिवशी आम्ही दांडेलीतील टिंबर डेपो येथे गेलो. गणेशगुडीहून दांडेलीला जाण्यास अंदाजे एक तास लागतो. मधल्या प्रवासात सुंदर जंगल व काली नदीचे खळखळणारे पाणी पाहायला मिळते. टिंबर डेपो हे ब्रिटिशकालीन असून तिथे लाकडाचा लिलाव होतो. हे ठिकाणदेखील पक्षी निरीक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याठिकाणी पोहोचल्यावर आमचे स्वागत केले, १२-१५ मलबार कवड्या धनेशाच्या थव्याने. बहिरी घुबड म्हणजेच brown ha3wk निवांत झोपलेले होते. त्यांना त्रास न देता, त्याचे भरपूर फोटो आम्ही काढले. तिथेच जवळ बदामी पोटाचा शिलींध्री (Indian Nuthatch) या पक्ष्याचा आवाज आम्ही रेकॉर्ड केला. पुढे गेल्यावर पांढर्‍या डोयाच्या मैनेचा, म्हणजेच मलबारी मैनांचा (malabar starlings) एक थवा कलकलाट करताना पाहिला. गाईड काकांनी मला घरट्यात बसलेला रानखाटीक म्हणजेच Common Woodshrike दाखवला. त्याला त्रास न देता आम्ही दुरूनच त्याचे फोटो काढले. पुढे एकाच कुंभीच्या झाडावर आम्हाला मोठा सोनपाठी सुतार (Malabar Flameback) आणि पांढर्‍या मानेचा सुतार (black rumped flameback) या दोन्ही प्रकारचे सुतारपक्षी त्या फुलांचा मधुरस पिताना दिसले. परत येत असताना घनदाट जंगलात आम्हाला शामा (white rumped shama) या पक्ष्याचा सुंदर आवाज आम्ही ऐकला व रेकॉर्ड केला. पांढरा शुभ्र स्वर्गीय नर्तकसुद्धा आमच्या समोरून उडताना आम्ही पाहिला. इतयात माझ्या वडिलांच्या कॅमेराची बॅटरी संपली. त्यामुळे मोबाईलवरच फोटो काढून आम्हाला समाधान मानावे लागले. ‘ओल्ड मॅगझिन हाऊस’ला परतल्यावर आम्ही पुन्हा लपनगृहात येऊन बसलो. त्यावेळी ठिपकेवाला इवला सुतार (speckled piculet) आणि मखमली शिलींध्री (velvet fronted nuthatch) हे दोन पक्षी मी पहिल्यांदाच पाहिले. ठिपकेवाला इवला सुतार हा इवलासा जेमतेम दहा सेंटी आणि दहा ग्रॅम वजनाचा सुतार गटातील पक्षी आहे. शिलींध्रीचा सुरेख निळा रंग आम्हाला कॅमेरामध्ये टिपता आला.
 
तिसरा दिवशी माझा वाढदिवस होता. ‘ओल्ड मॅगझिन हाऊस’ला येण्या अगोदर मी ३९२ पक्षी पाहिले होते. त्यांची नोंद मी ई-बर्ड या संकेतस्थळावर केली होती. ‘ओल्ड मॅगझिन हाऊस’च्या सफरीतील दोन दिवसांमध्ये ३९२चा आकडा ३९७ पर्यंत पोहोचला होता. या दौर्‍यातच ४०० टप्पा पूर्ण करण्यासाठी मी उत्साही होतो. सकाळी चहा पित असताना जंगलातून ‘कटरऽऽऽ’ करून मोठा आवाज आला. जसं कोणी झाडाला ‘ड्रिल’ मारत आहे. तो आवाज होता, पांढर्‍या पोटाचा सुतार (white bellied woodpecker) या सुतार गटातील एका मोठ्या पक्ष्याचा. हा पक्षी मी पहिल्यांदाच पाहिला; म्हणून माझ्या पक्ष्यांची यादी ३९८ वर गेली. पुढे गेल्यावर आम्हाला तांबूस सुतार (rufous woodpecker) हा लालसर सुतारपक्षी दिसला. मात्र, हा मी अगोदर पाहिला होता. त्याच्या अगदी समोर दोन काळसर पक्षी झाडावर इकडून तिकडे उडत होते; त्या होत्या पहाडी मैना (southern hill myna). मला माझा ३९९वा पक्षी दिसला. पुढे गाईड काका बोलले, झाडांमध्ये दाढीवाला राघू (blue bearded BeeEater) बसला आहे. पण खूप लक्ष देऊन पाहिले, तरी तो काही मला दिसत नव्हता. हिरव्या रंगाचा हा पक्षी हिरव्या झाडीत लपून गेला होता. पण अखेरीस तो मला दिसलाच आणि ४०० पक्ष्यांची यादी पूर्ण झाली!
 
अर्पित चौधरी
(हा लेख अर्पित याने आपले वडील अक्षय चौधरी यांच्या मदतीने लिहिला आहे.)
८७९३४०१०१२