मुंबई : (Hindu Sammelan) ठाणे येथील समतानगर वस्तीत दि. १७ मे रोजी सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत हिंदू संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या संमेलनाला सुमारे ४०० हिंदू बांधव उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय होता. समाजजागृती, हिंदू संघटन आणि संस्कार संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांनीही उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर आणि मुकुंद जोशी, डॉ. उदय निरगुडकर यांनी आपल्या भाषणात भारतातील वाढती हिंदू जागरूकता अधोरेखित करताना बंगाल आणि आसाममधील बदलांचे उदाहरण दिले.
हिंदू समाज अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असताना ही जागरूकता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. 'राजकीय जागरूकतेबरोबरच हिंदू म्हणून सामाजिक आणि सांस्कृतिक सजगता वाढणे आवश्यक आहे,' असे सांगत त्यांनी हिंदू समाजाविरुद्ध रचले जाणारे विविध नॅरेटिव्ह ओळखण्याचे आवाहन केले.
हिंदू संस्कारांचे (Hindu Sammelan) महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी 'जो कमवेल तो खाऊ घालेल' आणि 'वसुधैव कुटुंबकम' ही हिंदू धर्माची मूलभूत शिकवण असल्याचे सांगितले. कोविड काळात भारताने १०० देशांना मोफत लस पुरवली, हे त्याचेच उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. 'आम्ही कुणावर आक्रमण करत नाही; पण कुणी तसा प्रयत्न केला तर ‘ऑपरेशन सिंदूर’ करायलाही आम्ही समर्थ आहोत,' असे ठामपणे त्यांनी सांगितले. भारत सशक्त आणि समर्थ व्हायचा असेल तर हिंदू समाज संघटित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.(Hindu Sammelan)
मुकुंद जोशी यांनी भारतच्या प्रगतीसाठी हिंदू संघटन आणि त्यासाठी समाज परिवर्तनाची आवश्यकता हा विषय मांडला. समाज परिवर्तन हे पंच परिवर्तनाच्या माध्यमातूनच शक्य आहे. आणि हे आपण आपल्या घरापासून कसे करू शकतो याची मांडणी त्यांनी केली. स्व जागृती, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी शिष्टाचार आणि पर्यावरण या मुद्द्यांवर आपण घरी सहजपणे काय काय करू शकतो याची उदाहरणे त्यांनी मांडली.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजन आणि शंखनादाने झाली. यानंतर संपूर्ण वंदे मातरम्, गणेश वंदना, बुद्ध वंदना, शिवतांडव संकल्पनेवर आधारित भरतनाट्यम नृत्य, कविता सादरीकरण, भजन तसेच देशभक्तीपर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर रचित छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी समतानगर वस्तीतील काही विशेष व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील रस्सीखेच खेळाडू कु. रुपाली बोधे, रायफल शूटिंगपटू कु. धनश्री वैती, केबीपी कॉलेजचे प्राचार्य श्री. संतोष गावडे तसेच वयाच्या ९२ व्या वर्षीही पाणीप्रश्न आणि ग्रामविकासासाठी कार्यरत असलेले ऋषितुल्य आनंदजी भागवत यांचा सन्मान करण्यात आला.(Hindu Sammelan)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक