दिव्यांगांच्या आयुष्यात आत्मविश्वास वाढून त्यांची स्वावलंबनाकडे वाटचाल-दिव्यांगांच्या स्वावलंबनाला बळ देणारा उपक्रम

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ५० मोटार ट्रायसिकलचे वितरण

    18-May-2026
Total Views |
Motor Tricycle Distribution
 
नागपूर : (Motor Tricycle Distribution) दिव्यांग बांधवांना सक्षम करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सातत्याने विविध योजना राबवत आहे. मोटार ट्रायसिकलसारखी सुविधा उपलब्ध झाल्याने दिव्यांगांच्या आयुष्यात आत्मविश्वास वाढून स्वावलंबनाकडे त्यांची वाटचाल अधिक मजबूत होईल, असा विश्वास महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
 
कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानतर्फे आयोजित महा आरोग्य शिबिरात दिव्यांग बांधवांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. समाजातील गरजू आणि दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ५० दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत मोटार ट्रायसिकलचे वितरण करण्यात आले.
 
या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाला गती मिळणार असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव पाहायला मिळाले. अनेक लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत या मदतीमुळे शिक्षण, रोजगार तसेच दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार असल्याचे सांगितले.
 
 
यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, हा कार्यक्रम केवळ साहित्य वाटपाचा नसून समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे, या भावनेला बळ देणारा आहे. दिव्यांग बांधवांना सक्षम करण्यासाठी शासन विविध योजना राबवत असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.(Motor Tricycle Distribution)
 
ते पुढे म्हणाले की, दिव्यांग बांधवांच्या शरीरात काही मर्यादा असल्या तरी त्यांच्या मनामध्ये प्रचंड जिद्द, आत्मविश्वास आणि संघर्ष करण्याची क्षमता असते. समाजाने त्यांच्याकडे सहानुभूतीने नव्हे, तर समानतेच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. योग्य संधी, शिक्षण आणि आवश्यक साधने उपलब्ध करून दिल्यास दिव्यांगत्व ही कमजोरी नसून मोठी ताकद ठरू शकते.
 
बावनकुळे यांनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे सांगितले. समाजातील सक्षम घटकांनी पुढे येऊन गरजूंसाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. महा आरोग्य शिबिरामध्ये विविध आरोग्य तपासणी आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला.
 
कार्यक्रमाला माजी आमदार टेकचंद सावरकर, महादुला नगरपंचायतच्या नगराध्यक्षा हेमलता सावजी, उपाध्यक्ष वैशाली पखिद्दे, मौदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, भाजप मौदा तालुका मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, दिव्यांग लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Motor Tricycle Distribution)