मुंबई : (Mumbai Ahmedabad Bullet Train) मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या कामाला वेग येत असताना भारतातील पहिल्या प्रस्तावित बुलेट ट्रेनचे अधिकृत छायाचित्र रेल्वे मंत्रालयाने प्रदर्शित केले आहे. दिल्लीतील रेल्वे भवन येथे सादर करण्यात आलेल्या या दृश्यामुळे देशाच्या महत्त्वाकांक्षी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला नवी ओळख मिळाली आहे.
५०८ किलोमीटर लांबीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर ही सेवा सुरू होणार असून हा प्रकल्प जपानच्या अत्याधुनिक शिंकान्सेन तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केला जात आहे. पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन ताशी ३२० किलोमीटरच्या कमाल वेगाने धावेल. त्यामुळे सध्या सात तासांहून अधिक वेळ लागणारा मुंबई-अहमदाबाद प्रवास तीन तासांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
रेल्वे भवनात प्रदर्शित करण्यात आलेल्या बुलेट ट्रेनच्या डिझाइनमध्ये पक्ष्यापासून प्रेरणा घेतल्याचे दिसून येते. ट्रेनच्या वरच्या भागावर आकर्षक रंगसंगती वापरण्यात आली असून तिचे आधुनिक आणि भविष्यकालीन स्वरूप विशेष लक्ष वेधून घेत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली १,३८९.५ हेक्टर जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून विविध स्थानके, पूल आणि डेपो उभारणीची कामे प्रगतीपथावर आहेत. भारतातील पहिली बुलेट ट्रेन सेवा ऑगस्ट २०२७ मध्ये सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथून सुरू होणारा हा मार्ग ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद आणि अहमदाबादमार्गे साबरमतीपर्यंत जाणार आहे. मर्यादित थांब्यांमुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या २ तास ७ मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.