भारतीय क्रीडा क्षेत्र जरी प्रगती करत असले, तरी अनेक खेळांमध्ये स्वदेशी मार्गदर्शकांची अनुपस्थिती अनेकदा जाणवते. मात्र, ज्या खेळांमध्ये भारताकडेच गुणवान मार्गदर्शक उपलब्ध असताना परदेशी मार्गदर्शकांची नियुक्ती निव्वळ अनाकलनीयच ठरते. भारतीय हॉकी महासंघाने श्रीजेशच्याबाबतीत घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचा हा आढावा...
भारतीय हॉकीचा सुवर्णमयी प्रारंभ ध्यानचंद यांच्या काळापासून झाला. आधी वरिष्ठ गटाच्या संघाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि तेव्हापासूनच, भारतीय हॉकी जागतिक चर्चेत आला. कालांतराने युरोपीय देशांनी त्यांना हवी तशी शारीरिक क्षमतेवर आधारित हॉकीची शैली जगावर लादून, हॉकीचे कायदे आपल्याला हवे तसे तयार केले. यामाध्यमातूनच जगाला आशियाई शैली विसरायला लावून, एक नवीनच युरोपीय शैली प्रचलित केली. हॉकी खेळणारे अगदी भारतासहित सगळेच देश ध्यानचंद यांच्याकाळापासूनची आशियाई शैली, बासनात गुंडाळून ठेवण्यात गुंतले. आपली शैली विसरून युरोपीय शैली शिकून घेणे, भारत-पाकिस्तान अशा हॉकीतील आशियाई दिग्गज देशांनीही आरंभले. ही नवीन शैली युरोपीय हॉकीपटूंकडून शिकणे क्रमप्राप्त झाले. तसे न केल्यास आपण मागासले राहण्याची भीती वाटू लागल्याने, आपल्या माजी हॉकीपटूंकडून हॉकीचे शिक्षण घेणे बंद पडले आणि माजी युरोपीय हॉकीपटूंची मागणी वाढली. या आधुनिक हॉकीचे प्रशिक्षक सहकुटुंब भारतमुक्कामी येऊ लागले. या प्रशिक्षकांना हवी तेवढी गुरुदक्षिणा व सहकुटुंब निवासव्यवस्थाही पुरवली जाऊ लागली. ही प्रथा आजही चालू आहे. अगदी अलीकडे पाकिस्तानही गुरुदक्षिणा देत होता. एक काळ तर असा आला की, प्रशिक्षकांना द्यावी लागणारी गुरुदक्षिणा सरकारी तिजोरीतून मिळणेही महाकर्मकठीण होऊन बसले होते; कारण पाकिस्तान आर्थिक विवंचनेत अडकला होता.
पाकिस्तान हॉकी संघाच्या एका प्रशिक्षकाला तर जवळपास वर्षभराचा पगार न मिळाल्यामुळे, त्याने मग राजीनामा दिला आणि मायदेशी परतला. भारतावर पाकिस्तानसारखे आर्थिक संकट कधीच आले नव्हते आणि येणारही नाही. कारण, भारतीय हॉकी संघटना घरच्यांपेक्षा दारच्यांवरच विशेष माया दाखवत आली आहे. विदेशी प्रशिक्षक भारतात स्वतःला सुखी असल्याचे मानतात. ही विदेशी मंडळी भारतीय हॉकीत मुख्य प्रशिक्षक म्हणून वावरू लागली आणि माजी भारतीय हॉकीपटू ‘सह’पदावर ढकलले गेले. त्यामुळे ती आपलीच मंडळी तेव्हापासून जी दुय्यम झाली, ती अजूनही दुय्यम राहिली आहेत. म्हणूनच ‘घर की मुर्गी दाल बराबर’ हा वाप्रचार भारतीय हॉकीला लागू पडताना दिसत आहे. आता आपल्याकडे आशियाई व युरोपीय शैलीत शिक्षण घेऊन, ऑलिम्पिकसहित अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा पुरेसा अनुभव गाठीशी असलेले भारतीय हॉकीपटू उपलब्ध झाले आहेत. ते आता भारतीय हॉकीची पुढची पिढी घडवण्यास सक्षम आहेत. असे असतानाही, विदेशी प्रशिक्षकांच्या मागे आपण का बरे धावावे?
ध्यानचंद काळातील पहिल्या भारतीय हॉकी संघाला तर ‘प्रशिक्षक’ हे पदच नव्हते. संघाचा जो कप्तान होता, तोच संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत होता. कारण तो एक संघसदस्य, एक संघनायक आणि एक प्रशिक्षक अशा तिहेरी जबाबदार्या लीलया संभाळत असे. पहिले सुवर्णपदक मिळवणार्या भारतीय संघाची तिहेरी जबाबदारी सांभाळणार्या त्या आदिवासी खेळाडूचे नाव होते, जयपालसिंग मुंडा. होय, ‘मुंडा’ या आदिवासी जमातीतील जयपालसिंग हा तेव्हा ऑसफर्डला जाऊन, उच्च शिक्षण घेऊन आला होता. तो ऑसफर्डला असताना, ऑसफर्डच्या हॉकी संघात खेळलेला भारतीय हॉकीपटू होता. जयपालसिंग हॉकीचे ज्ञान प्राप्त करत विदेशात हॉकी कसे खेळायचे? याचा अनुभव घेऊन तरबेज झाला होता. आज क्रिकेटच्या ‘आयपीएल’सारख्या ‘हॉकी इंडिया लीग’, तसेच विदेशांतील अनेक प्रसिद्ध हॉकी स्पर्धेत, विदेशी खेळाडूंसमवेत अनुभव घेतलेले अनेक माजी हॉकीपटू आज भारतात उपलब्ध आहेत. ऑलिम्पिक स्तरावरील ही मंडळी, आपला अनुभव सामायिक करायला उत्सुक आहेत. भारतीय प्रशिक्षक भारतीय हॉकीचा विकास करू शकत नाहीत का? श्रीजेशसारखा घरचा प्रशिक्षक असताना, बाहेरून प्रशिक्षक आणण्याची गरज ‘हॉकी इंडिया’ला का पडावी?
दोन वेळा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता असलेल्या पी. आर. श्रीजेश याने, बुधवार, दि. १३ मे रोजी समाजमाध्यमांवर भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघासाठी परदेशी प्रशिक्षकाला प्राधान्य देण्याच्या ‘हॉकी इंडिया’च्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर ‘द वॉल’म्हणून ओळखल्या जाणार्या या आघाडीच्या भारतीय गोलरक्षकाने निवृत्ती जाहीर करताच, ऑगस्ट २०२४ मध्ये त्याची कनिष्ठ संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता त्याचा कार्यकाळ संपुष्टात आणण्यात आला आहे. "माझी प्रशिक्षक कारकीर्द अवघ्या दीड वर्षातच संपत असल्याचे दिसत आहे; या काळात आम्ही पाच स्पर्धा खेळलो आणि पाचही वेळा पदकांपर्यंत (पोडियम फिनिश) मजल मारली. यामध्ये ज्युनियर विश्वचषकातील कांस्यपदकाचाही समावेश आहे,” असे पी. आर. श्रीजेशने म्हटले आहे. "खराब कामगिरीनंतर प्रशिक्षकांना पदावरून हटवले गेल्याचे मी ऐकले आहे. पण, परदेशी प्रशिक्षकासाठी जागा करून देण्यासाठी मला पदावरून दूर करण्याचा अनुभव मी पहिल्यांदाच घेत आहे,” असेही त्याने नमूद केले. त्याच्या मार्गदर्शनाखाली, ‘टीम इंडिया’ने २०२५च्या ‘एफआयएच’ पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी करत, पदकावर नाव कोरले होते. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध खेळताना, भारतीय संघ ०-२ने पिछाडीवर होता; मात्र त्यानंतर जोरदार पुनरागमन करत संघाने ४-२ने विजय मिळवला. ‘हॉकी इंडिया’च्या अध्यक्षांनी असे स्पष्ट केले की, वरिष्ठ पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक कनिष्ठ संघासाठीही परदेशी मुख्य प्रशिक्षकालाच पसंती देतात. कारण त्यांच्या मते, यामुळे कनिष्ठ स्तरापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंत भारतीय हॉकीचा विकास होण्यास मदत होईल. त्यामुळेच भारतीय प्रशिक्षक भारतीय हॉकीचा विकास करू शकत नाहीत का? हा प्रश्न उपस्थित होतो. दि. ७ मार्च रोजी माननीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीदरम्यान मला असे सांगण्यात आले होते की, ‘श्रीजेश, २०२६च्या ऑलिम्पिकची तयारी करत असताना, तुझ्यासारख्या प्रशिक्षकांनी पुढाकार घेऊन आपल्या देशाचे नेतृत्व करणे गरजेचे आहे.’ ‘हॉकी इंडिया’ मात्र चारही संघांच्या बाबतीत, भारतीय प्रशिक्षकांपेक्षा परदेशी प्रशिक्षकांवरच आपला विश्वास कायम ठेवून आहे,’ असे म्हणत श्रीजेशने, आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रीजेशची भारतीय हॉकी संघटनेनं केलेली ही हकालपट्टी, अनेकांना खचितच खटकत असेल. कनिष्ठ हॉकीपटूंना सांभाळणार्या ‘द वॉल’च्या खांद्यावरून ही जबाबदारी उतरवण्यात आली असून, यात घडणारे हॉकीपटू मोठे होऊन वरिष्ठ हॉकी संघात जाऊन अगदी ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत भारताला उपयोगी पडणार आहेत.
‘हॉकी इंडिया’चे माजी अध्यक्ष असलेल्या डॉ. नरिंदर ध्रुव बत्रा यांपासून ते सर्वसामान्य हॉकीप्रेमींना एका गोष्टीचे मनापासून दुःख आणि अस्वस्थता वाटते ती म्हणजे, प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी करूनही, भारताच्या महान हॉकी दिग्गजांपैकी एकाशी ज्या प्रकारे वागणूक दिली जात आहे. श्रीजेशने जवळपास दोन दशके भारताचे अत्यंत सन्मानाने प्रतिनिधित्व केलं आहे. जागतिक हॉकीमधील महान गोलरक्षकांपैकी एक म्हणून, ‘द वॉल’ असा नावलौकिकही त्याने मिळवला आहे. देशासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकली असून, संपूर्ण जागतिक हॉकी समुदायाचा आदरही श्रीजेशनी मिळवला आहे.
निवृत्तीनंतर आपल्या यशावरच समाधान मानून स्वस्थ बसण्याऐवजी, श्रीजेशने भारतीय हॉकी खेळाडूंची पुढची पिढी घडवण्याची जबाबदारी तत्परतेने स्वीकारली. त्याचे परिणाम आज सर्वांसमोर स्पष्ट आहेत. असे असूनही ‘हॉकी इंडिया’ श्रीजेशकडे तशा दृष्टिकोनातून न बघता, परया प्रशिक्षकांच्या हाती आपली मुलं सोपवताना दिसतात हे आम्हाला खटकणारे असेच. अत्यंत आश्चर्यकारक बाब ही आहे की, श्रीजेशसारख्या सिद्धहस्त भारतीय प्रशिक्षकापेक्षा, व्यवस्थापनाला एखादा परदेशी प्रशिक्षक अधिक पसंत असल्याच्या एकमेव कारणामुळे बाजूला सारले जात आहे. ही मानसिकताच भारतीय हॉकीचे ज्ञान आणि भारतीय ऑलिम्पिक अनुभव, यांबद्दलच्या पूर्णपणे अभाव असल्याचेच प्रतिबिंब आहे.
सध्याच्या प्रशिक्षक संचाने नेमकी अशी कोणती असाधारण कामगिरी केली आहे, असा प्रश्न विचारण्याचा हॉकी समुदायाला पूर्ण अधिकार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने जे कांस्य पदक जिंकले, त्याचे श्रेय प्रामुख्याने त्या संपूर्ण संघाला जाते. ज्याची घडण अनेक वर्षांच्या मेहनतीतून, अनुभवातून, चिकाटीतून आणि झुंजार वृत्तीतून घडवण्यात झाली होती. सध्याच्या वरिष्ठ प्रशिक्षक व्यवस्थेच्या अंतर्गत, जगातील आघाडीच्या हॉकी राष्ट्रांविरुद्ध खेळलेल्या २४ ‘हॉकी प्रो लीग’ सामन्यांपैकी, १८ सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला ही वस्तुस्थिती आहे. अशा कामगिरीसाठी उत्तरदायित्व आणि प्रामाणिक मूल्यमापनाची आवश्यकता असते.
एका बाजूला, सातत्याने पदके मिळवून देणार्या श्रीजेशसारख्या प्रशिक्षकाकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुसर्या बाजूला, वरिष्ठ स्तरावरील अपयश कोणत्याही गंभीर छाननीशिवाय तसेच सुरू आहे. यामुळे निवृत्तीनंतर प्रशिक्षक बनू इच्छिणार्या प्रत्येक भावी भारतीय खेळाडूला, एक धोकादायक संदेश मिळतो. बात्रांचे हे विचार सगळ्यांनाच पटणारे असतील.
आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यानेही प्रशिक्षक कसा असावा, हे आता ठरवलं आहे. ‘पाकिस्तान हॉकी फेडरेशन’ने आगामी ’प्रो-नेशन्स लीग’ आणि विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक कॉलिन बॅच यांच्या जागी, माजी ऑलिम्पियन मन्जूर उल हसन यांची नियुक्ती केली आहे. ‘पाकिस्तान हॉकी फेडरेशन’ने आपल्या तांत्रिक रचनेतही मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत संघाला परदेशी प्रशिक्षकाऐवजी, पाकिस्तानच्या आशियाई शैलीची समज असलेल्या माजी खेळाडूची आवश्यकता लक्षात घेतली आहे. मन्जूर उल हसन यांची नियुक्ती, ‘पीएचएफ’च्या ‘प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटी’च्या शिफारसींवरून झाली आहे. मन्जूर उल हसन यांनी यापूर्वी असा विश्वास व्यक्त केला की, पाकिस्तानने युरोपीय शैलीची नक्कल करणे थांबवून आपल्या पारंपरिक आशियाई शैलीत परतले पाहिजे. संघाला बळकट करण्यासाठी आणि जुन्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी त्यांना हे योग्य मानले आहे. हा बदल आशियाई हॉकी शैलीत परतणे आणि स्थानिक नेतृत्वाला पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे, या उद्देशाने करण्यात आला आहे.
घरचं जेवण हे कधीही हितकारकच असतं, हे आपणही लक्षात घ्यावं. असं जेव्हा होईल, तेव्हाच आज जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेला भारत प्रगती करताना दिसेल. नाहीतर, जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेला आपला शेजारी वेळीच सावध झाल्याने, आपल्या पुढे गेलेला दिसल्यावर मात्र हळहळत बसायची वेळ येऊ नये, म्हणजे मिळवली!
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयामप्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९३७०२९९५२९