संघ शिक्षावर्गातून ‘मी’ पासून ‘आम्ही’कडे जाण्याची साधना : प्रमोद बापट

भोसला मिलिट्री स्कुल येथे "संघ शिक्षा वर्ग - विशेष"ला सुरुवात

    18-May-2026   
Total Views |
Sangh Shiksha Varg Vishesh
 
मुंबई : (Sangh Shiksha Varg Vishesh) संघजीवनातील साधना, समर्पण आणि सामूहिक भावनेचे महत्त्व पटवून देताना ‘मी’ पासून ‘आम्ही’कडे जाण्याची प्रक्रिया हीच संघकार्याची खरी ताकद असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विशेष शिक्षा वर्गात स्वयंसेवकांना त्यांनी संबोधित केले. भोसला मिलिट्री स्कुल येथे १७ मे ते ३१ मे पर्यंत होत असलेल्या वर्गाची रविवारी भारतमातेच्या पूजनाने सुरुवात झाली.
 
याप्रसंगी व्यासपीठावर संभाजीनगरचे उद्योजक व वर्गाचे सर्वाधिकारी आणि विभाग संघचालक मुंजाजी तथा बबनराव जगाडे, पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी उपस्थित होते. संघ शिक्षा वर्गाचे वर्गपालक म्हणून प्रमोद बापट यांनी दैनंदिन जीवनात संघकार्य हे स्वयंसेवकांच्या स्वभावाचा भाग बनला असला तरी अधिक सत्वशील, अधिक समर्पित आणि अधिक संघमय होण्यासाठी अशा विशेष वर्गांची आवश्यकता असते, व्यक्ती आपल्या नित्यकर्माबरोबरच व्रत, उपवास, श्रावण किंवा चातुर्मास यांसारख्या साधनांद्वारे आत्मशुद्धीचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे संघ शिक्षा वर्ग स्वयंसेवकांसाठी आत्मपरिवर्तनाची संधी ठरते, असेही त्यांनी नमूद केले.
 
हेही वाचा : संत रवीदास यांच्या कार्याच्या संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळावे — आशिष शेलार
 
पुढे ते म्हणाले की, वर्गात सहभागी झाल्यानंतर स्वयंसेवक काही काळासाठी आपल्या दैनंदिन व्यवहारांपासून दूर राहून पूर्णतः संघ सृष्टीत रमतो. दिवस-रात्र संघ विचार, संघकार्य आणि संघसंस्कार यांच्यात राहिल्यामुळे त्याच्यातील संघनिष्ठा अधिक दृढ होते. “शिवाची पूजा करायची असेल तर शिवमय व्हावे लागते,” या उदाहरणातून त्यांनी अद्वैत, समर्पण आणि आत्मचिंतन यांचे महत्त्व स्पष्ट केले.(Sangh Shiksha Varg Vishesh)
 
या वर्गातून स्वयंसेवकांना 'मी कोण आहे?' याबरोबरच 'आम्ही कोण आहोत?' याची अनुभूती मिळते. विविध प्रांत, भाषा, व्यवसाय आणि पार्श्वभूमी असलेले स्वयंसेवक येथे एकत्र येतात; मात्र सर्वांना जोडणारा समान धागा म्हणजे राष्ट्रकार्याची भावना मनात रुजवली जाते. या अनुभूतीमुळे व्यक्तिकेंद्री विचार मागे पडून सामूहिकतेची जाणीव प्रबळ होते. संघाचा स्वयंसेवक हा केवळ संघटननिष्ठ नसून समाजाच्या सुख- दुःखात सहभागी होणारा, समाजाशी सतत संपर्क ठेवणारा आणि समाजपरिवर्तनासाठी कार्यरत असणारा कार्यकर्ता असतो.(Sangh Shiksha Varg Vishesh)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक