मुंबईतील प्रकल्प साईटवर एमएमआरडीएचे मान्सून सुरक्षा प्रोटोकॉल लागू

एमएमआरडीएच्या मान्सून पूर्वतयारी यंत्रणा सक्रिय;कंत्राटदार आणि प्रकल्प संस्थांसाठी कठोर एसओपी

Total Views |
Monsoon Safety Protocols
 
मुंबई : (Monsoon Safety Protocols) मुंबईतील आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेशातील सर्व सुरू असलेल्या मेट्रो आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी व्यापक, बहुपातळी मान्सून पूर्वतयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
 
या पूर्वतयारी आराखड्यांतर्गत, मेट्रो आणि अभियांत्रिकी कामे करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना ठरलेल्या वेळेनुसार अनिवार्य 'साइट-विशिष्ट मान्सून पूर्वतयारी योजना' सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या योजनांमध्ये डी-वॉटरिंग सिस्टिम, उतार संरक्षण, वॉटरप्रूफिंग, कामगार सुरक्षा, आपत्कालीन साहित्य साठा, पूर-जोखीम प्रतिबंधक उपाययोजना आणि एमएमआरडीएच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी थेट जोडलेल्या आपत्कालीन प्रतिसाद प्रोटोकॉल्सचा समावेश असणे बंधनकारक आहे.
 
एमएमआरडीएने सर्व कंत्राटदार आणि सल्लागारांना भारतीय हवामान विभाग आणि महानगरपालिका प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी झाल्यास गर्डर लॉन्चिंगसारखी उच्च-जोखीम बांधकाम कामे तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. पूरप्रवण भागांतील कामगार निवासस्थाने मान्सूनच्या तीव्र कालावधीपूर्वी स्थलांतरित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय, संपूर्ण मान्सून काळात सातत्यपूर्ण सीसीटीव्ही निरीक्षण आणि रिअल-टाईम साइट मॉनिटरिंग बंधनकारक करण्यात आले आहे. (Monsoon Safety Protocols)
 
 
प्रमुख मान्सूनपूर्व तयारी व सुरक्षा उपाययोजना
 
• आपत्कालीन प्रतिसाद पथके आणि डी-वॉटरिंग पंप तैनात करणे.
• खड्डे दुरुस्ती, गटार स्वच्छता आणि जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करणे.
• बांधकाम कचरा हटवून बॅरिकेड्स व सुरक्षा उपाय मजबूत करणे.
• पायलिंग, पाइल-कॅप आणि रस्ता पुनर्स्थापना कामांना प्राधान्य देणे.
• विद्युत प्रणाली तपासणी, झाडांची छाटणी आणि फॉगिंग मोहिमा राबविणे.
• पादचारी आणि वाहतूक सुरक्षेसाठी आवश्यक दुरुस्ती करणे.
 
२४x७ नियंत्रण कक्ष हेल्पलाईन
 
टोल फ्री क्रमांक : १८००२२८८०१
मोबाईल क्रमांक : ८६५७४०२०९०
विस्तारित दूरध्वनी क्रमांक :०२२-६५९६ ४१७६ / ०२२-६५९६ ७९०१
दूरध्वनी क्रमांक : ०२२-२६५९ १२४१
 
“एमएमआरडीएने सर्व सक्रिय पायाभूत सुविधा आणि मेट्रो प्रकल्प मार्गिकांवर मान्सून व्यवस्थापन पद्धती लागू करण्यात आली आहे. अभियांत्रिकी विभाग, मेट्रो मार्गिका, कार्यरत पथके, नोडल अधिकारी आणि प्रादेशिक समन्वय यंत्रणांमध्ये जबाबदाऱ्या स्पष्टपणे निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्व कंत्राटदारांना साइट-विशिष्ट मान्सून पूर्वतयारी योजनांचे पालन करणे आणि एमएमआरडीएकडून जारी करण्यात आलेल्या सर्व सुरक्षा व कार्यात्मक एसओपीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.”
- डॉ. संजय मुखर्जी,महानगर आयुक्त, एमएमआरडीए (Monsoon Safety Protocols)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.