सामाजिक बंधुतेचा मार्ग हीच काळाची गरज

    18-May-2026
Total Views |

Social Brotherhood National Harmony
 
कोणत्याही देशाच्या विकासात सामाजिक समरसतेचे महत्त्व अनन्यसाधारण असेच असते. मात्र, काही स्वार्थी मंडळी स्वार्थापायी समाजातील बंधुभावालाच पणाला लावतात. या व्यक्तींना समाजात संघर्ष पेटता राहाणेच लाभकारी सिद्ध होते. मात्र, याचा परिणाम समाजावर आणि पर्यायाने देशाच्या विकासावर होतोच.
 
आज समाजामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण होताना दिसते. काही ठिकाणी सकल हिंदू संमेलनांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावले जाते, त्यांच्या विचारांचा गौरव केला जातो, तेव्हा काही आंबेडकरी अनुयायांकडून त्यावर आक्षेप घेतला जातो. प्रश्न असा आहे की, ज्यांनी संपूर्ण भारतातील वंचित, शोषित आणि पीडित समाजाला संविधानिक अधिकार मिळवून दिले, त्या महामानवाला एका समाजापुरतेच मर्यादित का ठेवले जावे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारताचे सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. त्यांचे ध्येय समाजात समता, बंधुता आणि न्याय निर्माण करण्याचे होते. म्हणूनच त्यांचे विचार कोणत्याही एका पंथ, जात किंवा राजकीय चौकटीत बंदिस्त होऊ शकत नाहीत.
 
आज बौद्ध आणि हिंदू समाजामध्ये सामाजिक संवाद, परस्पर सहकार्य आणि एकात्मतेची भावना वाढणे ही काळाची गरज आहे. अनेक वर्षे समाजात असलेली ही दरी आणि वैमनस्य कमी झाले, तर त्याचा सर्वांत मोठा लाभ सामान्य बौद्ध समाजालाच होईल. कारण, जेव्हा समाज एकमेकांना आपले मानतो, तेव्हाच संघर्षाऐवजी सहकार्य निर्माण होते. मुख्य प्रवाहात येणे म्हणजे स्वतःची ओळख विसरणे नसून उलट, स्वतःचा स्वाभिमान जपत समाजात प्रभावी स्थान निर्माण करणे होय. बौद्ध समाज शिक्षण, प्रशासन, उद्योग, राजकारण आणि सामाजिक नेतृत्व या सर्व क्षेत्रांत पुढे येत आहे. समाजातील इतर घटकांशी संवाद आणि संबंध मजबूत झाले, तर प्रगतीचे नवे मार्ग अधिक खुलतील.
 
परंतु, दुर्दैवाने काही तथाकथित आंबेडकरी पुढार्‍यांना समाजात कायमच संघर्षाचे वातावरण राहावे, असे वाटते. कारण, समाजातील दरी जितकी वाढेल, तितकीच त्यांची राजकीय दुकाने चालू राहतात. समाजात समरसता निर्माण झाल्यास, द्वेषाच्या राजकारणाला जागा उरणार नाही. त्यामुळेच काही लोक मुद्दाम समाजात संशय, भीती आणि विभाजन निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
 
सामाजिक ऐयाला विरोध का? - विचार करण्याची वेळ!
 
आज देशात सामाजिक आणि वैचारिक पातळीवर मोठे बदल घडत आहेत. विविध समाजांमध्ये संवाद वाढत असून, परस्पर सन्मानाची भावना निर्माण होत आहे. विशेषतः बौद्ध समाज आणि व्यापक हिंदू समाजात, संवाद आणि सामाजिक जवळीकही वाढताना दिसते आहे. ही गोष्ट समाजातील शांतता, स्थैर्य आणि एकात्मतेसाठी सकारात्मक अशीच. मात्र काही प्रवृत्तींना हे चित्र मान्य नाही.
 
काही राजकीय आणि वैचारिक गटांकडून, सातत्याने बौद्ध समाजाला कायम संघर्षाच्या भूमिकेत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. लोकशाही, संविधान, स्वातंत्र्य किंवा सामाजिक न्याय या नावांखाली, सामान्य बौद्ध युवकांच्या भावना भडकावल्या जातात. प्रत्येक विषयाला समाज धोयात असल्याचे स्वरूप देत, रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न होतो. यामुळे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे, समाजातील सामान्य युवकांचा उपयोग खर्‍या प्रगतीसाठी होत आहे का?
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला संघर्षाचा मार्ग हा शिक्षण, हक्क, स्वाभिमान आणि संविधानिक न्यायासाठी होता. त्यांनी समाजाला विवेक, विचार आणि प्रगतीचा मार्ग दाखवला. मात्र, आज काही कट्टर वैचारिक गट आणि काही स्वार्थी नेते, स्वार्थासाठी समाजात संघर्षाचे वातावरण निर्माण करताना दिसतात.विशेषतः काही कट्टर डावे, कम्युनिस्ट विचारांचे गट, काही समाजात तेढ निर्माण करणारी असामाजिक तत्त्वे, यांना बौद्ध समाज आणि हिंदू समाजातील वाढती एकजूट खटकते. कारण समाज एकत्र येऊन गैरसमज दूर झाल्यास, तर द्वेषाचे राजकारण संपेल. त्याने या राजकारणावरच आधारलेले अनेकांचे अस्तित्वच धोयात येऊ शकते. आज अनेक सामान्य बौद्ध कुटुंबांची गरज शिक्षण, रोजगार, व्यवसाय, सामाजिक सन्मान आणि स्थैर्य ही आहे. त्यांना सतत संघर्षात अडकावून ठेवणे, हा त्यांच्या ऊर्जेचा अपव्यय ठरू शकतो. समाजाला पुढे न्यायचे असेल तर एका सुजाण नेतृत्वाची आवश्यकता आहे.
 
बौद्ध समाज आणि हिंदू समाज यांच्यातील जवळीक ही कोणाच्याही विचारांचा पराभव नाही. उलट, ती सामाजिक समरसतेकडे जाणारी प्रक्रिया ठरेल. एकमेकांच्या महापुरुषांचा सन्मान करणे, परस्पर सहकार्य वाढवणे आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे, हे लोकशाहीसाठीही आवश्यक असेच.
 
आज द्वेषापेक्षा संवादाची, संघर्षापेक्षा सहकार्याची आणि भावनिक भडकावूपेक्षा विवेकपूर्ण विचारांची गरज आहे. समाजातील तरुणांनी कोणत्याही विचारधारेपाठी आंधळे न होता, स्वतः विचार करणे आवश्यक आहे. बाबासाहेबांचे विचार हे समाज घडवण्यासाचे होते. त्यांचा खरा संदेश म्हणजे स्वाभिमानासह राष्ट्रनिर्माणात सक्रिय सहभाग. समाजातील सर्वच घटकांनी एकमेकांविषयी आदर आणि विश्वास निर्माण केल्यास, सामाजिक तणाव कमी होऊन देश अधिक सशक्त होईल. सामाजिक एकात्मता, ही कोणत्याही समाजाच्या प्रगतीची सर्वांत मोठी शक्ती ठरते.
 
संघर्ष नव्हे, समरसतेतच समाजाचे कल्याण!
 
आजच्या काळात विविध समाजांमधील मतभेदांचा, राजकीय किंवा वैचारिक लाभ घेण्याचा प्रयत्न होताना दिसतो. हा प्रयत्न देश आणि समाज दोघांसाठीही घातक असाच. त्यामुळेच सर्व समाजातील युवकांनी विवेकाने विचार करणे आवश्यक आहे. बौद्ध समाजाने नेहमीच शिक्षण, शांतता, संविधानिक मार्ग आणि सामाजिक प्रगती यांना महत्त्व दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येयही समाजात समानता आणि बंधुभाव वाढवणे हेच होते. बहुसंख्य हिंदू समाजाबरोबर संवाद, सहकार्य आणि सामाजिक एकात्मता वाढल्यास, बौद्ध समाजाला शिक्षण, रोजगार, व्यवसाय अशा मुख्य प्रवाहातील संधी अधिक मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. समाजातील दरी कमी होऊन, एकमेकांविषयी आदर निर्माण झाल्यास त्याचा फायदा सर्वसामान्यांचा होईल. भारत हा विविध धर्म, भाषा आणि संस्कृतींनी बनलेला देश आहे. प्रत्येक समाजाबरोबर शांततापूर्ण संबंध ठेवणे, हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे. मात्र, समाजात तेढ निर्माण करणार्‍या विचारांपासून दूर राहणे, ही प्रत्येक समाजाचीही जबाबदारी आहे.
 
समाजाचे खरे कल्याण शिक्षण, उद्योग, आर्थिक प्रगती, सामाजिक ऐय आणि राष्ट्रनिर्माणात सक्रिय सहभाग यात आहे. समाज जितका सकारात्मक विचार करेल, तितकाच तो अधिक सक्षम आणि प्रभावी होईल. आंबेडकरी समाजाला कायम सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्येच सातत्याने भडकाविले जात असून, सत्ताधार्‍यांच्या विरोधात त्यांना उभे करून, त्यांना तोफेच्या तोंडी देण्याचे काम समाजातीलच काही नेते करत आहेत. यामुळेच आंबेडकरी समाज हा एकटा पडत असल्याचेही दिसते. वारंवार सत्ताधार्‍यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्यामुळे, सत्ताधार्‍यांकडून न्यायाची अपेक्षा न बाळगलेलीच बरी. बदलत्या परिस्थितीनुसार समाजाने परिवर्तन स्वीकारायला हवे. तसेच, हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की, जेव्हा २२ राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. पश्चिम बंगालसारख्या किल्ल्यालासुद्धा भाजपने सर केले असून, महाप्रचंड विजय मिळवला आहे. आज देशाच्या ७० टक्के भूभागावर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचे शासन आहे. देशातील ११० कोटी लोकसंख्या, भाजपशासित राज्यांमध्ये राहते. २०२४चा लोकसभा निवडणुकीनंतर, मोठ्या राज्यांच्या निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. २०१४मध्ये भाजपचा सात राज्यांमध्ये विस्तार झाला होता. आज त्याच भाजपचे २२ राज्यांमध्ये सरकार आहे. जगातील सर्वांत मोठी सदस्य संख्या असलेला भाजप हा एकमेव पक्ष आहे. असे असताना वेळोवेळी काही कम्युनिस्ट संघटना, जहाल विचारांची असामाजिक तत्त्वे, काही राजकीय पक्षातल्या नेत्यांद्वारे स्वार्थासाठी आंबेडकरी अनुयायांना, संविधान, लोकशाही रक्षणाच्या नावाखाली भडकावण्यात येते. तसेच, त्यांचा वापार खासकरुन भाजपच्या विरोधात केला जातो. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात, आंबेडकरी समाजाला रस्त्यावर उतरविले जाते.
 
देशामध्ये भारतीय संविधानाला धोका आहे, देशातील लोकशाही संपत आलेली आहे, किंबहुना संपलेली आहे, देशातील स्वायत्त संस्था कामाच्या नाहीत, देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधातसुद्धा आंबेडकरी समाजाच्या मनामध्ये संशयाचे वातावरण निर्माण करून, प्रचंड रोष निर्माण केला जात आहे. अशा प्रकारचा ‘ब्रेनवॉश’ करून, त्यांना रस्त्यावर आंदोलने करण्यास बाध्य करुन, स्वतःचा स्वार्थही साधला जात आहे. मात्र, समाजाचे अत्यंत मोठ्या प्रमाणावर सामाजिक, राजकीय, तसेच आर्थिक नुकसान होत आहे.
 
ही अत्यंत गंभीर बाब असून, आंबेडकरी समाजाने याबद्दल गांभीर्याने चिंतन करणे अत्यंत आवश्यक असेच. समाजाने शिक्षण, रोजगार, आर्थिक उन्नती, मुख्य प्रवाहात जाऊन स्वतःचे कल्याण साधणे, बहुसंख्याकांमध्ये समरस होऊन स्वतःचे उत्थान करून घेणे, हीच काळाची गरज झाली आहे. असे असताना, या समाजाच्या मनात सातत्याने विष कालवून, ही सर्व मंडळी आपले अघोरी इप्सित साध्य करण्यासाठी समाजाचा वापर करीत आलेले दिसतात. त्यामुळे सर्वप्रथम समाजाने अशा दुष्ट शक्तींपासून दूर राहिले पाहिजे. दलितांवर अन्याय, अत्याचार हे फक्त २०१४ सालापासून चालू झालेले नाहीत, हे आपण चांगल्या प्रकारे लक्षात घेतले पाहिजे. हजारो वर्षांपासून दलितांना विषमतेची व अस्पृश्यतेची वागणूक मिळत आली आहे, ही वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडाचा जरी विचार केला, तरी जवळपास ७० वर्षे काँग्रेसने देशामध्ये राज्य केलं. या काळातही दलितांवर अनन्वित अत्याचार झाले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. गावागावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये जातीय हिंसाचाराच्या हजारो घटना घडल्या. या हिंसाचाराच्या घटना आटोयात आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक काँग्रेसने केला नाही. म्हणूनच दलितांवर फक्त भाजपाच्या शासन काळातच अन्याय होत आहे, ही दूधखुळी समजूत आहे. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, ‘सिलेटिव्ह’ राजकारणासाठी आंबेडकरी समाजाचा गैरवापर होत असून, हा डाव आंबेडकरी समाजाने वेळीच ओळखून सावध झाले पाहिजे. तसेच, स्वतःच्या उद्धारासाठी व उत्थानासाठी योग्य त्या दिशेने मार्गक्रमणही केले पाहिजे.
 
ॲड. संदीप जाधव
(लेखक ‘तथागत आंबेडकरी विचारक संघ, महाराष्ट्र राज्य’चे संस्थापक अध्यक्ष आहेत.)
७५०६३२४२९९